Recent in Technology

Advertisement

Breaking News

सामाजिक न्यायप्रेरित व्यवस्था निर्माण करण्यासाठी योगदान सर्वांनी देऊया - आमदार सुलभाताई खोडके

  * शहरात समता दिंडीला मोठा प्रतिसाद
  * राजर्षी शाहू जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागाकडून विविध उपक्रम
  गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

  अमरावती (प्रतिनिधी) : राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांनी सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी मोलाचे कार्य केले. छत्रपती शाहू महाराजांना अभिप्रेत असणारी सामाजिक न्याय प्रेरित व्यवस्था निर्माण करण्यासाठी सर्वांनी योगदान देऊया, असे आवाहन आमदार सुलभाताई खोडके यांनी आज येथे केले.

  राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागातर्फे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे अध्यक्षस्थानी होते. डॉ. कमलाकर पायस, समाजकल्याण सहायक आयुक्त माया केदार, राजेंद्र जाधवर, राजेंद्र भेलाऊ, राजकुमार दासरवाड आदी उपस्थित होते.

  समता दिंडीला मोठा प्रतिसाद

  सामाजिक न्याय विभागातर्फे सकाळी शहरात समता दिंडी काढण्यात आली. प्रारंभी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इर्विन चौक स्थित पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. छत्रपती शाहु महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेचे(सारथी) वरिष्ठ प्रकल्प संचालक डी.डी.देशमुख, वरिष्ठ प्रकल्प संचालक यांच्या हस्ते दिंडीस हिरवी झेंडी दाखवून आरंभ झाला. दिंडीत समाजकल्याण कार्यालय, महामंडळांच्या अधिकारी- कर्मचा-यांसह विद्यार्थी, युवक, महिला व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. इर्विन चौकापासून दुर्गावती चौक, मालटेकडी अशी दिंडी निघून सामाजिक न्यायभवनात समारोप करण्यात आला.

  राजर्षी शाहू महाराज यांचे सामाजिक ऐक्यासाठी कर्तृत्व अनन्यसाधारण आहे. सामाजिक न्यायाच्या प्रस्थापनेसाठी त्यांनी कार्य केले. सामाजिक न्याय विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. त्यांचा लाभ घेऊन अभ्यास व शिक्षण पूर्ण करुन प्रगती साध्य करावी, तसेच राष्ट्र उभारणीस हातभार लावावा. विद्यार्थ्यांनी कायम एकात्मतेचा वसा अंगीकारावा, असे प्रतिपादन आमदार श्रीमती खोडके यांनी यावेळी केले.

  राजर्षी शाहू महाराज यांनी समाजातील विषमता मिटवण्यासाठी जीवन वेचले. समतेचे विचार त्यांनी कृतीत उतरवले. ते कृतीशील समाजसुधारक होते. सामाजिक न्यायाच्या प्रक्रियेतील त्यांचे योगदान मोलाचे आहे, असे श्री. पायस यांनी सांगितले. सामाजिक न्याय विभागाद्वारे विविध योजना-उपक्रमांद्वारे फुले, शाहू, आंबेडकर या महामानवांच्या प्रेरणादायी विचारांचा वारसा विद्यार्थ्यामध्ये रुजवून वाटचाल होत आहे. निवासी शाळांच्या निकालाची परंपरा अमरावती विभागातील सर्वच शाळांनी कायम ठेवावी, असे आवाहन श्री. वारे यांनी केले.

  आशिष मेटकर यांनी राजर्षी शाहू महाराजांवरील पोवाडा सादर करुन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. श्रीमती केदार यांनी प्रास्ताविक केले. श्री. जाधवर यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code