• Wed. Sep 27th, 2023

स्त्री मनाच्या गाभाऱ्यातील स्त्रीची घुसमट

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

  भारतातील महिला व त्यांचे विश्व त्यांच जगणं त्याचं हसणं बागडणं सतत कौटुंबिक वादविवादात त्याची घुसमट होत जाते.. त्यातून स्त्री मनाची कहाणी ही पुर्णत्वास जात नाही.. पुर्वीच्या काळात स्त्री ही कुटुंब प्रमुख होती. आर्यांच्या आगमनात भारतीय भोळा भाबडा जनसमुदाय आपल्या तऱ्हेने वळवित आर्य संस्कृती ही जन्माला आली. सिंधू संस्कृतीचे परिवर्तन यात होऊन एका वेगळ्याच विषयाची नांदी अस्तित्वात आली. प्रत्येक बाबतीत पुरूषी वर्चस्व आपल्या संस्कृतीत दिसून येते. मुलगा आणि मुलगी यांच्यात होणारा भेदभाव तर आहेच पण मुलीला दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाते. मुलगा मात्र पुरुषप्रधान संस्कृतीच्या मुख्य प्रवाहात चिरंजीव झाला व स्त्री तेवढी उपेक्षित राहिली. उपेक्षित स्त्रीमनाचे विविध पदर ,एका अचूक शैलीने भव्यदिव्य अंतरंगातील चाललेले रूदन मनाच्या गाभाऱ्यातून व्यक्त होते. आपल्या मनातील स्वप्नांना कशी वाट मोकळी करून देत असतांना जागरुक जाणिवेने स्त्रीचे हळुवार मन त्यामधून हरेक विषयाचा वेध लेखिका कवयित्री कल्पना निंबोकार घेतांना दिसते. स्त्री मनाच्या गाभाऱ्यातून या ललित लेख संग्रहाचे लेखन करणाऱ्या कल्पना निंबोकार यांनी यापूर्वी विविधांगी लिखाण केले आहे. त्याचा कल्पनेचा चांदवा हा कवितासंग्रह प्रकाशित आहे. साहित्य रत्न ,समाज रत्न , कवि रत्न, पूष्परत्न काव्यगौरव आदर्श महिला वृक्षमित्र या पुरस्काराने त्या गौरन्वित आहे. संवेदनशील असलेली कल्पना नेहमी हळूवार भावनेला प्राधान्य देतात.

  या लेखमालेत स्त्रीमनाचे विश्व आपल्या अंर्तमनातल्या स्वरातून स्वरबद्ध एक शिस्तबद्ध लिखाण केले आहे. सामाजिक आर्थिक, सांस्कृतिक एकुन महिला सक्षमीकरण करणाऱ्या या समाज व्यवस्थेत स्त्रीची झालेली मुस्कटदाबी, घुसमट या पुस्तकाच्या अंतरंगात व्यक्त झाली आहे. ज्या कल्पना मनात आल्या किंवा जे वास्तविक समोर आलं त्याच कुठेतरी अंकुरण त्याच साचलेपण मनात होऊ न देता त्याला मोकळी वाट करून देवून कल्पना निंबोकार आजच्या दुनियेत आभासी जगात व्यक्त होण्याचा उद् बोधक प्रबोधनकारी प्रयत्न करतांना दिसते. “चाफा बोलेना “या लेखात निसर्गाचे रंग फूल त्या भुंगे यांचे संबंध अंर्तमनातल्या जाणिवेतून चितारतांना दिसते. निसर्गाला कधी सख्याची उपमा देवून प्रेमाची तंद्री कायम ठेवीत जाते. व मनाचा गाभारा खोल करते. स्वप्न, लाज श्रृंगार वृक्षवेली यांची रंगबेरंगी उधळण, सख्या साजणाशी नाते घट्ट करणारा धरतीचे श्रावणातील हितगुज हा लेख होय. “मी नापास झाल्यावर ” या लेखन संवादात लेखिकेचे आत्मचिंतनातून नापास होणे ही किती कमालीची बाब आहे किती अपराधीपणाची बाब आहे. त्यातील निकाल लागेपर्यंतची घालमेल खूप बोलकी आहे. मनाला अस्वस्थ करत हृदयाची धडकन तीव्र करणारा हा लेख आहे.

