अमरावती (प्रतिनिधी) :महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना संपूर्ण राज्यात कार्यान्वित करण्यात आली आहे. मध केंद्र योजनेमध्ये मध उद्योगासाठी मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरूपात 50 टक्के अनुदान व 50 टक्के स्वगुंतवणुक, शासनाची हमी भावाने मधखरेदी, विशेष छंद प्रशिक्षणाची सुविधा, मधमाशा संरक्षक व संवर्धनाची जनजागृती याबाबत सहाय्य करण्यात येणार आहे.
मध केंद्र योजनेनुसार वैयक्तिक मधपाळ अर्जदार हा साक्षर असावा. तसेच त्याचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे. स्वत:ची शेती असल्यास त्या अर्जदारास प्राधान्य देण्यात येईल.
केंद्रचालक प्रगतीशील मधपाळ व्यक्ती किमान दहावी उत्तीर्ण असावा. त्याचे वय 21 वर्षापेक्षा जास्त असावे. अशा व्यक्तीच्या नावे किमान एकर जमीन अथवा त्या व्यक्तींच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावे किमान एक एकर शेत-जमीन किंवा भाडे तत्त्वावर घेतलेली शेत जमीन असावी. केंद्रचालक प्रगतीशील मधपाळाकडे मधमाशापालन, प्रजनन व मध उत्पादनासंबंधी इच्छुकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी.
मध केंद्र योजनेचा लाभ घेण्यासाठी केंद्रचालक संस्था नोंदणींकृत असावी. संस्थेच्या नावे अथवा भाडे तत्त्वावर घेतलेली किमान एक हजार चौरस फूट एवढी इमारत असावी. संस्थेकडे मधमाशापालन, प्रजनन व मध उत्पादनासंबंधी इच्छुकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी. लाभार्थी निवड प्रक्रियेनंतर प्रशिक्षणापूर्वी मध व्यवसाय सुरू करण्यासंबधी मंडळास बंधपत्र लिहून देणे अनिर्वाय राहील. याशिवाय मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे अनिर्वाय राहील.
अधिक माहितीसाठी जिल्हा उद्योग केंद्राचे जिल्हा ग्रामद्योग अधिकारी यांच्याशी दुरध्वनी क्रमांक 0721-2662762 तसेच मधुक्षेत्रिक पी. के. आसोलकार यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 8208497189 यांच्याशी संपर्क साधावा. तसेच महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामद्योग मंडळ, संचालक मधमहासंचालनालय, शासकीय बंगला क्रमांक 5, मु. पो. ता. महाबळेश्वर, जिल्हा -सातारा पीन कोड क्रमांक-412806, दुरध्वनी क्रमांक 02168-260264 येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी केले आहे.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या