Header Ads Widget

आईपणाला बहाल केलेला आत्मा ! म्हणजे आई म्हणते....

  "आई म्हणते ....." आई म्हणजे ईश्वर आणि या ईश्वराचं म्हणणे ज्येष्ठ साहित्यिका डॉ .नयनचंद्र सरस्वते यांनी आपल्या 'आई म्हणते ... 'या काव्यसंग्रहात आपल्या लेखणीने प्रत्यक्षात उतरवले आहे. आईची महती जगतज्ञात आहे . तिच्या भोवतीचं लेकराचं सारं विश्व फिरत असते . प्रत्येकाची आई सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत काही ना काही सारखं म्हणत असते. प्रेम, राग, सूचना, समज, कौतुक, लाड अशा कितीतरी भावना व्यक्त करत राहते. लेकरू ते ऐकत राहते. कधीकधी आई सारखं बोलत राहते म्हणून नेहमी दुर्लक्ष करणारी काही लेकरं असतात ,परंतु आईपासून थोडा वेळ जरी लांब गेली तरी त्यांच्या मनात , डोक्यात सारखं येत राहते आई म्हणते ... ! ही भावना कवयित्रींनी आपल्या कविता कवितासंग्रहात अतिशय सुंदररित्या कवितेतून मांडली आहे.

  ओंजळीतले कुंकू तांबडे
  आई लावते भाळावरती
  आणि म्हणते माझी अंबिका
  मांड ठोकते काळावरती

  काव्यसंग्रहाच्या पहिल्या रचनेत आई आपल्या लेकीला ओंजळीतले जेव्हा कुंकू लावते.तेव्हा आईला आपल्या लेकीत साक्षात अंबिकेचे दर्शन होते.तिचं ते रूपं आईला इतके मोहावते की,आपली लेक किती भारदस्त दिसते आहे. कितीही संकट आपल्या लेकीवर आले तरी ती सामर्थ्यवान आहे आणि म्हणून आईला आता कसलीही भीती वाटत नाही .कारण काळ कसाही आला तरी माझं लेकरू मांडी ठोकून,निधड्या छातीने संकटाचा सामना करीन.असा विश्वास आई स्वतःच्या आणि आपल्या लेकराच्या मनात निर्माण करीत आहे.

  ग्रह तारका आणि नक्षत्रे
  तिच्या नजरेच्या धाकामध्ये
  स्थान बदलती वक्री होती
  तिच्या बदलत्या हाकामध्ये

  आईच्या नजरेच्या धाकाला कवयित्री ग्रह,नक्षत्र ,तारे यांची उपमा दिली आहे. कारण आईच्या हाकेवर लेकराला कळतं आज कोणता राग (ग्रह) वक्री होणार.का ? प्रेमळ (तारका) आपल्यावर प्रेम बरसवणार की, कोणतं नक्षत्र आपल्यावर सुखाची बरसात करणार.अतिशय सुंदर उपमा आईच्या हाकेला डॉ. नयनाचंद्र ताईंनी आपल्या या कवितेत दिली आहे.

  पदरामध्ये आग घेऊनी
  पाय चालले वेदीभोवती
  आई म्हणते सात जन्माचे
  नाते बांधले वाऱ्याभोवती
  खांद्यावरच्या उपरण्याला
  सात जन्माची गाठ बांधली
  आणिक माझ्या पदरामध्ये
  सात जन्माची आग सांडली

  या कवितेतून आईने आपल्या भावना सांगण्याचा प्रयत्न करते आहे.सात जन्मासाठीच्या नवऱ्याबरोबर देवाच्या साक्षीने लग्नाची गाठ बांधली आहे तो नवरा कसाही असला, तरी मला मात्र माझ्या कुटुंबासाठी सर्व सुख-दुःख सहन करत माझ्या लेकरासाठी मला नवं विश्वं उभ करायचंय आणि त्यासाठी माझ्या पदरात जरी आग सांडली तरी ती मला सोसायचे आहे फक्त आणि फक्त माझ्या लेकरासाठी ! यासाठीच माझे सारे जीवन आता मी अर्पिले आहे. येथे आई ही 'त्यागमूर्ती'कवयित्रीने यशस्वी उभी केली आहे.

