• Sun. May 28th, 2023

हे भटाळलेले लोक कसले गोर बंजारा ? : अग्निज्वालांचे आक्रंदन..!

    डॉ. प्रकाश राठोड यांचा ‘हे भटाळलेले लोक कसले गोर बंजारा?’ हा मुलाखतींचा आणि वैचारिक लेखांचा संग्रह नुकताच माझ्या वाचनात आला. हा ग्रंथ निखळ परिवर्तनवादी आशयाचा व विचारअन्वयनयुक्त ग्रंथ आहे. हा ग्रंथ गोर बंजारा समाजाच्या मर्मबंधातील फसव्या विचारांची समीक्षा करणारा आहे. गोर बंजारा समाज हा उजेडलाटांचा महासूर्य कवेत न घेता, शोषणकारी राजतंत्राच्या व्यवस्थेचे गुलाम होत आहे आणि ही गुलाम होण्याची प्रक्रिया निरंतर चालू आहे. या गुलाम होण्याच्या प्रक्रियेला लगाम लावण्याचे आणि या समाजाला स्वतंत्र आणि स्वयंदीप करण्याचे काम डॉ. प्रकाश राठोड करीत आहेत. त्यांच्या संशोधनपर वैचारिक लेखनाने आणि चिंतनशील स्वरूपाच्या मुलाखतीने गोर बंजारा समाजाला नव्या सत्वशील मूल्यजाणिवांचा परिचय करून देऊन तमाम अभावग्रस्तांच्या मनाच्या क्षितिजातून हरितक्रांतीचा सूर्योदय त्यांनी घडवून आणलेला आहे. या ग्रंथातील ध्येयवादी आशयाच्या मुलाखतीला आणि वैचारिक लेखसंग्रहाला प्रमोद वाळके ‘युगंधर’ यांची प्रस्तावना आहे. आपल्या प्रस्तावनेत या ग्रंथाचे सामर्थ्य नोंदवताना ते लिहितात, “एकूणच बहुजन समाज मरणासन्न होण्याची वेळ द्रुतगतीने पुढे येत आहे असे दिसते. यावेळी सामाजिक संघटनांची जबाबदारी वाढते .सामाजिक स्वास्थ्य बिघडू नये यासाठी मृत्यूतत्त्ववादी पांडित्याच्या व्हायरसला वेळीच नेस्तनाबूत करणे आवश्यक आहे. हे काम मेजर बनून करणे गरजेचे आहे. सामाजिक संघटनांनी ही धुरा सांभाळावी.” हे अवतरण डॉ. प्रकाश राठोड यांच्या मेजरतत्त्वाची क्रियाशीलता अधोरेखित करणारी आहे. तसेच आंबेडकरवादी विचारऊर्जेतून गोर बंजारा समाजाला नवा प्रकाशदीप दाखवणारा आहे.

    डॉ. प्रकाश राठोड हे सूर्यकुलाचे सुपुत्र आहेत. गोर बंजारा समाज काहीही म्हणोत त्यांनी स्वीकारलेला मार्ग उजेडलिपीचा अंजिठा खोदणारा आहे. हा मार्गच संविधानमय माणूस निर्मितीचा पथदीप आहे. आज त्यांच्या मार्गात अनेक काटे पसरलेले असले, तरी गुलाबाला काट्याशिवाय महत्त्व प्राप्त होत नाही. प्रकाश राठोड नव्या समाजमूल्यांच्या निर्मितीचा एल्गार पुकारत आहेत. आपले व परके याचे त्यांनी अत्यंत विलक्षणपणे अवलोकन केले आहे. ते प्रकाशयात्री आहेत. ते मूलतत्त्ववाद्यांची गुलामी नाकारतात. तथागत गौतम बुद्ध, संत सेवालाल महाराज, राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वसंतराव नाईक यांना ते आपला आदर्श मानतात. तांड्यातील अस्वस्थता त्यांना चिंतामय वाटते. आपल्या बांधवांनी असे अंधारात व अज्ञानात खितपत राहणे त्यांना कबूल नाही. म्हणून ते या युगनायकांच्या विचारांचा ज्वालामुखी घेऊन गोर बंजारा समाजाला दिशाहीन करणाऱ्या सार्‍या धूर्त वाटांवर तुटून पडतात. ते फक्त लिखाणातूनच बंड करत नाहीत, तर वास्तविक जीवनातही बंडखोरवृत्ती बाळगून वैचारिक क्रांतीची बिजे पेरत आहेत. ही वैचारिक क्रांतीची बिजे गोर बंजारा समाजाच्या नव्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय व शैक्षणिक बदलाला पूरक ठरतील यात शंका नाही.

