Header Ads Widget

आपत्ती निवारणासाठी प्रशासकीय यंत्रणा सुसज्ज

  नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्रमांक 0721-2661355 व 2662025 जतन करुन ठेवा

  पावसाळ्यातील संभाव्य पूर, वादळ, वीज कोसळणे, अतिवृष्टी, मनुष्य तसेच वित्तहानीसह विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी अमरावती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आणि विविध विभागातील प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे.अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपातकालीतस्थितीत संपर्कासाठी नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करुन निवासी उपजिल्हाधिकारी यांची जिल्हा नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्ष येथे दिवसा तसेच रात्रपाळीत कर्मचारी कार्यरत असतात. जिल्ह्यात कुठेही नैसर्गिक आपत्ती किंवा मानवनिर्मित आपत्ती घडल्यास तात्काळ या घटनेची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयास कळविण्यात येते. तेथून इतर संबंधित यंत्रणेला याबाबत त्वरित अवगत करण्यात येते. जिल्ह्यात नैसर्गिक आपत्ती घडल्यास आपत्तीची तीव्रता कमी करण्यासाठी जिल्ह्यातील विविध शासकीय यंत्रणेसोबत तात्काळ समन्वय साधला जातो. नैसर्गिक आपत्ती आल्यास नागरिकांनी घाबरुन न जाता नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक 0721-2661355 व 2662025 यावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले आहे.

  आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणासाठी जिल्ह्यातील उपविभागीय स्तरावर प्रशिक्षण

  मान्सुनपूर्व आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणासाठी जिल्ह्यातील सात उपविभागीय स्तरावर प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. यामध्ये अमरावतीसह तिवसा, भातकुली, चांदुररेल्वे, धारणी, दर्यापूर तर अचलपूर येथे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रशिक्षण कालावधीमध्ये अमरावती व चांदूररेल्वे येथे तलावांवर पूर परिस्थितीबाबतचे मॉकड्रिल घेण्यात आले.

  जीवित, वित्त आणि पर्यावरण रक्षण करणे, आपत्तींविषयी जनजागृती करणे, आपदग्रस्तांचा शोध घेऊन त्यांना मदत करणे आणि त्यांचे पुनर्वसन करणे, नियंत्रण कक्षाव्दारे आपत्तीवर देखरेख ठेवणे, आपत्ती निवारणाचे नियोजन करणे, मदत व पुनर्वसन योजनेची योग्य अंमलबजावणी करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणेला आदेश दिले आहेत.

  जिल्हा शोध व बचाव पथक

  जिल्हा शोध व बचाव पथक स्थापन करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 9 येथील पोलीस लाईट व्हॅन व इतर वाहने अधिग्रहित करण्यात आले आहे. तसेच महाविद्यालय व ग्रामस्तरावरही पूर परिस्थिती ओढावल्यास काय करावे व काय करु नये, जीवितहानी टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजना, प्रथमोपचार आदींबाबत जनजागृती करण्यात आली आहे.

  रंगीत तालीम (मॉकड्रिल)

  जिल्ह्यामध्ये आपत्ती व्यवस्थापनाबाबत दिलेल्या प्रशिक्षणाची रंगीत तालीमही घेण्यात आली आहे. यामध्ये प्रशिक्षणार्थींना पूरात वाहून जाणाऱ्यांना वाचविण्यासंबंधी मार्गदर्शन करण्यात आले. शोध बचाव पथकामार्फत बोट हाताळणे, बुडणाऱ्यांना उपलब्ध साधनांव्दारे वाचविणे, स्थानिक साधन सामुग्रीव्दारे स्वत:चे प्राण वाचविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

  जिल्ह्यात नैसर्गिक आपत्ती ओढावल्यास मदतकार्यासाठी 47 लक्ष 38 हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. पूर, चक्रीवादळ, जखमींना सहाय्य, मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना सहाय्य, मदत केंद्रामध्ये निवारा, अन्न, औषधे, घरे दुरुस्ती, पुर्नबांधणी, पशुधनासाठी शेतकऱ्यांना सहाय्य आदी बाबींसाठी हा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत जिल्हास्तरावर समिती गठीत करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष पवनीत कौर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तथा सह अध्यक्ष अनिरुध्द देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सदस्य अविशांत पंडा, जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) तथा सदस्य अविनाश बारगड, जिल्हा शल्य चिकित्सक तथा सदस्य डॉ. प्रमोद निरवणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता तथा सदस्य सुनील थोटांगे तसेच निवासी उपजिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव आशिष बिजवल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

  नैसर्गिक आपत्ती काळातील महत्त्वाचे दूरध्वनी क्रमांक
  * राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक (NDRF), पुणे - 02114-231509
  * आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, मुंबई - 22-22025274/022-22837259
  * नियंत्रण कक्ष, मंत्रालय, मुंबई - 022-22027990/022-22026712
  * राज्य राखीव पोलीस दल, नागपूर - 0712-2564973-2560543
  * नियंत्रण कक्ष पोलीस विभाग - 100
  * जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती - 0721-2662025,2661355
  * आपत्कालीन टोल फ्री क्रमांक - 1077
  * अग्निशामक विभाग (मनपा) - 101,0721-2576423
  -श्रीमती अपर्णा प्रकाशराव यावलकर
  माहिती अधिकारी,
  जिल्हा माहिती कार्यालय,अमरावती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या