Header Ads Widget

अंर्तमनातील स्नेहभावगर्भाच्या उत्कट महास्वप्नांची कविता -प्रतीक्षायन

  प्रेम मानवीय जीवनाला नवे स्वप्न देणारा भावगंध आहे. जगाला प्रेमानेच जिंकता येते .वैराने वैर शांत होत नाही तर ते अवैरानेच शांत होते असे मत तथागत गौतम बुध्द यांनी आपल्या मानव तत्वज्ञानात मांडले आहे.कवी यशवंत मनोहर यांचा प्रतीक्षायन कवितासंग्रह समाजपरिवर्तनाचा प्रणयध्यास घेतलेला आहे.कवितेच्या महायुध्द्च्या रणांगणावर प्रेमस्विनीची कवीला साथ लाभली आहे.कवितील मानवीय सहजीवनाचे उत्कट नाते प्रेमस्विनीच्या माध्यमातून उत्तुंग, हृदयकंप, प्रणयस्वल, मानवीयत्व, सुनयनत्व, स्वातंत्र्य़, समानता, सौंदर्यांतमकत्ता, भावस्पर्श, स्वयंवरता, सत्यशीलताअशा अनोख्या शब्दात व्यक्त झालेल्या आहे.मनोहरांच्या प्रतिक्षायन हा कवितासंग्रह लैगिकता, उच्च-निच, आकर्षण, रजंकता, अशा मोहक चक्रव्युहात न फसता समानांतर व्यक्तीजीवनाचा "आलेख चित्रीत करते.ही कविता स्त्री- पुरूष यांची भावविश्वे त्याची कायम प्रतिक्षा करीत असतात अशा संपूर्ण प्रेमाचे आभासचित्र म्हणजे प्रतीक्षायन!जीवनात प्रेम या नावाने एक अटळ आणि मूलभूत महासत्य वावरते. हे महासत्य समजावून घेण्याचा प्रयत्न म्हणजे प्रतीक्षायन ही महाकविता होय."ही तत्वजाणीव कवीने व्यक्त केली आहे.कवीने तरल, मोहक, आणि दाहक लालित्याता वेध घेण्याचा प्रयत्न अतिशय भारदस्त आहे.

  भारतीय इतिहासात प्रेमाला अनेक अंगाने प्रतिबिंबित केले आहे. हीर-रांजा, सोनी-महिवाल,जोधा-अकबर,शहाजहान-मुमताज,ही सर्व प्रणयता राजवैभवी मर्मबंधाचे प्रतिक आहेत. या प्रेमाने मानवीय दृष्टीकोन बदलला असे मानता येणार नाही, पण प्रेमाची अनमोल व्याप्ती वाढवणारी नक्कीच आहे.गौतम-यशोधरा, जोतीराव-सावित्रीमाई,भीमराव-रमाई, यांच्या अनुरागाने मानवीय समाजाला सौंदर्यवादी तत्वज्ञान दिले. परिवर्तनाचे सारे मार्ग मोहरून आणले.या अनुरागातून नव्या जगाची निर्मिती झाली हे म्हणणे वावगे ठरणार नाही. प्रेम हे जीवन वेलीवल उमललेले फुल आहे.जीवनाच्या भव्याेदिव्यतेला नवे प्रकाशकिरण देणारा परमोच्च बिंदू असतो.प्रयनातील सा-या वाटाची उकल करणा-या असतात पण मनोहरांची प्रेमस्विनी ही अत्यंत उदार आहे, क्रांतीकारी आहे. समाज परिवर्तनाचा वसा घेतलेली आहे.संविधानात्मक नैतिकतेने परिपक्व आहे.जगण्याच्या कष्टप्रधान क्षणातही ती कवीला नवे ऊर्जाबल देत आहे.ही कविता समस्त समाजाला नव्या प्रेममुलक परिवर्तनाचा नवा आरशा दाखवणारी आहे. कुसूमाग्रज आपल्या प्रेम कवितेत म्हणतात की,

  प्रेम कर भिल्ला सारखं
  बाणावरती खोचलेलं
  मातीमध्ये उगवून सुध्दा
  मेघापर्यंत पोहचलेलं..

