वर्तमानातल्या प्रश्नांची मातृभाषेतून मानवी क्रौर्यावर तुटून पडणारी कविता

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

    सुप्रसिद्ध कवी,समीक्षक, अनुवादक डाॅ.युवराज सोनटक्के सर यांचा नुकताच प्रकाशित झालेला कवितासंग्रह “प्रश्नांची मातृभाषा” माझ्याकडे अतिशय आपुलकीने पाठविला.त्याबद्दल सरांचे मनापासून आभार.

    कवी युवराज सोनटक्के यांचा प्रथम कवितासंग्रह ‘ अग्निशाळा ‘कवितासंग्रह प्रकाशित झालेला होता.त्यानंतर तब्बल वीस वर्षांनी त्यांचा ‘ प्रश्नांची मातृभाषा’ हा आशयसंपन्न कवितासंग्रह प्रकाशित झालेला आहे.त्यानंतर त्यांनी अनेक पुस्तक अनुवादित केले.संपादन,समीक्षात्मक लेखन त्यांनी आपल्या दर्जेदार व आशयघन लेखणीतून केलेले आहे.मराठी,हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये ते लेखन करतात.तिन्ही भाषेवर त्यांचे प्रभुत्व आहे.

    ह्रदयाच्या नभात अश्रू होतात अक्षरे तेव्हा
    माझी कविता मानवतेचे अंगार-गीत गाते.
    समतामूलक समाजाचे स्वप्न बघते.

    ‘प्रश्नांची मातृभाषा’ ही दमदार कविता घेऊन आलेले आहेत जेष्ठ कवी डाॅ.युवराज सोनटक्के .बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्नच जणू या कवितेतून पूर्ण करीत आहे.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न होते प्रबुध्द भारत बनविण्याचे …हे स्वप्न सत्यात आणण्यासाठी समता,स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय या संविधानिक मार्गाचा आपणास मार्ग अंगीकारला पाहीजेत. मानवतेचे अंगार-गीत गाण्यासाठी डाॅ.युवराज सोनटक्के सरांची लेखणी आता सरसावली आहेत.शोषक -शोषितांच्या क्रौर्य-धैर्याचे मानवीकरण प्रखर प्रश्नांच्या भाषेत मांडता येईल का…? असा प्रश्न कवी विचारतो…हो मांडता येईल. प्रश्न विचारणे,चिकित्सा करणे हे वैज्ञानिक व संविधानिक बाबीत मोडते.त्यामुळेच कवी हे करू शकतो.कारण भारतात लोकशाही आहे.

    तू ठेवून गेलीस माझ्यासाठी उजेड
    आणि आपल्यासाठी अंधार
    माय,
    अग्निध्वजावर जेव्हा नोंदतो तुझे नाव
    युवराजाचा मुकुट घातल्यासारखे वाटते मला.

    ‘आंबेडकरी माय ‘खूप कवींनी चितारली आहे.परंतू डाॅ.युवराज सोनटक्के सर यांची ‘माय’ मुलांसाठी उजेड पेरणारी आहे.म्हणूनच ती इतरांपेक्षा वेगळी आहे.आशा पेरणारी,मुलांना स्वाभिमानाचे धडे देणारी अग्निध्वजावर नाव नोंदवण्यास बाध्य करणारी माय शोधूनही सापडणार नाही.

    सावित्री माता!शोषित शूद्रांची तू अपरिमित ममता
    सतत संघर्ष व अमीट अनुभूतीची गहिरी गाथा

    सतत संघर्ष करणारी आमची सांस्कृतिक माता म्हणजे माता सावित्रीबाई फुले होय.सनातन व्यवस्थेला लाथाडून समता प्रस्थापित करणारी या वैश्विक मातेच्या संघर्षाला कवी आपल्या कवितेतून मनापासून सलाम करतो.तेव्हाच्या तत्कालीन स्त्रियांना महत्त्वपूर्ण शिक्षण दिले.त्यांचा आत्मविश्वास वाढविला.महात्मा जोतिराव फुले यांचा त्यांना साथ मिळाली.

    रमाई!
    तुझ्या मुखातून निघणा-या
    शितल, प्रशांत व प्रेमाच्या शब्दांनी
    साहेबांच्या भाषेला तू वाचा दिलीस.
    तुझ्याच शब्दांनी अंकुरलेली
    ती ताजी टवटवीत भाषा
    रूद्र रूप धारण करून
    टिमटिमणा-या मंद प्रकाशात
    अन् काळोखाच्या प्रवाहात
    साहेबांच्या मुखातून
    सातत्याने गर्जत राहिली.

