Header Ads Widget

आता तरी येना...

  आतातरी येना । आसुसली काया ।
  चिंबचिंब व्हाया । धरा म्हणे ।।
  चिमनी पाखरं। चिवचिव करी ।
  त्यांना कोण तारी । मेघराजा ।।
  पिल्लाविना माय । कासाविस होई ।
  चित्त नाही ठाई । रानीवनी ।।
  बाप वावरात । नांगरणी करी ।
  खाऊन भाकरी । कोरडीच ।।
  शेतकरी माझा । पिकवून दाना ।
  तृप्त करी जना । सदोदित ।।
  त्याचिया लेकरे । झोपती उपासी ।
  पाय हे पोटासी । घेवोनिया ।।
  फाटलेले मन । अवघेया जना ।
  शिवता येईना । तुझ्याविना ।।
  येवू देगा दया । सर्व पामराची ।
  तुझ्या लेकराची । दयाघना ।।
  सोसवेना मना । दुष्काळाच्या वेणा
  सांगू आता कुणा । मायबापा ।।
  अवघ्या जगाची । चावी तुझ्या हाती ।
  करू नको माती । लेकराची ।।
  विनंती अरूण । करी पावसास ।
  करूणाकारास । मनी घेजो ।।
  -अरूण विघ्ने
  वर्धा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या