    ‘हे भटाळलेले लोक कसले गोर बंजारा?’ हा ग्रंथ चार भागात विभागलेला आहे. पहिला भाग मुलाखतीचा, दुसरा वैचारिक लेखांचा, तिसरा पत्रसंवाद आणि चौथा भाग परिशिष्टाचा आहे. हे सगळेच भाग निखळ वैचारिक असेच आहेत. लेखकाच्या मनातल्या विविध अनुबंधांचे विश्लेषण करणारे हे भाग आहेत. पहिल्या भागातील ‘हे भटाळलेले लोक कसले गोर बंजारा?’ ही मुलाखत दिग्रस एक्स्प्रेसचे संपादक जगदीश भाऊ राठोड यांनी घेतली आहे. या मुलाखतीचा मुख्य हेतू समाजप्रबोधनाचा आहे. समाजावर येणाऱ्या धार्मिक अरिष्टांना उद्ध्वस्त करून गोर बंजारा समाजात समताधिष्ठित संविधानसंस्कृती रुजविणे हेच या मुलाखतीचे जन्मध्येय आहे. जातीचा केवळ जयघोष करून समाजाला पुढे नेता येत नाही, तर समाजाला संविधानध्येथी करून त्याला क्रांतिसन्मुख करणे हाच या मुलाखतप्रपंचाचा खरा हेतू आहे आणि हा हेतू डॉ. प्रकाश राठोड यांच्या ध्येयवादी दृष्टीतून साकार झालेला आहे. त्यामुळे नवे तत्त्वचिंतन मांडणारे मूलगामी चिंतन असेच त्यांच्या तत्त्वचिंतनाचे वर्णन करावे लागते.

    डॉ. प्रकाश राठोड यांची मुलाखत बंजारा समाजाला आणि एकूणच सर्व साधनवंचित लोकांना नवी दृष्टी देणारी आहे. ही दृष्टी देताना त्यांची भाषा विद्रोही रूप धारण करते. त्यामुळे समाजमने दुखावतात. परंतु तरीही त्याची तमा न बाळगता नावडते पण समाजहिताचे सत्य बेदरकारपणे ते मांडत राहतात.

    बंजारा समाज हा प्राचीन काळातील निसर्गपूजक व पूर्वजपूजक समाज होता. पण हा समाज वैदिक संस्कृतीच्या प्रभावाखाली आल्याने गौरी, गणपती, वटसावित्री, हळदीकुंकू, साईबाबा या अंधश्रद्धांच्या आहारी गेलेला आहे. संत सेवालाल महाराजांचे प्रखर क्रांतिकारी विचारही या समाजाने गुंडाळून ठेवले आहेत. त्यामुळे हा स्वत्वशून्य झाला आणि आपल्या मूळ समतावादी जीवनशैलीपासून तो वियुक्त झाला. इहवाद व समाजवाद हीच या समाजाची मूळ जीवनशैली होती. परंतु आर्यांनी या समाजाचे सांस्कृतिक अपहरण केले आणि हा समाज हिंदू धर्माचा एक भाग झाला. या दलदलीतून या समाजाने बाहेर पडावे हीच या लेखकाची सदिच्छा आहे. या उदात्त कार्यात सुशिक्षितांनी स्वतःला वाहून घ्यावे ही या लेखकाची उत्कटता आहे. म्हणून आपल्या मुलाखतीत ते म्हणतात, “सुशिक्षितांचं आकाश हे मातीचं असावं. आपण कोणत्या दलदलीतून आलो याचं स्वच्छ भान या वर्गाला असावं. या वर्गाला आपल्या जबाबदारीची गंभीर जाण असावी. आपल्या शिक्षणानं आपल्याला इथपर्यंत आणलं हे परमसत्य त्यांनी तांड्याला सांगावं. तांड्यातील मुलांना शिक्षणासाठी शहरात आणणारे प्रकल्प त्यांनी हाती घ्यावेत. तांड्याचे उरफोड नेक कष्ट फस्त करणाऱ्या गोष्टींवर त्यांनी तुटून पडावे. इतके जरी केलं तरी त्यांच्या चेहर्‍यावरील अपराधीपणाचे भाव दूर होतील” (पृ. ४१) ही भूमिका अत्यंत उदात्त आणि क्रांतिदर्शी स्वरूपाची आहे. आंबेडकरवादी विचारांचे बोट पकडून आपण मूल्यसापेक्ष समाज निर्माण करू शकतो, यावर ते अगदी ठाम आहेत. त्यांच्या या भूमिकेला लोकांनी विरोध केला. परंतु अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने त्यांनी या आरोपांचे खंडन केले आहे.

