Header Ads Widget

कृषी विभागाची धडक कारवाई ; बनावट डीएपी खताची ८८ हजार रू.ची ६३ पोती जप्त

    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : भातकुली तालुक्यात एका विक्रेत्याकडून बनावट डीएपी खतांची घरपोच विक्री होत असल्याच्या गोपनीय माहितीच्या आधारे कृषी विभागाच्या जिल्हा भरारी पथकाद्वारे सोमवारी कारवाई करण्यात आली. त्यात बनावट डीएपी खताची ८८ हजार रू.ची ६३ पोती जप्त करण्यात आली.जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. कृषी विकास अधिकारी जी. टी. देशमुख, अजय तळेगावकर, दादासो पवार, अश्विनी चव्हाण, उध्दव भायेकर, पवनकुमार ढोमणे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

    एका विक्रेत्याकडून घरोघर फिरून ऑर्डर घेऊन बनावट डीएपी खताची घरपोच विक्री होत असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली. त्यानंतर पथकाने खारतळेगाव येथील शेतकरी बांधवांशी चर्चा करून चौकशी केली. त्यात सात शेतकऱ्यांनी बनावट खते खरेदी केली असल्याचे आढळून आले. त्यानुसार संबंधित सात शेतकरी बांधवांकडून तक्रार दाखल करण्यात आली व तक्रारीच्या आधारे विक्रेता मिलिंद वानखडे (ढंगारखेडा, ता. भातकुली) यांच्याविरोधात चांदूर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे व वलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.सर्व शेतकरी बांधवांनी अधिकृत विक्रेत्याकडूनच खते खरेदी करून त्याचे पक्के बिल घ्यावे, तसेच कुणी व्यक्ती घरपोच कमी किमतीचे खते विक्री करत असल्यास त्याबाबत माहिती कृषी विभागास द्यावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान व कृषी विकास अधिकारी जी. टी. देशमुख यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या