  शिवार सारे रडते आणि
  म्हणते माझा मालक गेला
  आई म्हणजे आई असता
  कशास अश्रू हिरव्या डोळा
  घाम गाळते जीव जाळते
  आणि जाळते स्वप्न बावळे
  भूक कोवळी तिच्या पिलांची
  फुलून येते रूप कोवळे

  साऱ्याचे धैर्य खचले तरी आईचे धैर्य खचलेले नसते. आपल्या कुंकवाचा धनी जरी आपल्याला आणि आपल्या मुलांना सोडून गेला, तरी आई धैर्याने उभी राहते. जगाला तर सांगतेचं पण शिवार (रान ) ला सांगते.कवयित्री अतिशय समर्पक उपमा (कशाचा अश्रू हिरव्या डोळा )अशी दिलेली आहे. कवयित्री आईचे सामर्थ्य जगाला सांगू पाहते आहे. पुरुष जरी हरलाआणि मृत्यूला कवटाळले तरी स्री मात्र कधी माघार घेता येत नाही.कारण तिचं वात्सल्य तिला हरु देत नाही. तर तिला सामर्थ्यवान बनवते.येथे वात्सल हे सामर्थ्याची कसे जोडले गेले आहे हे सांगण्याचा त्यांचा प्रयत्न अतिशय यशस्वी, प्रभावी ठरतो.

  कूस आईची दूर राहिली
  आणि आटली गंगा पान्ह्याची
  जाब मागती घुंगरूवाळे
  रात्रीला मग क्रूर गुन्ह्याची

  स्त्रीभृण हत्या वर अतिशय समर्पक ताशेरे ओढण्याचे काम कवयित्रीने आपल्या कवितेत केले आहे. वंशाच्या दिव्या साठी मुलीची भ्रूणहत्या केली जाते. पण याचा खरा भावनिक त्रास आईला होतो कारण तिचा श्वास हा वेशीवर पुरलेला असतो आणि घरात तिच्या देहाची तडफड होत असते.ही आईच्या वात्सल्याची 'तगमग'या कवितेत कवयित्री मांडतात.

  लाल रेशमी पोतजरीचा
  बापाने मज खास घेतला
  पुढे मोजूनी छातीस महिने
  कोट फाटका त्याने घातला

  आपल्या माहेरच्या आठवणी आईने या ओळीतून सांगितल्या आहेत. वडिलांनी आपल्या मुलीच्या लग्नात किती खर्च केला.आपल्या लाडक्या लेकीला सुख लागवं म्हणून कर्ज काढून ते फेडीत राहिले. पण चांगल्या घरीचं मुलीचं लग्न लावून दिलं.अस मुलीचं बापाचं नातं किती भावनाशील असतं हे कवयित्री या ओळीत सांगतात-

  दुःख सांगते कारंड्याला
  देव्हाऱ्यातील लंगड्याला
  प्रारब्धाचे तुटले टाके
  टाचत बसते अंगड्याला

  आईचे दुःख वेदना अंतर्मनातील कोलाहल ती कोणाला सांगत नाही. स्वतःशीच बोलत राहते.निसर्गाशी हितगूज करत राहते. त्यामध्ये झाडे, वेली, फुले, नदी, शिवार, पक्षी प्राणी, पक्षी, अलंकार, अगदी कुंडीतलं रोपटं असलं ना त्याला ती आपल्या वेदना सांगते,पण घरात दुसऱ्या कोणालाही ती, आपल्याला काय हवे हे सांगत नाही. येथे कवयित्रीने आईच्या अंतर्मनाचा ठाव घेतला आहे. सकाळ संध्याकाळ आपल्या कुटुंबाच्या उन्नतीसाठी देवाकडे मागणे मग ते पुन्हा पुन्हा नव्याने जन्म या घरासाठी मागते.

  असा कसा तो रोग कोणता
  कुठून आला ठाऊक नाही
  गेला जर का पोर लाडका
  दर्शन त्याची झालेच नाही
  आता येईल हाक देईल
  आणि म्हणेल आई आई
  खरंच असे घडेल का हो
  हाक देईल का आई आई

  कवयित्रीला खूप मोठा प्रश्न पडला आहे.या आईची समजूत कशी काढावी. कारण या आईचा मुलगा या महाभयंकर कोराना साथीत गेला आहे.ही आई आपल्या जीवाच्या तुकड्याला पाहू ही शकली नाही .तिला वाटत आहे.तो अजून शहरात काम करतो. तो आपल्याला भेटायला येणार आहे. म्हणून ती सतत पारावर बसून त्याची वाट पाहत आहे वेड्यासारखी !आईची वेडीमाया कवयित्री येथे सांगते त्यांनाच असा प्रश्न पडला आहे का ? ही वात्सल्याची मूर्ती आई शब्द ऐकण्यासाठी इथे बसली आहे. तिचे कान आसुसले आहे आणि तिला ती हाक येईल का आई आई ...सकाळपासून रात्रीपर्यंत घरातील प्रत्येकाची काळजी आई घेते .प्रत्येकाच्या पोटाची भूक तिच्या हाताच्या सुग्रास भोजनाने मिटते हे सांगताना कवयित्री सांगतात.