    बंजारा समाज हा गतिशीलच आहेत. त्याने नवनव्या गोष्टींचा स्वीकार केलेला आहे. पण आपले स्वत्व त्याने गमावले नाही. हा समाज अत्यंत क्रांतिकारी व लढवय्या आहे. कारण त्याने कधीही गुलामी पत्करली नाही. स्वतःच्या मनगटाच्या जोरावर आपले विचार, संस्कृती व भाषा त्याने टिकवून ठेवली आहे. पण हा समाज आज भरकटत चालला आहे. त्याची शारीरिक आणि वैचारिक भटकंतीही सुरूच आहे. काही थोडेथोडके लोक राजकीय व्यक्तींच्या स्वार्थामध्ये गुरफटून गेलेले आहेत. परंतु बहुसंख्य बंजारा समाज त्याच अंधाऱ्या गुहेत स्वतःचे जीवन कसेबसे जगत आलेला आहे. शिकले-सवरलेले अनेक बांधव स्वतःच्या समाजापासून दूर गेले आहेत. धर्म, साधू , महंत यांच्यामागे शिकलेले लोक जात आहेत. त्यामुळे गोर बंजारा समाजाचे मोठे नुकसान होत आहे. ही वास्तविकता मनाला गंभीर करणारी आहे. म्हणून पोहरागड हा परिवर्तनाचा दीपस्तंभ व्हावा व समाज सूर्यमुखी व्हावा हा महान क्रांतिकारी व हितकारी संदेश या मुलाखतीतून दिसून येतो.

    दै. पुण्यनगरीचे पत्रकार राकेश भीलकर यांनी घेतलेली त्यांची मुलाखतही अंतर्मुख कसणारी आहे. ‘शाहिरांनो, नुसते भजन सादर करायला येऊ नका, तर भजनात काय सादर करायचे आहे ते शिकायला या.’ या मथळ्याची ही मुलाखत विचारगर्भ स्वरूपाची आहे. या ग्रंथाच्या भाग दोनमध्ये बंजारा समाजाचे वैचारिक जीवन, बंजारांची धाटी आणि धाटीचे बंजारा, बंजारा साहित्य संकल्पना आणि स्वरूप, कोरोना धन्य तुझी करुणा, उद्या नसेल कोरोना तरीही…! महंत : बंजारा समाजाचे ब्राह्मणीकरण करणारे षडयंत्र, परमेश्वरश्रद्धेचे मानसशास्त्र हे वैचारिक लेख या भागात प्रकाशित झालेले आहेत. या वैचारिक लेखात बंजारा समाजासंबंधीच नव्हे तर वर्तमानातील देशपातळीवरील परिस्थितीचे अत्यंत गंभीर चिंतन त्यांनी मांडले आहे. तसेच बंजारा समाजात फोफावलेल्या अंधश्रद्धांचा त्यांनी सडेतोडपणे परामर्श घेतलेला आहे. संविधानसंस्कृतीच्या उदयापूर्वी ज्ञानबंदी, विचारबंदी आणि चिकिस्ताबंदी होती. या बंदीला महात्मा जोतीराव फुले यांनी जबरदस्त हादरे दिले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानसंस्कृतीची इथे रुजवात केली. संविधानाचे बोट धरून आंबेडकरी समाज मानवमुक्तीचे सूर्यगीत लिहू लागला. असे देखणे आविष्कार बंजारा समाजात साकार व्हावे हीच या लेखकाची तळमळ आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संत सेवालाल महाराज यांच्या क्रांती विधानातून स्फुल्लिंग चेतवून अंधार पेरणाऱ्या यंत्रणांना जाळून टाकणारे साहित्य निर्माण करणे हेच गोर बंजारा समाजातील प्रज्ञा – प्रतिभांचे ध्येय असावे, असेच या लेखकाचे म्हणणे आहे. ते लिहितात, “ज्या समाजाचे वाङ्मयीन पर्यावरण अप्रगत असते. ज्या समाजात विचार करणारी डोकी दुखी तिरस्कृत ठरतात, जो समाज विचार संघर्षाला घाबरतो तो शोषणव्यवस्थेला गोंजारणारा गुलाम मानसिकतेचाच समाज असतो. असा परतंत्र समाज हा वैचारिक दृष्ट्या रोगट समाज असतो. समाजाचे असे रोगट वैचारिक पर्यावरण हे एकूणच सामाजिक आणि सांस्कृतिक आरोग्याला हानीकारक असते.” (पृ. ४९) अशीच त्यांची ठाम समजूत आहे.

