विक्रमवीर पत्रकार राजेंद्र काळे

    पत्रकार राजेंद्र काळे यांचा आयुष्य प्रवास अनंत अडचणी, संघर्ष आणि खाचखळग्यांनी भरलेला आहे. शिक्षण एम. ए., बी. पी. एड. असुनही डोनेशन भरण्याइतपत आर्थिक स्थिती नसल्याने मास्तरकी ऐवजी त्यांना पत्रकारितेकडे वळावे लागले. पत्रकारीतेचा प्रवास म्हणजे सुळावरची पोळी. जिथे मोठ मोठ्या लोकांमध्ये उठबस होते, मान-सन्मान मिळतो मात्र जगण्याचे प्रश्न सोडवण्याइतपत धन मिळत नाही आणि फुकटच्या मानापानाने प्रश्न सुटत नाहीत. आयुष्य व्यापून टाकणाऱ्या समस्यांच्या ज्वाळाचे चटके जाणवू लागतात आणि मग स्वतःच्याच फटीचर आयुष्याची लाज वाटू लागते. पत्रकारितेतील हेच खरं वास्तव आहे. असं नाकारलेपण राजेंद्र काळे यांच्याही वाट्याला आलं. परिस्थतीने कैकदा कसोटी घेतली मात्र त्यांनी संयम ढळू दिला नाही. उलट प्रत्येक अनुभवातून अधिकाधिक शिकण्याचा, माणसे वाचण्याचा प्रयत्न केला. हा प्रवास डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर टाकून केल्यामुळेच आज संयमाचे फळ त्यांना मिळाले आहे. आज ते राज्य मराठी पत्रकार परिषदेचेही उपाध्यक्ष आहेत. बुलडाणा जिल्हा पत्रकार संघाचा अध्यक्ष होण्याचा बहुमान देखील त्यांना यापूर्वी मिळाला आहे. या सर्वांहून राजेंद्र काळे यांचे वेगळेपण आहे ते त्यांच्या ‘वृत्तदर्पण’ या सदराचे!

    Thank you for reading this post, don't forget to subscribe!

    दर सोमवारी ते ‘वृत्त दर्पण’ या सदरात लिहितात. त्यांच्या वृत्तदर्पण लेखनाचे आजवर 850 भाग प्रकाशित झाले आहेत. हा एक विक्रम आहे. तब्बल सतरा वर्षापासून ते हा स्तंभ चालवितात. आठवड्यासाठी राज्यभरात वा जिल्हाभरात घडणाऱ्या विषयाच्या संदर्भात आणि ते या स्तंभामध्ये लिहितात. बातमी मागील बातमीचे विश्लेषण करतात. कधी शाब्दिक फटकारे मारतात तर कधी प्रशंसेचे मोरपीस फिरवितात. प्रचलित माध्यमात वगळलेल्या अनेक विषयांना त्यांनी या सदरात स्थान दिले आहे. त्यामुळेच ‘वृत्तदर्पण’ मधील त्यांचे लेखन वाचकप्रिय ठरले. अनेकांनी संग्रहित केले आहे. ‘आम्ही तुमचे लेखन नियमित वाचत असतो’ असं म्हणणाऱ्या माय माऊल्या वा वडिलकीच्या वयाची माणसे ही पत्रकारितेली आपली जमापुंजी राजेंद्र काळे मानतात. आपल्या लेखनाला वाचक पसंतीची पावती मिळणे हा गौरव असतो. राजेंद्र काळे यांच्या वाट्याला तो आला आहे. ‘वृत्तदर्पण’ च्या 300 आणि 500 भागानंतर त्यांच्या चाहत्यांनी कौतुक करून सत्कार केला.जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या शब्दात सांगायचे झाल्यास

    ‘आम्हा घरी धन
    शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे
    यत्ने करू..
    शब्दची आमुच्या
    जीवाचे जीवन
    शब्दे वाटू धन
    जनलोका’