  या पुस्तकातील प्रत्येक लेखातून लेखिका स्त्री मनाचे विविध कंगोरे न्याहाळतांना दिसते. या स्त्री मनाचा गाभाऱ्यातून या शीर्षकाचा बाज निश्चित च निराळा आहे. लेखिकेच्या मनातील न सुटणारे कोडे त्यातून स्त्री मनाची बारीक सारीक प्रसंगातून होणारी एक अनामिक घालमेल प्रत्येक लेखात मनाचे कप्पे खूलवित जाते. काही तरी सांगुन जाते. मग ते ही संदर्भ सामाजिक दृष्टीने महत्त्वाचे वाटतात. स्त्रीची विविध रूपे व ती खरंच अलौकिक शक्ती व निसर्गाची देण आहे. ज्याप्रमाणे वसुंधरेत सर्व प्रकारची संयमता आहे तीच स्त्री मनाच्या हरेक कामात दिसून येते. प्रसंगी विद्रोह सुध्दा करून जगावे लागते. स्त्रीकडे बघण्याचा पुरूषी दृष्टीकोन बदलणे गरजेचे आहे. हा विचार वारंवार लेखातून डोकावतो. स्त्रीच्या अस्तित्वाला सिध्द करायला लावणारी संस्कृती याबाबत लेखिका अंत्यत भावनिक मनाचे विविध तार छेडीत वास्तवतेची प्रत्येक किनार जोडीत विषयांची गांभीर्यता वाढवित जाते. मनाची तगमग होतांना लेखिका भावना अनावर होतांना दिसते. ऐतिहासिक स्त्रियांची महती सांगायला लेखिका विसरत नाही. स्त्रीची पूजा बांधल्या पेक्षा स्वाभिमानाचे जीणं लेखिका मागतांना दिसते. पुरूषी वर्चस्व नाकारणारी नायिका मोठ्या ताकदीने लेखिकेने उभी केलेली आहे. अस्तित्वाचा लढा या लेखात! खरोखरच स्त्रीला मानाचे स्थान आहे का ❓ हाच विचार करण्याची पाळी तमाम समाजावर व पूरूषावर आली आहे असे प्रश्नचिन्ह लेखिकेने समाजापुढे उभे केले आहे. अष्टपैलू व्यक्तीत्वाने भारलेली घराची स्वामिनी, तर कधी उन्हात गारवा देणारी.. हिंमतीची वाघीण असलेली ही स्त्री चितारतांना लेखिकेने खुप अभ्यासपूर्ण लेखन केले आहे. शशिकला गुंजाळ त्याच्या एका कवितेत म्हणतात-

  आजच्या युगाची प्रणेती तू
  कलासक्त नटराजाच्या मुर्ती तू
  तुजवाचुन ना कुठला जीव
  तुजवाचुन ना कुठली किव
  वंचित तूला हे स्त्री शक्ती
  ना कुठला इंद्र ना कुठला शिव
  ना संपणारे अस्तित्व तुझे..

