Translate

Recent in Technology

Advertisement

Breaking News

दलित पॅंथर चे यश आणि अपयश...!

  (29 मे 2022 ला दलित पॅंथर ला स्थापन होऊन पन्नास वर्षे होतात, 29 मे 1972 ला दलित पँथरची स्थापना झाली)

  पॅंथर म्हणजे चित्ता किंवा बिबट्या आणि पँथरचा कार्यकर्ता म्हणजे ज्याच्या अंगी चित्त्यासम आक्रमकपणा, लढाऊबाणा, निर्भीडपणा, जशास तसे उत्तर देण्याची धमक, अरे ला कारे म्हणण्याची तयारी, तारुण्य कुर्बान करण्यास सज्ज, बोलण्यात जोश आणि वागण्यात होश, कृतीमधील तळमळ, अन्याया विरोधातील एकजूट, समतेचा नारा, स्वातंत्र्याची पहाट, मानव मुक्तीचा संघर्ष, दबले आणि दाबले गेलेल्या लोकांचा आवाज, शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा, या त्रिसूत्री नुसार आचरण करणारा, भविष्य घडवण्यासाठी इतिहासापासून धडा घेऊन वर्तमानात लढा देणारा भीमसैनिक म्हणजे दलित पँथर.

  डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणा नंतर 3 ऑक्टोबर 1957 ला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ची स्थापना झाली. बी. सी. कांबळे आणि दादासाहेब गायकवाड यांच्या मतभेदानंतर, अवघ्या एक वर्षात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (दुरुस्त) आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (नादुरुस्त) अशी, फूट RPI मध्ये पडली. पुढील पंधरा वर्षात रिपब्लिकन पक्षाचे अनेक गट झाले. 1970 च्या दरम्यान 'पेरुमल' समितीचा अहवाल सादर झाला. ज्यामध्ये देशभरात दलितावर होत असलेल्या अन्याय अत्याचाराची आकडेवारी सहित माहिती होती. तो अहवाल पाहून दलित तरुणांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. अमेरिकेमध्ये 1966 ला ब्लॅक ( काळ्या ) लोकांनी 'ब्लॅक पॅंथर' नावाची संघटना स्थापन केली होती, ती एक आक्रमक संघटना होती. यामधून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रातील दलित युवकांनी 1972 ला दलित पँथरची स्थापना केली. याच दरम्यान कांशीराम साहेब हे सरकारी नोकरी सोडून RPI मध्ये कार्य करत होते. परंतु, काँग्रेस आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या अभद्र युतीमुळे त्यांनी त्यांचा मार्ग बदलला. कांशीरामजींनी 1973 ला बामसेफ नावाची कर्मचाऱ्यांची संघटना स्थापन केली. सरकारी नोकरदार बामसेफ मध्ये कार्य करू लागले, तर तरुणांनी दलित पँथर चे कार्य सुरू केले.

  भारतीय स्वातंत्र्याला पंचवीस वर्षे पूर्ण होत होते, त्यानिमित्त १५ ऑगस्ट १९७२ च्या ' साधना' विशेषांकात राजा ढाले यांचा "काळा स्वातंत्र्यदिन" हा लेख प्रसिद्ध झाला. या लेखाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली व दलित पॅंथरला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. तथाकथित स्वातंत्र्य हे आमचे स्वातंत्र्य नाही, आम्ही आज पण गुलामच आहोत. अशी क्रांतिकारी भाषा राजा ढाले यांनी वापरली होती. दलित पँथरने आपले उद्दिष्ट जाहीर केले. "दलितांचा मुक्तिलढा सर्वंकष क्रांती इच्छितो. भागश: बदल आम्हाला नको. आम्हाला आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रांत वरिष्ठ स्थानांवर आमचे प्रभुत्व स्थापन करावे लागेल. आता आम्ही अल्पसंतुष्ट राहणार नाही. आम्हाला ब्राह्मण आळीत जागा नको. आम्हाला साऱ्या देशाचे राज्य पाहिजे. आमचे लक्ष्य केवळ व्यक्ती नसून व्यवस्था आहे." फक्त हृदय परिवर्तन करून किंवा सनदशीर अर्ज, विनंत्या करून किंवा पारंपरिक शिक्षणाने बदल घडणार नाही, तर क्रांतिकारी मार्गानेच समाजामध्ये बदल घडेल असा विश्वास दलित पॅंथर ने तरुणांमध्ये निर्माण केला. वरळी दंगलीनंतर ही चळवळ संपूर्ण महाराष्ट्रात पसरली. महाराष्ट्रातील दलित अन्याय अत्याचाराविरोधात पॅंथरने आवाज उठवला, नामांतर आंदोलन, शिष्यवृत्ती आंदोलन, झोपडपट्टीतील प्रश्नावर आंदोलन, नवबौद्धांना सवलतीची मागणी, राखीव जागा, बेरोजगारी इत्यादी दैनंदिन प्रश्नावर दलित पॅंथर ने आक्रमक आंदोलने केली.

  नामदेव ढसाळ आणि राजा ढाले या दोन नेत्यांमध्ये मार्क्सवादी विचारांवरून मतभेद निर्माण झाले. नामदेव ढसाळ हे प्रजा समाजवादी पक्ष मधून दलित पॅंथर मध्ये आले होते. त्यामुळे त्यांच्यावर मार्क्‍सवादाचा प्रभाव होता. राजा ढाले हे पूर्णपने आंबेडकरवादी होते. आंबेडकरी चळवळीमध्ये मार्क्सवादाची भेसळ राजा ढाले यांना आवडली नाही. त्यामुळे दलित पॅंथर संघटनेत फूट पडली. नंतरच्या काळात राजा ढाले यांनी दलित पँथर बरखास्त करून 'मासमूवमेंट' सुरू केली. ढालेच्या या कृतीचा निषेध करून अरुण कांबळे, मनोहर अंकुश, रामदाम आठवले, दयानंद म्हस्के, ज. वि. पवार, गंगाधर गाडे, प्रितमकुमार शेगांवकर इत्यादी कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन दि. २८ एप्रिल १९७७ ला औरंगाबाद येथे 'भारतीय दलित पॅंथर'ची निर्मिती करून आपले कार्य चालू ठेवले.

  दलित साहित्याची निर्मिती याच काळात मोठ्या प्रमाणात सुरू झाली. पॅंथरच्या चळवळीमध्ये खूप सारे साहित्यिक सहभागी झाले होते. ज्यामधून दलितांचे अत्याचारग्रस्त जीवन जगाच्या वेशीवर टांगले गेले.'शंभर दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जगा' हा बाबासाहेबांचा मूलमंत्र घेऊन दलित पँथरने वाटचाल केली. शंकराचार्य ला चप्पल फेकून मारणे असो की तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री चरणसिंग यांच्या सभेमध्ये गोंधळ घालने असो, दलित पॅंथर आर-पार च्या लढाईस हमेशा तयार असे. आक्रमक भाषणे, विद्रोही लेखणी, लढाऊ बाणा, अन्याय अत्याचाराविरोधात जशाच तसे उत्तर देणे, ही दलित पॅंथर ची वैशिष्ट्ये होती.

  या वर्षी म्हणजे 2022 ला दलित पॅंथर ला स्थापन होऊन 50 वर्षे होत आहेत. त्यामुळे दलित पॅंथरची समीक्षा, चिकित्सा होणे आवश्यक आहे. दलित पॅंथर च्या नेतृत्वामध्ये दूरदृष्टीचा अभाव होता, त्यामुळे काही वर्षातच दलित पॅंथर संघटना गटा तटा मध्ये विखुरली गेली. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष बनवताना, संघटन कसे असावे? याची संरचना लिहून ठेवलेली आहे. संघटन हे सैन्या सारखे असते. 1) सरसेनापती सारखा पुढारी 2) ध्येय आणि धोरण 3) कार्यक्रम 4) राजकीय डावपेच आणि मुत्सद्देगिरी 5) शिस्त 6) सभासद 7) मूलभूत योजना 8) तत्वज्ञान, ही सर्व आठ घटक मिळून संघटन बनते. जर वरील 8 घटकांपैकी एक घटक नसेल तर अशा संघटनेला अपंग संघटना म्हणावे लागेल. दलित पॅंथर मध्ये सरसेनापती सारखा पुढारी नव्हता. शिस्तीचा अभाव दिसतो. तत्त्वज्ञानामध्ये मतभेद झाल्यामुळे दलित पॅंथर संघटना फुटली. राजकीय डावपेच आणि मुत्सद्देगिरी न जमल्यामुळे कित्येक पॅंथर प्रस्थापितांच्या पिंजऱ्यात अडकले. याउलट कांशीरामजी यांनी राजकीय डावपेच आणि मुत्सद्देगिरी करून, बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळ संकल्पनेला घेऊन 'बहुजन समाज पक्षाची' स्थापना केली. आणि उत्तर प्रदेशात राजकीय सत्ता मिळवली. दलित पँथरच्या धरतीवर चंद्रशेखर आजाद यांनी भीम आर्मी तयार केली. जी सध्या 22 राज्यांमध्ये कार्यरत आहे. दलितांची आक्रमक संघटना म्हणून नावारूपाला येत आहे.

  नामांतर आंदोलन आणि रिडल्स प्रकरण मध्ये आंबेडकरी चळवळीचा कमी फायदा आणि शत्रूचा जास्त फायदा झाला आहे दिसून येईल. नामांतराला विरोध करून शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे म्हणाले ' तुमच्या घरात नाही पीठ आणि कशाला पाहिजे तुम्हाला विद्यापीठ'. याचा परिणाम असा झाला की, जी शिवसेना मुंबई पुरती मर्यादित होती, ती शिवसेना महाराष्ट्राच्या गावागावात पोहोचली, त्या शिवसेना विरोधात दलित पॅंथर ने गावागावांमधून विरोध केला. राजकीय मुत्सद्देगिरी न जमल्यामुळे शत्रु संघटना दलित पॅंथरनेच वाढवली असे म्हणायला येथे वाव मिळतो. सध्या राज ठाकरे यांचे भोंगा विरोधी राजकारण सुरू आहे, राज ठाकरे ला काही दलित संघटना विरोध करत आहेत याचा परिणाम असा होईल,' जी मनसे मुंबई आणि नाशिक पुरती मर्यादित आहे ती मराठवाड्याच्या गावागावात पोहोचेल. प्रतिक्रियात्मक चळवळीचा शत्रूला फायदा होतो, आणि आपले नुकसान होते. तर क्रियात्मक आंदोलनाचा फायदा आपल्याला होतो आणि शत्रुला नुकसान होते.

  'जे लोक इतिहासापासून धडा घेत नाहीत त्यांना इतिहास धडा शिकवतो' किंवा ज्यांना भविष्य घडवायचे असते त्यांनी इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे'. दलित पँथरच्या इतिहासा मधून धडा घेऊन, नवा पॅंथर उभा राहिला पाहिजे. जो बाबासाहेब आंबेडकरांचे "समता, बंधुत्व, न्याय आणि स्वातंत्र्यावर आधारित नवा समाज आणि राष्ट्र निर्माण करणे" या उदात्त ध्येयासाठी कार्य करेल. भीमा कोरेगाव च्या युद्धापासून जशी आपण प्रेरणा घेतो तशीच प्रेरणा दलित पॅंथर च्या लढाऊ इतिहासापासून घेतली पाहिजे. आणि भविष्याची वाटचाल केली पाहिजे. आज प्रस्थापित शत्रू संविधानाला मानत नाही किंबहुना तो संविधानाच्या विरोधात आहे, साम-दाम-दंड-भेद आणि ईव्हीएम च्या वापरामुळे लोकशाही समाप्त होण्याच्या दिशेने आहे. प्रचंड आर्थिक दरी वाढली आहे. अर्जुन सेनगुप्ता रिपोर्टनुसार भारतातील 83 करोड लोकांचे उत्पन्न हे प्रत्येक दिवशी वीस रुपयाच्या आत आहे. दुसरीकडे अंबानी आणि अदानी यांची श्रीमंती वाढत आहे. धार्मिक दंगली पेटवल्या जात आहेत. या सर्व आव्हानांना पुरून उरणारा नवा ' आंबेडकरवादी पॅंथर ' निर्माण होणे ही सामाजिक चळवळीची गरज आहे.

  -सिद्धार्थ शिनगारे
  औरंगाबाद
  7798757923
  संदेश वाहक-अशोक तुळशीराम भवरे
  संविधान प्रचारक/प्रसारक, नांदेड

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code