- * शेतीपुरक व्यवसायाचे प्रशिक्षण आयोजन करण्याच्या सुचना
- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : शेती व्यवसायातुन अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाला प्राधान्य देणे आवश्यक आहे. कृषी विभागाने प्रगतीशील शेतकऱ्यांना सहभागी करुन प्रशिक्षणाचे आयोजन करावे. प्रशिक्षणाच्या माध्यमातुन कुक्कूटपालन, पशुपालन आदींबाबत माहीती शेतकऱ्यांना देण्यात यावी. कृषी क्षेत्रात उत्पादनवाढीसाठी जोड व्यवसायाबाबत प्रशिक्षण देणे महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले.
अंजनगाव बारीचे म्हासला गावातील प्रगतीशील शेतकरी रविंद्र मेटकर यांच्या मातोश्री फार्मला श्रीमती कौर यांनी भेट दिली व पाहणी केली. त्यावेळी त्या बोलत होत्या. पशुसंवंर्धन उपायुक्त संजय कावरे, जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी पुरुषोत्तम सोळंके, तहसिलदार संतोष काकडे, प्रकल्प संचालक (आत्मा) अर्चना निस्ताने, पशुधन विकास अधिकारी डॉ. जयंत माहुरे, गटविकास अधिकारी डॉ. राजेंद्र देशमुख, तालुका कृषी अधिकारी किशोर हतांगळे, मंडळ कृषी अधिकारी गीता कवने, घातखेड कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रश्र डॉ. अतुल कळसकर, विषयतज्ञ डॉ. शरद कठाळे व श्री मेटकर यांच्यासह कुटुंबिय उपस्थित होते.
कुक्कुटपालनासाठी कोंबडीच्या जातीची निवड, शेडची रचना, पक्ष्यांची वाढ आणि त्यानुसार व्यवस्थापन, पक्ष्यांचे खाद्य व पाणी व्यवस्थापन, पक्ष्यांसाठी योग्य तापमान व्यवस्थापन व पक्ष्यांच्या खाद्यपदार्थाच्या निर्मितीबाबतची माहिती श्रीमती कौर यांनी घेतली.वर्ष 2008 मध्ये श्री मेटकर यांनी बँक ऑफ इंडिया कडून 25 लाखाचे कर्ज घेत कोंबड्यांचा व्यवसाय सुरु केला. त्या कोंबड्यांची संख्या आता दिड लाखांपर्यंत झाली आहे. या कोंबड्यांपासून प्रति दिवस जवळपास 90 हजार अंडी मिळतात. कुकुटपालना बरोबरच कापूस, विविध फळे-पिकांची लागवड सेंद्रिय पध्दतीने करत कमी खर्चात अधिक उत्पन्न घेण्याचे प्रयोग श्री मेटकर यांनी यशस्वी केले आहेत. आजघडीला त्यांच्या फार्ममध्ये स्वयंचलित पोल्ट्री फार्ममध्ये थ्रीटायर पध्दतीचे आठ शेड आहेत. त्यात दीड लाख पक्षी आहेत. त्यापासून वर्षभरात त्यांना दीड कोटी रुपये उत्पन्न मिळते. सात एकर मध्ये संत्रा, मोसंबी, चिकु, आंबा, पेरु, फणस, विविध मसाले, नारळाचे उत्पन्न फळबागेतुन घेत असल्याची माहिती श्री मेटकर दिली.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा आदर्श शेतकरी पुरस्कार, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचा नवसंशोधक पुरस्कार, राज्यशासनाचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार, राजीव गांधी कृषिरत्न पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल श्रीमती कौर यांनी श्री मेटकर यांचे अभिनंदन केले. श्रीमती कौर यांनी यावेळी मिनी ट्रक्टर चालवण्याचा अनुभव यावेळी घेतला.