  प्रतिकुल परिस्थिती वर मात करून ऐतिहासिक भरीव कामगिरी करणाऱ्या मा जिजाऊ रमाई, सावित्रीबाई फातिमा, राणी लक्ष्मीबाई याचा आदर्श डोळ्यासमोर उभे करणारा आहे. विविध स्त्रियांचे दाखले देत सामान्य स्त्रीची होरपळ लेखातून मांडलेली दिसते. डॉ आंबेडकरांच्या सामाजिक कार्यात रमाई किती महत्वपूर्ण भूमिका निभावण्यात अग्रेसर होत्या. हे दाखविणारे संदर्भ मनाला भिडणारे आहे. पुरुषप्रधान संस्कृती असतांनाही स्त्रियांनी देशहितासाठी जो वाटा दिला त्यासाठी देश त्याचा ॠणी आहे.. मनुवादी शिरस्ता मोडीत काढून स्त्रियांना समानतेचे हक्क संविधानाने दिले. त्यामुळे त्या उजागर होत जाऊन मोठया पदावर विराजमान झाल्या उदा देशाच्या प्रथम प्रधानमंत्री इंदिरा गांधी, प्रथम महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील.कितीतरी नावे घेता येतील. स्त्री मनाचा गाभारा फूलवितांना “अंगणी नांदते लक्ष्मी” या लेखात अंगणात मोठेपण वर्तविले आहे. कारण अंगण हे पिढया दर पिढया जपत असते.

  अंगणाबद्दलचे लेखिकेचे लिखाण हे प्रत्येक विषयाची मूर्तिमंत साक्ष बनत जाते. आधुनिक, जुन्या काळातील शेतकऱ्याच्या घरातील अंगण वाचतांना जिव्हाळा वाढत जातो मग लेखिका जुन्या स्मृती त दंग होत खोल खोल विवरात डुंबत जाते. हि वाट अस्तित्वाची या ललीतकथेमधे त्या मांडतात कि माझी प्रतिभा उंचावर जात असतांना घरातील कोणीही तिची दखल घेत नाही. थोडं कोड कौतुक कोणी करत नाही. सततचे टोमणे देवून तिच्या प्रतिभेवर प्रश्नचिन्ह उभे केले जाते. तिचा उपमर्द केला जातो. पायातील वहाण, चूल मुल सांभाळणारी पुरुषसत्ताक गुलामी अन्य उपमा देवून तिची थट्टाच चालविली आहे. ती किती ही गुणवान असली तरी पुरुष तिच्या भावभावनांचा विचार करतांना दिसत नाही. घरातील मंडळी ची जशी तिने राहावे, कष्ट करावे. हात भाजुन आमच्या पोटाला भाकरी घालावी अशी धारणा असते. अशावेळी आपला नवरा देखील त्याच विचारांचा असतो तिच्या सृजनशील ते ची दखल घ्यावी असे त्याला वाटत नाही. किती तरी महिला प्रतिभावंत आहेत पण त्यांचा यशाचा आलेख पाहतांना त्यांना सुध्दा अग्नी दिव्यातून जावं लागलं लेखातील एक प्रसंगी ” तुझ्यापुढे तू माझे नाव लावू नकोस.. या विचाराने लेखिका खचलेली दिसते.. पण पुन्हा स्वत: ला ती खंबीरपणे उभी करते … तिचा तो सावरण्याचा प्रसंग व विचार च तिला जिंकून देतात हेच सक्षमीकरण होय.. तुझा मोठेपणा तुझी होत असलेली प्रसिद्धी सोशल मीडियावर होत असलेले कोडकौतुक कुठतरी पुरुषी आव्हनांना सलते. विशेषत: घरातील माणसांच्या नवऱ्याच्या ही हे पचनी पडणारं नसते. मात्र या आणीबाणी वर कल्पनाने मात करून अल्पावधीतच वेगाने साहित्यिक भरारी घेवून आपले अस्तित्व सिद्ध करीत बक्षीसाची घरात आरास सजविली.मनाचा गाभारा फुलवितांना कौटुंबिक कलहातून माघार न घेता एकटीची वाट निवडते.