    खरेतर बंजारा हा वर्णबाह्य समाज आहे. तांडा म्हणजे बंजारा समाजाची लोकवस्ती. “तांड्याची एक स्वतंत्र अशी आचरणपद्धती आहे आणि ती सवर्णांहून वेगळी आहे. तांडा अवर्णच आहे. तो कालही अवर्णच होता आणि तो आजही अवर्णच आहे. भटके-विमुक्त, आदिवासी हे अवर्णच आहेत. इतकेच नव्हे तर एतद्देशीय सर्वच आद्यवासी लोक हे मुळातच अवर्णच आहेत.” (पृ. ५५) त्यामुळे धर्मकल्पनेशी या समाजाचा संबंध असण्याचे काही कारण नाही. हा निखळ इहवादी आशयाची धाटी जीवनशैली जगणारा समाज आहे. ते म्हणतात, “धर्म हा विज्ञाननिष्ठ अशयाच्या संविधानाच्या आणि संविधानातील समाजवादी लोकशाहीच्या विरोधी टोकाला जाऊन उभा आहे. म्हणून धर्माचा पुरस्कार करणारे आणि संविधानाचा तिरस्कार करणारे लोक हे गोर धाटीचे लोक असू शकत नाही.” (पृ. ५६) धाटी जीवनशैली समाजात रुजावी, या समाजाचे सांस्कृतिक अधःपतन होऊ नये आणि हा समाज एक संध राहावा यासाठी पोहरादेवी, आसोला आणि गहुली या तीन स्थळांमध्ये सांस्कृतिक सामंजस्य असले पाहिजे असे डॉ. राठोड यांचे म्हणणे आहे.

    गोर बंजारा समाजाची राजकीय आणि सांस्कृतिक सूत्रे गहुलीतून हलावीत, सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक सूत्रांचे संचालन पोहरादेवीमधून व्हावे, ही अत्यंत अन्वर्थक भूमिका त्यांनी घेतलेली आहे. अर्थात यामागे या समाजाचे हिंदूकरण होऊ नये हीच त्यांची प्रांजळ भूमिका असल्याचे दिसून येते. म्हणूनच अलीकडे पोहरादेवीच्या महाराज लोकांना लागलेली महंत ही उपाधी त्यांना या समाजाचे ब्राह्मणीकरण करणारे षडयंत्र वाटते. बंजारा समाजाच्या अज्ञानाचा फायदा घेत या समाजाच्या धाटी जीवनशैलीची मोडतोड करणारे अनेक कृतिकार्यक्रम तिथे राबविले गेले. ‘महंत’ ही उपाधीदेखील डॉ. राठोड यांना त्याचाच एक भाग वाटते. ते म्हणतात, “गोर बंजारा समाजातील महाराजांना महंत करणारे हे कृती कार्यक्रम होत. यामागील धर्मकारण, संस्कृतीकारण आणि राजकारण आपण समजून घेतले पाहिजे. हे समजून घेतले नाही तर गोर बंजारा नावाची विज्ञानवादी जीवनदृष्टीची एक महान मानवतावादी संस्कृती आपण गमावून बसू.” (पृ. ७६) हे होऊ नये यासाठी ते समाजाला विवेकाची कास धरा असे आवाहन करतात. ते म्हणतात, “डोक्यातला विवेक मेला की डोकं नुसतं हेअरस्टॅन्ड बनतं. त्याचं विवेकाशी असलेलं नातं पार तुटून जातं. म्हणून धर्मवादी, ईश्वरवादी, अध्यात्मवादी लोक विवेक मारणारे कार्यक्रम सतत राबवत असतात. विवेक मेला की माणूस गुलामच होतो. तो परमआज्ञाधारीच होतो आणि आपल्या जगण्याचा रिमोट परमेश्वराच्या हाती तो देऊन बसतो. माणूस परतंत्र होतो आणि जाती, धर्म या गोष्टीच त्याचा डोळा बनतो आणि मेंदूही बनतो.” (पृ. ७८) असे सडेतोड विचार ते मांडतात. हे विचार वर्तमानातील अंधभक्तांच्या खोगीरभरतीचा परामर्श घेणारे आहेत.

