रत्नागिरी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर थोर विचारवंत होते. त्यांचे विचार व साहित्य जगाच्या कानाकोपर्यापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे अध्यक्ष उदय सामंत यांनी केले. रत्नागिरी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात प्रकाशन समितीच्या एकूण सहा ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले, यावेळी ते दूरदृश्य प्रणालीद्वारे बोलत होते.
कार्यक्रमाला राज्याचे ऊर्जामंत्री आणि समितीचे सदस्य डॉ. नितीन राऊत हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. यावेळी डॉ. इंदुराणी जाखड, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. प्रकाश बच्छाव, डॉ. संजय जगताप सुशांत खांडकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य सचिव डॉ. प्रदीप आगलावे, अनुवादक डॉ. आर.के. क्षीरसागर, आनंद आंबेडकर, डॉ. राजेंद्र गवई, डॉ. सुरेंद्र धाकतोडे, प्रा. सुषमा अंधारे, योगीराज बागुल, सिध्दार्थ खरात, डॉ. धनराज कोहचाडे, कमलाकर पायस, डॉ. संभाजी बिरांजे इत्यादी उपस्थित होते. राज्याचे ऊर्जामंत्री आणि समितीचे सदस्य डॉ. नितीन राऊत यांनी आपल्या मनोगतामध्ये मंत्री उदय सामंत हे प्रकाशन समितीचे कार्य सकारात्मक पध्दतीने आणि उत्तमरित्या करीत आहेत असे सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बहुतांशी साहित्य इंग्रजी भाषेमध्ये आहे. त्याचा अनुवाद करण्याचे काम समितीने हाती घेतले असून यामुळे हे साहित्य सर्वसामान्यांना समजणे सोपे होणार आहे असे ऊर्जामंत्री म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रदीप आगलावे यांनी केले. सिद्धार्थ खरात यांनी आभार मानले.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या