  ओंजळ रिक्त फुलांची कथेची भावनिक पातळी इतकी पराकोटीची आहे कि विक्रांत व कनूच्या जागी आपणच उभे आहोत कि काय असा भास होतो. वाचकही ही कलाकृती वाचतांना अंतर्मुख होतो. प्रत्येक प्रसंग चितारतांना मन क्षतिग्रस्त होत जाते. मंचावर कणू भावना अनावर होऊन विक्रांत च्या बाहुपाशात येते. प्रेमाचे समर्पण करते तो क्षण ती घडीला डोळयात साठवून विक्रांत च्या भ्रमनिरास होतो. विक्रांत आशाळभूत नजरेतून मात्र स्वत:ची पराभुतीची भावना न दाखविता समीर कडे वक्र होतो. भौरेने खिलाया फुल फुलको ले गया राजकुमार… या लेखाच्या अंतीम ओळी प्रमाणे समीर राजकुमार व विक्रांत भुंगा झालेला दिसतो.. अशाप्रकारे कल्पना प्रितधारेत प्रितविरहात भावनांना हात घालते.

  एक अनामिक हुरहुर कातरवेळेची यात दिवसभराच्या कामाच्या क्षणात सतत धावणारी स्त्री, तिची त्रेधातिरपट वास्तवाचं जगणं यामधून काहीबाही निसटून जाते. ज्यावेळी पाहिजे ते हाती येत नाही आयुष्य विषण्ण वाटते तर कधी मनोहारी. हा खेळ अंतर्मनाचा असतो. कातर वेळी म्हणजे तिन्ही सांजेच्या वेळी जेव्हा विचाराचे एका वेळी कालवण होते. तेव्हा एक ना एक घाव मनाला कुठतरी टोचुन जातो. आपण कुठतरी दुखावलो हरलो याची सल राहते. तो क्षण आपण आपल्या भविष्याच्या विचार शलाका समृध्द शब्दाकिंत करतांना कधी कधी शंका कुशंकाचे मोहोळ उठविते. मनपाखराला दिशा गवसत नाही एखाद्या गलबतासारखे मग आपण गिरक्या घेत जातो. व आपण प्रारब्धाशी खेळत असतो. किंवा प्रारब्ध आपल्याशी खेळत असते. पण तसे काही नसते. तो आपला भ्रम असतो. आपले कर्तृत्व तेवढे महत्वाचे असते. पहाटेचे रविराज द्वारे या ललितात गावातील सन ई चौघडा काकड आरती दिसते… गावातील ॠतुनूसार असलेले पहाटेचे वर्णन लेखिका अचूकपणे साधते. माहेरच्या आठवणीत रमतांना बाल मैत्रिणी शेजारी पाजारी शाळा काॅलेज मधील आठवणीत रमते.. एका लग्नामुळे बालपण व आनंदीमय जीवनाला पारखी झाली याचे शल्य मनात आहे व काहुर माजविणारे आहे. माहेरची वाट म्हणजे तिच्या हळव्या हळव्या भावनांचा ओलावा असलेला स्वरसाज होय.. डायरी माझी सखी या ललित लेखात दिवसभराचे टिपण मित्रमंडळी चे संवाद लिहीते भावनाचा , समग्र जीवनाचा टाळेबंद ती मांडते. कित्येक आठवणींनी डायरी समृद्ध होते.

  स्त्री मनाच्या गाभाऱ्यातुन या ललित लेख संग्रहातील प्रत्येक लेख हा वाचनीय आहे. महिलांचे प्रबोधनाचे गीत गाणारे आहे. जुनी जळमटे फेकून देवून नवे क्षितिज व नव्या वाटा चोखाळणारे आहे. प्रत्येक स्त्रीचे अंतर्मनात हेच दाटलेले असावे असे वाटते. हे पुस्तक स्त्री मनाच्या गाभाऱ्यातील एक आंदोलन होवो हया लेखिका कल्पना निंबोकार अंबुलकर ला शुभेच्छा देतो..

  -प्रा शिवा प्रधान
  विभागीय अध्यक्ष
  अमरावती विभाग
  अखिल भारतीय साहित्य परिषद पुणे

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,