Recent in Technology

Advertisement

Breaking News

राणा दाम्पत्य म्हणजे बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना भाजपने या उपर-यांना आता तरी दूर ठेवावे : दिलीप एडतकर

    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : महाराष्ट्रात जी राजकीय उलथापालथ झाली ती हनुमान चालिसाचा अवमान केल्यामुळे झाल्याचा खासमखास शोध खासदार नवनीत राणा यांनी लावला असून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार बनवून शिवसेनेने जनादेशाचा अनादर केल्याचा हा परिणाम असल्याची ओरडसुद्धा विद्वान खासदार नवनीत राणा यांनी केली आहे. खासदार नवनीत राणा यांचा हा जावई शोध अत्यंत बालिश आणि हास्यास्पद असून केंद्रात व राज्यात सत्तेचे तुकडे मिळविण्याच्या प्रयत्नाचा एक भाग असल्याचा टोला काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते ॲड. दिलीप एडतकर यांनी लगावला आहे.

    प्रसिद्धीसाठी सदैव हपापलेल्या नवनीत राणा यांनी विमानात हनुमान चालिसा वाचण्याचे जे नाटक केले ते त्यांच्या संस्कृतीला शोभेसे असून हनुमान चालिसा वाचण्यासाठी नव्हेतर फोटो काढण्यासाठी लावलेला मास्क उतरवून नवनीत राणा यांनी फोटो सेशन केले व ते स्वतः प्रसारित केले. विमानात मास्क लावणे नियमानुसार गरजेचे असताना कायदे बनविणाऱ्या खासदारांनी फोटो काढण्यासाठी नियम व कायदा मोडला,केवळ आणि केवळ प्रसिद्धीसाठी वाट्टेल ते करणाऱ्या खासदार नवनीत राणा यांनी हनुमान चालिसाच्या फलश्रृतीवर एवढा विश्वास असेल तर आता विमानात हनुमान चालिसा न वाचता शेतकऱ्यांच्या धुऱ्यावर हनुमान चालिसा वाचावी व शेतकऱ्यांचे अनेकविध प्रश्न सोडवावेत असे आवाहनही ॲड. दिलीप एडतकर यांनी केले आहे.

    निवडणुकीपूर्वी भाजप सोबत युती करून निवडणुका जिंकणाऱ्या शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादी सोबत सरकार बनवून जनादेशाचा अपमान केल्याचे खासदार नवनीत राणा यांनी म्हटले आहे. नवनीत राणा यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने दलित मुस्लिमांची मते घेऊन नरेंद्र मोदींना शिव्याशाप देत निवडणूक लढली व जिंकली. परंतु त्यानंतर त्यांनी भाजपशी हातमिळवणी करून भाजपची नोकरी पत्करली याला जनादेशाचा आदर म्हणतात का ? याचे उत्तर त्यांनी आधी द्यावे, नवनीत राणा यांनी त्यांना पाठिंबा देणाऱ्या पक्षांची व मते देणाऱ्या मतदारांशी बेइमानी केली आहे. त्यांना जनादेशाच्या आदरा-अनादराबाबतच काय, पण इमानदारी या शब्दाबाबतही बोलण्याचा कोणताही अधिकार नाही असे प्रदेश प्रवक्ता दिलीप एडतकर यांनी म्हटले आहे.

    केंद्रात व राज्यात मंत्रिपदे मिळवण्यासाठी राणा दाम्पत्याने भाजपची चापलुसी दुप्पट वेगाने सुरू केली असून भाजपच्या सत्तालग्नात आता या 'बेगाने शादी मे अब्दुल्ला दिवान ' असलेल्या राणा दाम्पत्याला पंक्तीत जेवू घालायचे किंवा नाही ? याचा निर्णय सर्वस्वी भाजपानेच घ्यायचा असला तरी 'घरची म्हणते देवा देवा अन बाहेरचीला चोळी शिवा ' असा प्रकार या उप-यांच्या बाबतीत किती दिवस सुरू ठेवणार ? हासुद्धा भाजपा वर्तुळात विचारला जाणार प्रश्न असल्याचे ॲड.दिलीप एडतकर यांनी म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code