  ही कविता प्रेम जाणिवांचा आविष्कार असला तरी परिवर्तशील बदल करणारी वाटत नाही. प्रेमाच्या कवितेने मराठी साहित्य बहरून आले असले तरी त्या प्रेमातून समाजपरिवर्तन झालं नाही.परंतु मनोहरांच्या प्रतीक्षायनातील प्रेमस्विनीतून भारताला नवा मूल्यगर्भ समाज निर्माण करता आला. माझ्या" गर्दकाळोखात उजेड पेरण्यासाठी" या कवितासंग्रहातील 'विद्रोही गुलाब'ही कविता प्रेमाचे संदर्भचं बदलवणारी वाटते.

  "तुझ्या गज-यात खोचायचे मला विद्रोही गुलाब आहे.
  तुझ्या धमणीधमणीत संचारायचे मला विद्रोही रक्त आहे.
  तुझ्या चेह-याचे सौंदर्यभावचं निरकायचे नाहीत,
  तर तुझ्या आरक्त ओठावर
  विद्रोही गीत द्यायचं आहे".

  ही कविता आंबेडकरी विचाराची जाणीव व्यक्त करणारी वाटते. प्रेमाचे आर्जव करण्याचे वेगवेगळ्या त-हा असल्या तरी आकर्षित,लैगिक,रजंक,कामुक व सैराट सारखे प्रेम नवा मूल्यनिरपेक्ष समाज निर्माण करू शकत नाही.प्रेमाला नवी पालवी फुटली असतांना मानवीय आंदोलनाला विविध पंखांनी मोहरून आलेल्या जीवनाला यशोशिखरावर घेऊन जाणे म्हणजे प्रेम ते मनोहराच्या कवितेत प्रकट होते . ते 'प्रतीक्षायन' या कवितेत म्हणतात की,

  हृदयांचे ठोके सुरू होत नाहीत तुझ्याशिवाय
  रक्ताला येत नाही मोहोर जिंदगीचा
  तू नसते तेव्हा चितांवर जळतो जन्म माझा ज्यात तू नाही
  असा श्वास घेता येत नाही मला.
  मला जगू दे प्रेमस्विनी...!
  पा. न. ९

  ही कविता आंतरिक उत्कृष्टतेता उत्तम नमुना असून कवीच्या रध्रारध्रात प्रेमाचे स्फुलिंग पेटलेले आहे असे वाटते. कवीच्या प्रेमाला कोणतेही भेद मान्य नाही.बुध्दिवादी एकसंघ असे अंबर डोळ्यात पाहतात.ते 'सत्कार' या कवितेत म्हणतात,

  तुझा समर्पणशैली मनस्विनी होती.तुझे मन
  तुझ्या पर्युत्सुक देहभर झाले होते तारांगण.
  ..........................
  तेव्हापासून नजरेत झुलतेय अखंड पौर्णिमा
  आपल्या रक्तमोहराला लागू होत नाही कोणतीत सीमा.
  पा.न.१८

  कवीला कोणतेही बंधन मंजूर नाही .मन सैवर होऊन मानव्याचे नवे गीत गाणारे मिलनप्रियतम भव्य जीवनाला नवा आयाम देणार आहेत.नव्या स्वप्नाची बाराखडी कविने शिकली असून प्रेमस्विनी धन्यवादाचा नवा डोंगर पृथ्वीच्या पाठीवर दाखल केला आहे. कवी विद्रोहाची ज्वाला प्यालेला असल्याने त्यांची प्रेमस्विनी सूर्याची प्रखर महाऊर्जा बनून कविची मशाल प्रज्वलीत करीत आहे. कवीला नव्या परिवर्तनच्या लढाईला तयार करताना अमाणूषतेला जाळून अग्नीपोर्णिमेचा वसा देणारी आहे. ते 'अग्नीपोर्णिमेचा वसा' या कवितेत म्हणतात की,

