- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : ‘मानवतेसाठी योग’ (योगा फॉर ह्युमॅनिटी) असे ब्रीद घेऊन यंदाचा आंतरराष्ट्रीय योगदिन मंगळवारी (21 जून) साजरा करण्यात येत आहे. शासनाचे विविध विभाग व संघटनांच्या सहकार्याने अमरावतीत विभागीय क्रीडा संकुलात मंगळवारी सकाळी 7 ते 8 योगाभ्यास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती क्रीडा उपसंचालक विजय संतान यांनी दिली.
योगशास्त्र ही प्राचीन भारतीय संस्कृतीची अवघ्या जगाला मिळालेली अमूल्य देणगी आहे. योग व्यक्तीला अंतर्बाह्य निरोगी करून दीर्घायुष्य प्रदान करते. जीवन तणावमुक्त, भयमुक्त व निरामय राहण्यासाठी योगाचा स्वीकार सर्वत्र व्हावा यासाठी आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात येत आहे.
विभागीय क्रीडा संकुलातील कार्यक्रमात अनेक लोकप्रतिनिधी, अधिकारी, ज्येष्ठ योग प्रसारक, क्रीडापटू उपस्थित राहणार आहेत. अधिकाधिक नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. संतान, तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी वर्षा साळवी यांनी केले आहे.क्रीडाप्रेमी व नागरिकांनी विभागीय क्रीडा संकुलात सकाळी 6.30 वाजता उपस्थित राहावे व येताना पाण्याची बाटली व चटई सोबत आणावी, असे आवाहनही त्यांनी केले.
या उपक्रमाला जिल्हा प्रशासन, पोलीस, शिक्षण विभाग, विद्यापीठ, पतंजली योग समिती, आर्ट ऑफ लिव्हिंग, क्रीडाभारती, नेहरू युवा केंद्र, बृहन्महाराष्ट्र योग परिषद, भारत स्वाभिमान ट्रस्ट, युवा भारत व किसान पंचायत, श्री शिवाजी शिक्षण संस्था, वंदे मातरम योग प्रसारक मंडळ यांचे सहकार्य मिळाले आहे.
0 टिप्पण्या