अमरावती (प्रतिनिधी) : महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळातर्फे राजापेठेतील कामधेनू प्राकृतिक ऊर्जा केंद्राच्या सहकार्याने ‘सिंगल युज प्लास्टिक उत्पादनां’चे निर्मूलन व बंदीबाबत विविध विभागांची कार्यशाळा बचतभवनात आज घेण्यात आली. त्यात १४२ अधिकारी व कर्मचा-यांना प्रशिक्षण देण्यात आले.
रोहयो उपजिल्हाधिकारी राम लंके, नगरप्रशासन सहायक आयुक्त गीता वंजारी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रादेशिक अधिकारी राजेंद्र राजपूत, उपप्रादेशिक अधिकारी संजय पाटील, क्षेत्र अधिकारी जितेंद्र पुरते, सुरेंद्र कारणकर, प्रियश्री देशमुख, नंदकिशोर पाटील, निसर्ग मित्र नंदकिशोर गांधी, कर्तव्य फौंडेशनचे आशिष श्रीवास आदी उपस्थित होते.
कार्यशाळेद्वारे सहभागींना महाराष्ट्र प्लास्टिक व थर्माकोल अविघटनशील वस्तूंचे (उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी व साठवणूक) अधिसूचनेबाबत माहिती देण्यात आली. निसर्ग मित्र नंदकिशोर गांधी यांनी एकल वापर प्लास्टिक उत्पादने व वस्तूंच्या बंदीबाबत तांत्रिक माहिती दिली. प्लास्टिकबंदी लागू असलेल्या वस्तू व अपवाद याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.कार्यशाळेला जिल्ह्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतींचे अधिकारी व कर्मचारी, महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी, जिल्हा परिषद, महसूल विभाग, शिक्षण विभाग, पोलीस, वाहतूक विभाग, आरोग्य अधिकारी, कर निरीक्षक यांच्यासह वाशिम जिल्ह्यातून नगरपरिषदांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या