• Tue. Jun 6th, 2023

ही तर शक्तिमानची दुसरी आवृत्ती……

  पुण्यातील एका बातमीने हृदय पिळवटून निघाले. “मोबाईलमुळे एका छोट्या मुलाने केली आत्महत्या…..” या बातमीने खरंच प्रत्येकाच्या मनाचा वेध घेतला. जीवन अजून नीटस सुरू झालं नाही तोपर्यंतच एक चिमुकलं बाळ मोबाईलमुळे जीव गमवातो !! केवढं गंभीर आहे हे? आणि ही आत्मपरीक्षण करण्यासारखी बाब नाही का? आपणा सर्वांना आठवत असेल काही वर्षापूर्वी शक्तिमान ही मालिका पाहून एका छोट्या मुलांने शक्तिमानचे अनुकरण केले होते. आणि आपला जीव गमावला होता. कारण लहान मुले ही अनुकरणप्रिय असतात. अनुकरण चांगल्या गोष्टींचं करावं की वाईट गोष्टीच करावं याचं ज्ञान मुलांना नसतं. मुले निरागस असतात. निष्पाप असतात.

  आता हेच पहा ना लॉकडाऊन झालं आणि मोबाईलचा वापर घरोघरी छोट्या पासून मोठ्या पर्यंत प्रत्येकाचा सखा सोबती झाला. मोबाईल मधल्या अनेक गोष्टी मुलांना सहज येऊ लागल्या. तुम्हा आम्हा सर्वांनाच अनेक गोष्टी मोबाईलने दिल्या. खंड पडलेला शिक्षण प्रवाह चालू ठेवला, दूर राहणारा नातेवाईक जोडला गेला, घरात बसून दूर दूर च्या घडामोडी कळू लागल्या, आर्थिक व्यवहार सहज होऊ लागले, नवनवीन पदार्थ, नवीन नवीन वस्तू, नवे ज्ञान मिळू लागले… परंतु हे सगळं जरी खरं असलं तरी कुठेतरी काहीतरी चुकतेय मात्र नक्की!

  वरील बातमी वाचली की या सर्व गोष्टी मिळून सुद्धा तंत्रज्ञान शून्य आहे,निरुपयोगी आहे असंच वाटतं. जग जवळ आलं असलं तरी जवळचा माणूस लांब चालला आहे. प्रत्येक नात्याची घुसमट होत आहे. जसं की मोकळ्या मैदानात खेळणं म्हणजे काय असतं? हेच हल्ली मोबाईलमुळे मुलांना माहित नाही. एकत्र कुटुंब असो वा विभक्त असो.जेवढे सदस्य तेवढे मोबाईल घरात उपलब्ध आहेत. एक ना एक मोबाईल मुलांच्या हाती पडतोच पडतो. त्यातूनच मुलं लहान असतील तर आईला कामात व्यत्यय आणतात अथवा खेळायला सोबती नसल्यामुळे किरकिर करत राहतात. अशावेळी त्याच्या हातात मोबाईल देऊन त्याची किट थांबवणे याशिवाय आईला दुसरा पर्यायच राहत नाही. मुलं मोबाईलवर काय बघतात ? काय खेळतात ? किती वेळ खेळतात ?याकडं अर्थातच कामाच्या व्यापात दुर्लक्ष होत. जास्तीजास्त एकाग्र होऊन मोबाईल पाहिल्यामुळे मुलांच्या मेंदूवर एकाग्रतेचा अति ताण पडतो. मोबाईल हातातून घेताच मुलांची चिडचिड होणे, त्रागा करणे, आक्रस्ताळेपणा करणे, हा मुलांच्यात होणारा बदल सहजच दिसून येतो. आणि या अशा घटना मग समोर येऊ लागतात. मान्य आहे मोबाईल ही काळाची गरज बनली आहे परंतु माणसापेक्षा तरी जास्त गरजेचे नाही ना!

  चुकलं कुणाचं ?यावर उहापोह करण्यापेक्षा अशा घटनेतून घरा घरातील प्रत्येक सदस्याने शहाणे व्हावे. मुलांसाठी वेळ द्यायलाच हवा. मोबाईल गेम मध्ये गुंतवणे यापेक्षा इतर खेळण्यात जास्तीत जास्त मुलं कशी गुंतुन राहतील याकडे लक्ष देणे चांगले. मुलं आपल्या जवळच, सुरक्षित अंतरावर,आसपासच खेळतील याची काळजी घेणे. जेणेकरून मुलं काय खेळतात ? कशी खेळतात? यावर ही नियंत्रण राहील.

  लहान मुलांवर आपण अधिकारवाणीने सगळे नियम लादतो.काही नियम आपण आपल्यासाठीही बनवायला काय हरकत आहे. जेवताना कटाक्षाने मोबाईल टाळणे, कामावरून घरी आल्यावर जेव्हा आपण सगळे एकत्र असतो तेव्हा जाणीवपूर्वक मोबाईल बंद ठेवून एकमेकांसाठी वेळ देणे, हे नियम मोठ्यांसाठी लागू केले की लहान मुले नक्कीच अनुकरण करतील. मुलं आई-वडिलांच्या आणि इतर घरातील सर्वांच्याच प्रेमाला स्पर्शाला भुकेलेली असतात. आपण आपलं काम करत करत मुलांना बोलतं ठेवले, चर्चेत ठेवले तर मोबाईलचा नाद काही प्रमाणात नक्कीच कमी होईल. एकूणच काय घरातील प्रत्येक सदस्य अगदी लहान मुलांपासून वयस्कर पर्यंत मोबाईलमुळे एकमेकापासून दूर जाणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी. कारण मोबाईल हरवला, फुटला तर नवीन आणू शकतो मात्र माणूस उद्ध्वस्त झाला तर पुन्हा मिळणार नाही.

  -सौ आरती अनिल लाटणे
  मोबाईल 9970264453

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *