Header Ads Widget

उद्यमशीलता अंगीकारून युवकांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे - राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू

  * अचलपूर येथे महारोजगार मेळावा
  गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

  अमरावती (प्रतिनिधी) : कौशल्य प्रशिक्षणातून रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. रोजगाराबाबत मार्गदर्शन करण्यासाठी वेळोवेळी अशा मेळाव्यांचे आयोजन करण्यात येईल. उद्योग व व्यवसायाच्या योग्य निवडीतून आजचा युवक आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतो असा विश्वास जलसंपदा व लाभक्षेत्र राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी मेळाव्यात सहभागी युवक-युवतींना दिला. अचलपूर येथील फातिमा विद्यालयात रोजगार नोंदणी अभियानांतर्गत आयोजित महारोजगार मेळाव्यात ते बोलत होते.सहायक कामगार उपायुक्त निलेश देठे, कर अधिकारी तुषार लांडगे, मंडळ अधिकारी राजेश बोडगे आदी यावेळी उपस्थित होते.

  रोजगाराच्या क्षेत्रात आव्हानांना तोंड देण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात परिश्रमातून प्राविण्य प्राप्त करुन आपले ध्येय निश्चित करावे. या मेळाव्याच्या माध्यमातून विविध कंपन्या रोजगार देण्यासाठी युवकांपर्यंत आल्या आहेत. त्यातून बेरोजगार युवकांनी आपले भविष्य घडवावे असे, श्री कडू यांनी यावेळी सांगितले.

  सुमारे दोन हजार युवक युवतींनी मेळाव्यात नोंदणी केली असून मुलाखत उत्तीर्ण करणाऱ्या उमेदवारांना कंपनीचे नियुक्तीपत्र श्री कडू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. टाटा मोटर्स, बायजु, फ्लिपकार्ट, बुल्स इंडिया, मिंडा ग्रुप, महिंद्रा अँड महिंद्रा आदी कंपन्यांना या मेळाव्यात पाचारण करण्यात आले होते. पुणे येथील 22, नागपूरच्या 15, औरंगाबाद येथील 10 आणि अमरावतीच्या 3 अश्या 50 कंपन्या रोजगार मेळाव्यात सहभागी झाल्या होत्या. बँकिंग, फायनान्स, रिटेल, ऑटोमोबाईल अशा विविध क्षेत्रातील कंपन्यांनी पात्र युवकांना नियुक्तीपत्र दिले.

  खोजनपूर ते चमक रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

  मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत अचलपूर येथे खोजनपूर चमक रस्त्याचे 2 कोटी 21 लक्ष रुपयांच्या निधीतून करण्यात येणाऱ्या कामाचे भुमीपूजन श्री कडू यांच्या हस्ते करण्यात आले. 5 कि.मी. निर्माण करण्यात येणाऱ्या रस्त्याचे डांबरी पृष्ठभागासह खडीकरण व मजबुतीकरण करण्यात येणार असल्याची माहिती संबंधितांनी दिली.

  कांदा खरेदी केंद्राचे राज्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

  अचलपूर येथील गांधी पुलाजवळ प्रायोगिक तत्त्वावर कांदा खरेदी केंद्र सुरु करण्यात आले असून या केंद्राचे उद्घाटन श्री कडू यांच्या हस्ते करण्यात आले. कांदा खरेदी केंद्रामुळे शेतकऱ्यांची कांदा साठवणूकीची समस्या सोडविली जाणार असून योग्य वेळी कांद्याची विक्री करण्यास मदत होणार असल्याचे राज्यमंत्र्यांनी सांगितले.या केंद्रात 50 टन कांदा साठविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान यांनी यावेळी दिली. शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक व प्रतिनीधी आदी यावेळी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या