  समुद्रातील तुफानासारखा वागला इथला किनारा
  तर आपण किनारा नसलेल्या दुस-या समुद्राचे निर्माण करू;
  ..................
  आपली वाट पाहत असतील
  त्यांच्यापर्यंत पोचवायचा आहे
  हा अग्नीपोर्णिमेचा वसा.
  पा.न.३५

  समुद्राला किनारे असल्याने अथांग पाणी बंदिस्त असते त्यातून मानवाच्या दुःखावर कोणतीही उपाययोजना करता येत नाही म्हणून आपण किनारा नसलेला समुद्र तयार करून गरीबांच्या झोपडपट्यावर नव्या प्रकाशसौंदर्यसूर्याची महाऊर्जा देऊ.कवीने 'अज्ञान नाते'या कवितेतून विषमतेच्या सनातन भिंतीना जमीनदोस्त करून सौंदर्याचा सुंदर अजिंठा निर्माण केला आहे.ते या कवितेत म्हणतात,

  काळोखाच्या सा-या सनातन भिंती.
  झालो आपण सौंदर्याचा झंझावात
  आणि सापडलो आपण आपल्याला.

  प्रेमस्विनीने कवीला संघर्षात पुर्ण साथ दिली आहे.दोघाच्या प्रणयमिलनातून नवी सृष्टी उदयास येणार आहे.त्यामध्ये कोणतीही विषमता असणार नाही तर मानवाचे माणुसपण असणारा नवा प्रदेश तयार होणार आहे. म्हणून कवी आपल्या प्रेमस्विनीला 'तुझ्याशिवाय' या कवितेत रेखांखित करताना म्हणतात,

  "उशीर केलास प्रेमस्विनी !"
  तुझ्याशिवाय जगलो नाही,
  'तुझ्याशिवाय जगू शकणार नाही.
.

  यामधून कवी आपल्या आंतरिक भावनाचे नाते अलगत उलघडून दाखवतात.दोघेही समानसुत्रात गुफंणारे पृष्पबहार असून परस्परपुरक जीवनाचे भावबंध जुळले आहेत.एका शिवाय दुस-या ला चैन पडत नाही.ही कविता प्रेमाचा अप्रतिम आविष्कार आहे असे वाटते. कवीला प्रेमस्विनीचे एवढे स्मरण होते की तिच्या न येण्याने तो तगमगतो,कासाविस होतो. अनंत भावस्पर्शला व्यक्त करतो. जेव्हा ती दूर जाते तेव्हा कवीच्या मन व्याकूळ होते. मानवीय मनाच्या संवेदशीलतेतील स्पर्शजाणिवांच्या बांधाला वाट मोकळी करून देतांना कवी 'तू निघालीस की' या कवितेत म्हणतो.

  माझ्या रक्तात
  पिसारे फिरवून नाचतात काळाचे अणुरेणु.
  अनंत हळव्या वसंत ऋतूंना भेटून येते माझे मन
  यावेळी तू येईपर्यंतचा प्रत्येक क्षणही
  युगाएवढा छळवादी होतो.
  पा.न.३८

  जॉन किट्स हा एक प्रेम कवितेचा निर्मितीकार म्हणून सर्वांना माहीत आहे. जगण्यातील समग्र अनुबंधाचे चित्रण त्याच्या कवितेतून दिसून येते,त्याचप्रकारचे चित्रण मनोहराच्या कवितेतून व्यक्त होताना दिसून येते.ते 'तू म्हणालीस' या कवितेत म्हणतात,