    या ग्रंथाच्या भाग तीनमध्ये पत्रसंवाद आहे. यामधून बंजारा समाज बांधवांना त्यांनी अत्यंत कळकळीने आवाहन केले आहे. हे आवाहन करताना “तुम्ही उजेडमार्गी आहात की अंधारमार्गी, तुम्ही मनुस्मृतीवादी आहात की संविधानवादी, तुम्ही विज्ञानवादी आहात की अवैज्ञानिकवादी, तुम्ही संघवादी आहात की सेवालालवादी असे थेट सवाल त्यांनी केले आहेत. हे अंतर्मुख करणारे सवाल बंजारा समाजाला नवे विचारसामर्थ्य देणारे सवाल आहेत.

    डॉ. प्रकाश राठोड यांनी ‘पत्रसंवाद’ या तिसऱ्या भागामधून आणि एकूणच ग्रंथातून बंजारा समाजापुढे निर्वाणीचे प्रश्न उभे केलेले आहेत. त्यामुळे भटाळलेल्या लोकांनी त्यांच्यावर आरोप केले. परंतु विचलित न होता त्यांनी त्या आरोपांचे खंडन केले आहे. डॉ. प्रकाश राठोड हे परिवर्तनशील स्वभावाचे लेखक आहेत. समाज क्रांतिसन्मुख बनावा हीच त्यांची प्रामाणिक धडपड असल्याचे दिसून येते. बंजारा समाज बदलावा, तो विज्ञाननिष्ठ व्हावा हीच त्यांची उत्कटता आहे. त्यामुळे त्यांचे चिंतन बंजारा समाजाला आणि या समाजाच्या साहित्याला नवे मूल्यभान देणारे चिंतन आहे.

    ग्रंथाच्या शेवटच्या चौथ्या भागात परिशिष्टे आहेत. अक्रम पठाण, विजय जाधव, सर्जनादित्य मनोहर, रमेश राठोड, मनोहर नाईक, प्रमोद वाळके, सुभाष चव्हाण, प्राचार्य एन. पी. चव्हाण या मान्यवर प्रतिभांचे लेखकांच्या कार्यकर्तृत्वाला पाठिंबा देणारी विचारपत्रे आहेत. लेखकाच्या प्रतिभेतील सामर्थ्याचा अग्नी प्रज्वलित करणारे हे त्यांचे सहपाठी आहेत. हे सहपाठी त्यांच्या अंतर्मनात नव्या मूल्यमंथनाची बाराखडी सतत तेवत ठेवतात.

    या प्रकारे डॉ. प्रकाश राठोड यांचा ‘हे भटाळलेले लोक कसले गोर बंजारा?’ हा वैचारिक लेखसंग्रह संशोधनात्मक मूल्यदृष्टीचा अविष्कार आहे. शब्दाची शक्ती व मानवी नाते यांचे संमिश्र समागम या पुस्तकात पाहायला मिळते. असत्याची कोणतीही किनार त्यांच्या लेखनात आढळून आलेली नाही. भविष्यातील गोर बंजारा समाज आंबेडकरांची संविधानऊर्जा घेऊन आपल्यातील विषमतामयतेचा सर्वनाश करून खरा भारतीय माणूस म्हणून साकार होईल अशीच या पुस्तकाची सदिच्छा आहे. त्यामुळे हा ग्रंथ गोरबंजाराच नव्हे तर एकूणच मराठी साहित्यातील अग्निज्वालांचे आक्रंदन प्रस्फुटित करणारा मौलिक दस्तावेज ठरला आहे. या ग्रंथातील हे आक्रंदन समाजाने समजून घेऊन त्यातून नवा प्रज्ञानी माणूस निर्माण व्हावा अशी मी आशा करतो आणि डॉ. प्रकाश राठोड यांना पुढील लेखनासाठी सदिच्छा देतो.

    -संदीप गायकवाड,
    नागपूर
    भ्रमणभाष : ९६३७३५७४००

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *