अमरावती (प्रतिनिधी) : खरीप हंगामासाठी कर्जपुरवठ्याची प्रक्रिया राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांकडून संथगतीने होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. पावसाला सुरूवात होत असून, अधिकाधिक गरजू शेतकरी बांधवांना कर्ज मिळण्यासाठी कर्जवितरणाला गती द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज येथे दिले.
जिल्हाधिका-यांनी महसूलभवनात बँकर्सची बैठक घेऊन खरीप पतपुरवठ्याचा आढावा घेतला. जिल्हा उपनिबंधक राजेश लव्हेकर, अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक जितेंद्रकुमार झा यांच्यासह विविध बँकांचे अधिकारी उपस्थित होते.
यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यात कर्जपुरवठ्याचे 1 हजार 400 कोटींचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत 833 कोटींहून अधिक रकमेची कर्जप्रकरणे मंजूर असून, संपूर्ण उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कामाला गती द्यावी. कुठेही तांत्रिक व प्रशासकीय अडचणी येत असतील तर त्यावर तत्काळ तोडगा काढावा तथापि, कुठल्याही परिस्थितीत कर्जवितरणाची प्रक्रिया मंदावता कामा नये, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले. मान्सून लक्षात घेता या कामात तत्काळ सुधारणा करावी. पुढील आठवड्यात पुन्हा आढावा घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या