  तुझ्या फुलांच्या वातचक्रात शिरेन पुनःपुन्हा
  पेटलेल्या पंखांनी उडत राहून तझ्यासोबत.
  मी तुझीच प्रेमस्विनी....!
  युगानुयुगे तुझीच प्रेमांगना...!
  पा.न.५२

  कवीला माहीत आहे जीवन फक्त एकदाच मिळते. पुर्नजन्म होत नाही पण प्रेमस्विनी सोबतचे अनामिक नाते युगानुयुगे राहावे ही मनिच्छा आहे.प्रेम सा-या जगाला नव्या प्रकाशवाटानी प्रकाशमान करते असा संदेश आपल्या प्रेमस्विनीला दिला आहे. कवीचे जीवन दुःखाच्या अनंत यातनानी भरलं असून. जातीयतेच्या बुजबुजाटात काही क्षण गेले आहेत. अन्यायकारी अव्यवस्थेने कवीला छळले आहे. पण कवी अंधाराकडून अंधाराकडे गेला नाही तर उजेडाच्या नव्या क्षितिजाकडे छताड डोळ्यांनी आपल्या जीवनाचे भव्य स्वप्न साकार केले आहे.ते 'उजेडाचे महाकाव्य' या कवितेत म्हणतात,

  तुझा हात धरून
  मी नव्या ऋतुंसोबत झुललो
  तुझ्या हृदयात बसून
  मी उजेडाचे महाकाव्य लिहू लागलो
  तुझा हात हातात घेऊन.....!
  पा.न.५३

  प्रेमस्विनी तुने माझ्या जीवनाला नवे महाकाव्य दिले असून तुझ्या शिवाय हे माझे महाकाव्य अपुर्णचं असतं. म्हणून आपण अनंत धरेवरील धावणारे सूर्यकिरण आहोत.या कक्षातील संस्कृंतिचे आदिबंध आहोत.प्रेमस्विनीच्या आठवणीने ते गदगदून गेलेले आहेत.ती जेव्हा विद्युतलता बनून येते कवीच्या मनात नव्या ऋतुंचा मनोहर पिसारा फुलतो. कवी अज्ञान पावसाच्या प्रवासाला निघातो एका प्रज्ञानी उजेडाच्या बाहूत शिरतो दोघांच्या श्वासांची प्रयोजने हृदयाच्या स्पंदनात भिनली असून विजप्रवाह रक्तातून धावत आहे.दोघांच्या निर्वाणासाठी ते पेटणार आहेत.(प्रज्ञानी उजेड म्हणजे बुध्द, बाबासाहेब, म.फुले यांच्या ज्ञानशाळेत असा अर्थ वाचकांनी समजावून घ्यावा)

  कविचा प्रतीक्षायन कवितासंग्रह नवे गीत गाणारा आहे.महाडच्या क्रांतीची अधिनायिका असून बाबासाहेबांच्या महाऊर्जेने ती तेजस्वी झाली आहे.ती कुणाला घाबरत नाही तर युगेयुगे ज्यांनी प्रतारणा केली त्याच्या विकृत ग्रथांला आग लावत संविधानाची अग्नीज्वाला पेरत निघाली आहे म्हणून कवी तिच्या संघर्षाने पूर्णत्वाकडे चालला आहे.अपुर्णांकातील पूर्णांक दोघांशिवाय पूर्ण होत नाही.वर्तुळाच्या प्रत्येक बिंदूवरील आलेल्या काट्यांना उचलून सुगंधाची नवी पाठशाला निर्माण केली आहे.पाठशाळेतून निघणारा प्रणयांग नव्या युगाचे क्रांती गीत गाणारा आहे. कवी 'फक्त तुझ्यासाठी' या कवितेत म्हणतो,

  तुझ्या काळजाला माझ्या नावाचे पंख फुटले की समज
  माझा जीव फक्त तुझ्यासाठी प्रतीक्षायन झाला आहे;
  प्रतीक्षायन,अखंड अखंड प्रतीक्षायन झाला आहे.....