    रमाई हे बाबासाहेब यांचे जीवनातील एक महत्त्वपूर्ण जीवनसाक्ष होय.रमाईच्या त्यागामुळेच बाबासाहेब चळवळ चालवू शकले.शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक व आर्थिक या संपूर्ण बाबीवर बाबासाहेब एकाचवेळी लढा देत होते.ते केवळ रमाई माता होती म्हणूनच..!

    तथागत बुध्द आणि आंबेडकरांचे
    आम्ही सर्वथा अभिमानी संतान
    ज्यांच्या गौरवगाथांनी गुंजत असते
    प्रेरणादायी धम्मदीक्षा मैदान.

    दीक्षाभूमी ही संपूर्ण भारतीयांची प्रेरणाभूमी आहे.तेथूनच आम्ही अनुयायी विचारांचा उजेड घेऊन दाही दिशा बुध्दविचाराने प्रज्वलित करून अज्ञान नष्ट करीत असतो.

    माझ्या लेखणीच्या टोकावर
    असंख्य दुःखे एकवटली
    या दंभी दुःखाना ओतणार आहे मी कागदावर
    मला विकसित करायचाय
    माणसांचा जीवनसंगर.

    कवितेच्या माध्यमातून कवीला माणसांचा संगर विकसित करण्याचे तथागताचे काम हा कवी आपल्या शब्द, कविता,साहित्य यांचे सहाय्याने करणार आहे.सोबत आहे आंबेडकरी विचाराने प्रेरित झालेली लेखणी.त्यामुळेच ते मानवाचा संगर विकसित करू शकतील…हा आत्मविश्वास कवी जवळ आहे.

    प्रथित-प्रतिश्रुत कवी सामाजिकता बांधणारा
    दिशाबंधन एक सेतू जन-संकल्प जोडणारा
    जोखती जोश जोमाने जो सामान्य व्यक्तीच्या मनात
    सर्वथा तोच कवी सच्चा सर्जक मानकरी शाश्वत.

    कवीची व्याख्या वरील कवितेत डाॅ.युवराज सोनटक्के सरांनी केलेली आहे.सामाजिक बांधिलकी जपणारा व सामान्य माणसांचे दुःख लोकांपुढे मांडणारा हा श्रेष्ठ कवी असतो.तो येणा-या पिढीला योग्य दिशा देतो.तो वर्तमानाची व भविष्यातील येणा-या संकटांची चाहूल आपल्या कवितेतून घेत असतो.तो दूरदृष्टीतून विचार करणारा एक विचारवंत असतो.अज्ञानाशी त्याची सतत लढाई सुरू असते.ज्यांचे घरी अजूनही उजेड पोहोचला नाही…त्यासाठीच तो सतत संघर्ष करीत असतो…मरेपर्यंत..!

    दाहक शब्द संघर्षाचे घेतले मी सखे उधार
    क्रांतीच्या हस्तांदोलनाने ठेवले मला उबदार

    दाहक शब्द संघर्ष करण्यासाठीच मी उधार घेतलेले आहे.क्रांतीच्या हस्तांदोलन यामुळेच मी उबदार झालेलो आहे.म्हणूनच मी मानवतेचे गीत गाणार आहे.संघर्ष, लढाई,करण्यासाठीच मला शब्दांची गरज आहे.

    स्पंदन ह्रदयाचे भारी शांत करूणा थर्रावते
    कविता माणूसमूल्यांची संवेदनांना गोंजारते.

    कविता करणे म्हणजे काय तर माणूस बनणे होय.माणूस बनणे म्हणजे माणूसपणाचे मूल्य अंगीकारणे होय.मानवी संवेदनशिल मन कविता करणे व कविता जगणे यात फरक आहे.माणसाला कविता जगता आली पाहिजेत. मानवी करूणा सोबत घेऊन आपण कविता जगू शकतो.यात शंका नाही.

    विद्वत्तेने तुमच्या ,पंडितांच्या शेपट्या गळून पडल्या रातोरात
    समाजकंटकांनी ‘मी-मी’ म्हणणा-या,वळवळतच टाकली कात
    शिखर पुरूष-1

    बाबासाहेब आंबेडकर यांना कवी डाॅ.युवराज सोनटक्के सर यांनी शिखर पुरूष ही पदवी दिलेली आहे.त्यांच्या जीवनाचे,त्यांच्या कार्याचे वर्णन त्यांनी या कवितेत केलेले आहे.बाबासाहेब यांनी जीवनभर अभ्यास केला त्यामुळेच जे जे स्वतःला पंडीत म्हणून घ्यायचे ते बाबासाहेबपुढे,त्यांचे विद्वत्तापूर्ण व्यक्तिमत्त्वाच्या प्रभावामुळे आपोआपच नतमस्तक होऊन लागले.वर्तमान परिस्थितीचा आढावा कवीने आपल्या स्वतंत्र शैलीत घेतलेला आहे.ही एक सुंदर आशयसंपन्न कविता म्हणून उल्लेख करावा लागेल.