  भातावरती मध ओतुनी
  मधाळ पिंड आई मळते
  आणि म्हणते वेड्या रुद्राला
  भूक निर्लज्ज फार छळते

  प्रत्येक लेकीला तिचं माहेर मिळावा म्हणून आईला आपल्या सासरी किती त्रास झाला तरी नांदावेचं लागते.हे सांगताना कवियित्रीन अतिशय भावनिक साद घातली आहे.

  आई जळाली अश्रू जळाले
  आणि जळाले माहेर माझे
  जपावे माहेर थोडे
  म्हणून आता जगणे माझे

  स्त्रीचे सौंदर्य कितीही मोहिनी घालणारी असले तरी शेवटी तिला बाईपणाची साक्षी ही आई होऊनच दयावी लागते. हे सांगताना कवयित्री म्हणतात.

  बाईपणाची एक निशाणी
  आणि प्रतीक सुंदरतेची
  आणि असेच काहीबाही
  शेवटी खूण आईपणाची

  समाजाच्या आणि घराच्या जाचामुळे कधी वेडी होत असेल, तरी वेडी आई ही आपल्या लेकरावर तितक्याच प्रेमाने जीव ओवाळून टाकते. तिचं ते लेकरावरचं प्रेम पाहून कधीकधी निर्जीव वस्तूचाही कंठ दाटून येतो.

  कोपऱ्यातल्या खोलीमध्ये
  आई बिचारी बसे एकटी
  मला पाहता खुणा करूनी
  बोलत राही खुळी एकटी
  आई आणिक लेकीमध्ये
  हा असा दुरावा वाढत गेला
  माय लेकीचे दुःख पाहून
  जीव वाड्याचा कापत गेला

  आपल्या घरासाठी अहोरात्र झटणारे घरातील एकमेव स्त्री म्हणजे आई ! तिच्या असण्यावर घराचं संपूर्ण अस्तित्व अवलंबून असते.आई घरातील प्रत्येक सजीव-निर्जीव गोष्टीशी इतकी एकरूप होते, की त्या सर्व गोष्टी आईच्या आज्ञेनुसार जणूकाही घरातील सदस्यची काळजी घेतात. त्यांना सुखावत असतात. सर्वांना प्रेमाच्या बाहुपाशात अडकणारी एकमेव दुवा म्हणजे आई ! तिचं म्हणणे हे अनंत कालापर्यंत टिकणारे बोल असतात.कवयित्रीच्या या ओळी अखंड ब्रम्हांडाची साक्ष देतात.

  माझ्यापासून माझ्यापाशी
  मीच ब्रह्मांड माझाच पिंडा ....

  'आई म्हणते... ' या काव्यसंग्रह आईच्या अंतर्मनाचा आईच्या असण्या नसण्याचा, घरपणाच्या, सजीव-निर्जीव जाणीवेचा, बेगडी समाजव्यवस्थेचा, तिच्या आईपणाच्या, एकंदरीत संपूर्ण विश्व जिच्या मध्ये सामावले त्या ब्रम्हांडाचा ! खराखुरा परमार्श कवयित्री डॉ. नयनचंद्र ताईनी उलगडला आहे. हा काव्यसंग्रह म्हणजे आईपणाला बहाल केलेला अमूल्य आत्मा ! ज्येष्ठ साहित्यिका डॉ. नयनचंद्र सरस्वते ताई यांचा 2 जून 2022 रोजी नुकताच प्रकाशित झालेला काव्यसंग्रह - " आई म्हणते ... " हा खरंच वाचनीय आहे.

  * काव्यसंग्रह : आई म्हणते ...
  * कवयित्री : डॉ नयनचंद्र सरस्वते
  * प्रकाशन : काषाय प्रकाशन, पुणे
  * स्वागत मूल्य : 150/
  समिक्षण -विद्या प्रशांत जाधव
  (विप्रजा)
  शेवगाव . जि.अहमदनगर
  मो नं.9527738638

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या