  प्रतीक्षायन या कवितासंग्रहात एकूण बहात्तर कविता असून नव्या लालित्यपुर्ण मन्वतरांनी बहरून आलेल्या आहेत.नवा पर्याय,सप्तरंगाचे तोरण,आयुष्याची अधिनायिका,तेव्हा,अखंड स्वयं वर,या कविता उच्चतम पातळीवर व्यक्त झाल्या आहेत.कवी' माझ्यासाठी' या कवितेत प्रेमस्विनीचा सर्वंकष लालित्याचा मर्मबंध अधोरेखित करतो ते म्हणतात,

  सूर्याच्या उपस्थितीत
  माझ्यासाठी चंद्राचे लालित्य झाली
  तू मधाचा धुवाधार धबधबा ;
  तू अनन्य प्रणयकांक्षिणी;
  तू प्रगाढ समर्पिता!
  तू निश्चल अव्यभिचारिणी;
  तू अकल्पिता!
  तू प्रियकरवता....!
  पा.न.६२

  ही कविता या कवितासंग्रहातील प्रगल्भजाणिवांचा महासंग्राम आहे.प्रेम व्यक्त करण्याची उत्कटतेचा परमोच्च क्षण किती सूर्याकिंत व स्नेहाकिंत असतो यांची अचूक मांडणी करणारी आहे.मनातील भावतरंगाचे वलयंकिता स्पष्ट करणारी आहे.पृथ्वीचे प्रेमगीत यापेक्षा नव्या स्वरूपाचा अनोखा प्रेमाग्नी विशद करतो.प्रेमस्विनीच्या भिन्न भिन्न छटाने नटलेली ही कविता मानवाच्या मनातील तरल जीवनाचे सुंदर तारांगण उगडून दाखवणारी आहे.ही कविता शेक्सपिअर यांच्या "द मँरेज ऑफ ट्रू माईंड" या कवितेची जाणीव करून देणारी आहे.तसेच मार्गारेट वॉकर यांच्या "माझ्या लोकांसाठी"

  "माझ्या लोकांसाठी नव्या पृथ्वीचा उदय होवो
  जन्म होवो नव्या जगाचा, रक्तबंबाळ .........
  शांतता आकाशावर कायमची कोरली जावो
  पुढील पिढी अनंत प्रश्नांना हिमतीने सामोरी होऊ दे....
  माणूसप्रेमी स्वातंत्र्याची वाढ होऊ दे!"

  या कवितेच्या धाटणीची कविता वाचकाला अंर्तमुख करते.भारतीय समाजव्यवस्थेतील असमानतेवर प्रहार करते.स्त्री-पुरूष समान जीवनाचे आकृतीबंधाचे वास्तव प्रगट करते.ज्वालाग्राही विद्रोहाचा पिंड असलेल्या कविची कविता अंतरंगातील प्रेमजाणिवांचा सृजन झ-यातील जलमणीने वाचकाला तृप्त करते. आशयाच्या अंगाने बहरून आलेली प्रतीक्षायन प्रेमस्विनी ही मराठी साहित्यात सर्वश्रेष्ठ कविता वाटते.प्रतीक्षायन म्हणजे कवीच्या अंर्तमनातील स्नेहभावगर्भाचे उत्कट महास्वप्न आहे.वाचकाला नवपरिवर्तनाचा ध्यास देऊन अखंड शांतता प्रस्थापित करण्याचा आग्रह करणारी कविता आहे. उच्चतम अणुरेणुची ही सेंद्रिय कविता भारतात प्रेमविरावर होणा-या अन्यायाचा प्रतिकार करणारी आहे त्यासाठी कवीला पुढील काव्यांकj आविष्कारासाठी मंगलकामना चिंतितो..!

  -संदीप गायकवाड
  ९६३७३५७४००

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या