    पायवाट तुडवली अंगाराची
    नोंदवण्यासाठी युगाची तक्रार
    का आग झाली उग्र कविता माझी
    निर्दयी अमानुषाच्या क्रौर्यावर?

    कविता असे शस्त्र आहे…ते मानवी क्रौर्यावर शितलतेचे शिंपण करू शकते.कधी आग कधी शीतलता परिस्थिती पाहून हे शस्त्र कवी चालवित असतो.कविता हे समाज परिवर्तनाचे अतिशय संवेदनशील साधन आहे.तेच साधन कवी डाॅ.युवराज सोनटक्के सरांनी वापरलेले आहे.कवितेवर त्यांची प्रचंड निष्ठा आहे.

    आपण डाॅ.युवराज सोनटक्के सरांची शब्दशैली बघू या.पाताळयंत्री प्रश्न, अनुत्तरीत प्रश्नांचे पाय,अमानुषांची नाचक्की, वर्तमानाचे विवादी वर्तन,क्रांतीच्या अगाधी पुरूषा, संपृक्त संघर्षाचे, ईश्वराची रक्तीम रंगरंगोटी, शोषितांच्या आम्लिक आसवांचे,चेह-यावर विचारांचे व्रण,वेदनांच्या चिखलात, स्थितिशील सौंदर्याचे अति निर्वाह्य निर्णय?,अमानुषतेचा ध्वनित कल्लोळ, असमानतेचा अंधार-उजेडाचा दुष्काळ,बोधिप्राप्ती तप्तवर्णी निखा-यावर ,इ.अनेक प्रतिमांचा वापर कविने आपल्या दीर्घ अनुभवातून केलेला आहे.युवराज सोनटक्के यांची कविता समजण्यास कठीण आहे.तिचा अभ्यास करूनच ती कविता आपणास समजू शकते.

    प्रस्तावनेत डाॅ.यशवंत मनोहर म्हणतात..”संपूर्ण जगाच्या एकमयतेसाठी, सममूल्यतेसाठी वा सकल हितासाठी आता प्रश्नांनी आपल्या मातृभाषेचे काळीज विश्वाएवढे करण्याची नितांत आवश्यकता आहे.युवराज सोनटक्के या कवीने त्यांच्या कवितासंग्रहाला ‘प्रश्नांची मातृभाषा’ हे नाव दिल्याबद्दल मी त्यांना साभिनंदन धन्यवाद देतो.” असा सुंदर अभिप्राय सुप्रसिद्ध कवी डाॅ.यशवंत मनोहर सर देतात.

    परिशिष्ट यात ‘ माय ‘: सर्वहारांच्या सर्वंकष मातृत्वाचा काव्यात्म आविष्कार डाॅ.श्रीपाल सबनीस सरांचा सुरेख अभिप्राय ही एक जमेची बाजू आहे. तसंच डाॅ.सतिश बडवे सर व सुप्रसिद्ध कवी शिवा इंगोले सर यांचाही माय कवितेवरील अभिप्राय पुष्कळ काही सांगून जाते.हा सुंदर प्रयोग डाॅ.युवराज सोनटक्के सरांनी केलेला आहे.स्मिता पब्लिकेशन, गुहागर यांनी अतिशय आत्मविश्वासपूर्ण रीतीने ‘प्रश्नांची मातृभाषा’ प्रकाशित केलेले आहे.कवी डाॅ.युवराज सोनटक्के सरांचे मी मनापासून अभिनंदन करतो.

    * कवितासंग्रह:प्रश्नांची मातृभाषा
    * कवी :डाॅ.युवराज सोनटक्के
    * प्रकाशक:स्मिता पब्लिकेशन, गुहागर,जि.रत्नागिरी
    * मूल्य: 180 रूपये
    * पृष्ठ:120/_
    * समीक्षक
    -प्रशांत नामदेवराव ढोले
    श्रावस्ती नगर, पो-सावंगी(मेघे),ता.जि.वर्धा
    पिन 442107
    संवाद:9923308638