    राजेंद्र काळे यांचे वृत्तदर्पण मधील शब्दधन लोकांनी असेच आपल्या अंत:करणात साठवले आहे. आता तर सोशल मिडियाच्या काळात देशाच्या सीमेपलीकडेही ते पोहोचले आहे. ‘वृत्तदर्पण’ वाचून प्रेमात पडलेले ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे स्थायिक झालेले मूळ बेलाड ता. मलकापूर जि. बुलडाणा येथील इंजि. धनंजय संबारे त्यापैकी एक. धनंजय यांचा परिवार सुट्टीत खास त्यांना भेटायला येऊन गेला. राजेंद्र काळे अतिशय अभिमानाने ही आठवण सांगतात. ‘वृत्तदर्पण’ या सदराने त्यांना अनेक मित्र मिळाले. असं असलं तरी काहींची मनेही दुखावली. काहींनी रागाचा वचपा काढण्याचा प्रयत्न केला, तर काहींनी वरिष्ठांकडे तक्रारी केल्या.

    स्तंभलेखक म्हणून मराठी वृत्तपत्रसृष्टीत दीर्घकाळ लिहिण्याचा रेकॉर्ड अनेकांच्या नावावर आहे. दिवंगत प्रमोद नवलकर मुंबईच्या’ या दैनिकात ‘भटक्याची भ्रमंती’ हे सदर चालवीत. अगदी मंत्रीपदी विराजमान झाल्यावरही त्यांनी लेखन सुरूच ठेवले होते. प्रमोद नवलकर यांच्यानंतर असा सातत्यपूर्ण लेखनाचा मान सा. चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव यांच्या नावावर आहे. त्यात आणखी बुलडाणा जिल्ह्यातले पत्रकार राजेंद्र काळे यांची भर पडली आहे. सतरा वर्षे सातत्यपूर्ण लेखन म्हणजे गंमत नव्हे. दर आठवड्याला वेगळा विषय निवडायचा आणि त्यावर लेखन करायचे हा साधारण प्रवास नाही. या प्रवासाचे म्हणूनच अप्रूप आहे. राजेंद्र काळे यांची याविषयी प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले की, ‘या सदरातील निवडक भागाचे पुस्तक यावे अशी वाचकांची मागणी आहे, मात्र माझा प्रत्येक दिवस प्रचंड दगदगीचा आहे. स्वतःच्या ग्रंथनिर्मिती कडे लक्ष द्यायला आजवर जमले नाही.. आता मात्र त्यावर लवकरच एखादा ग्रंथ येईल एवढे मात्र नक्की!’

    पत्रकारीतेच्या दीर्घ प्रवासात राजेंद्र काळे यांनी ७ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे वार्तांकन केले. देशातील जवळपास सर्वच मान्यवर राष्ट्रीय नेत्यांच्या सभांचे वार्तांकन केले. सहा विधानसभा आणि सात लोकसभा निवडणुकासह स्थानिक स्वराज्य संस्था व जिल्हा केंद्रीय बँकेच्या निवडणुकीचे सुद्धा वार्तांकन केले. जवळून पाहिल्या, त्यावरसुद्धा ‘वृत्तदर्पण’ मध्ये लिहिले. शेगाव येथे राज्य मराठी पत्रकार परिषदेचे दोन दिवसीय अधिवेशन घेतले. याशिवाय ‘लेक माझी’ यासारख्या अभियानात सहभाग घेतला. जिल्हा पत्रकार भवन निर्मितीत पुढाकार घेतला. पत्रकाराची जबाबदारी केवळ वृत्त संकलन व संपादन करून प्रसिद्धीस पाठविणे एवढीच नाही तर पत्रकारांनी जागरूक नागरिक या नात्याने समाजात मिसळले पाहिजे, सामाजिक प्रश्नांची धग कमी करण्यासाठी कृती कार्यक्रमांना देखील हातभार लावला पाहिजे असे ते मानतात. म्हणूनच जिल्ह्यात होणाऱ्या प्रत्येक साहित्यिक, सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. जबाबदारी अंगावर घेणे आणि ती निष्ठेने पूर्णत्वास नेणे त्यांना आवडते. पत्रकारितेतील त्यांचे हे वेगळपण आहे. अशा दृष्ट्या आणि विक्रमवीर पत्रकारास त्यांच्या ‘वृत्तदर्पण’ लेखन कार्याबद्दल उदंड शुभेच्छा..!

    -रवींद्र साळवे,
    साथी २०, सहजीवन सोसायटी,
    खामगाव रोड, सुंदरखेड बुलडाणा
    ९८२२२६२००३