• Sun. Jun 11th, 2023

लिबरल आर्ट्स – तिन्ही शाखांचं शिक्षण मिळणार एकाच अभ्यासक्रमात नोकरीच्या संधीच संधी उपलब्ध होणार

    एकाच शाखेतील शिक्षण घेतलं की, त्याच शाखेत आपल्याला करिअर करावं लागतं. पण, तिन्ही शाखांचा अभ्यास एकाच कोर्समध्ये करता आला, तर नोकरीच्या संधीच संधी निर्माण होतात. पुण्यातील एमआयटी ने लिबरल आर्ट्स चा कोर्स सुरू केला आहे. दहावी-बारावीच्या निकालांनंतर आर्टस्, कॉमर्स, सायन्सनंतर आता मेडिकल, फायनान्स की इंजिनीअरिंगला जावून करिअर करायचं की, ऑफबीट कोर्स निवडायचा. अशा अनेक प्रश्नांनी आतापर्यंत तुम्हाला भंडावून सोडलं असेल. पण, या सर्व पर्यायांना दूर ठेवून आपल्या आवडीच्या विषयात करिअर करायची इच्छा असेल, तर त्यासाठी वेगळा पर्याय आता उपलब्ध झाला आहे. आणि तो पर्याय म्हणजे एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीमधील लिबरल आर्ट.

    लिबरल आर्ट्स या विषयात तुम्हाला आवडीच्या विषयात शिक्षण घेणे शक्य होत असून पारंपरिक शिक्षणापेक्षा हा वेगळा अनुभव ठरणार आहे. लिबरल आर्ट्सचे शिक्षण घेणे म्हणजे अनेक गोष्टी एकत्र शिकणे असा त्याचा अर्थ नसून पुस्तकांव्यतिरिक्त आजूबाजूच्या अनेक बाबींचे शिक्षण घेण्यासाठी मनाला प्रशिक्षित करणे, असे उद्गार नोबेल पुरस्कार विजेते प्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाइन यांनी काढले होते. हाच अनुभव ही पदवी घेताना तुम्हाला येईल.

    गेल्या काही वर्षांमध्ये लिबरल आर्ट्स या शाखेने शैक्षणिक क्षेत्रात आपले वेगळे व उल्लेखनीय स्थान निर्माण केले आहे. सोशल सायन्सेस, आर्ट्स आणि ह्युमॅनिटीज यांचा लिबरल आर्ट्सच्या या शाखेत समावेश होतो. यामधील तुम्हाला आवड असलेल्या निवडक विषयांचा समावेश तुम्ही तुमच्या लिबरल आर्ट्सच्या अभ्यासक्रमाध्ये करू शकता.

    जर तुम्हाला राज्यशास्त्र या विषयात रूची असेल तर राज्यशास्त्राबरोबरच संगणक आणि स्टॅटिक्स या विषयांची निवड करीत तुम्ही निवडणूक व मतमोजणी विश्लेषक अर्थात मानसशास्त्रज्ञ म्हणून अधिक प्रभावीपणे काम करू शकता. जर तुम्हाला साहित्य या विषयात रस असेल तर साहित्य या विषयाबरोबर तुम्ही त्याला मॅनेजरिअल स्टडीची जोड देऊन पब्लिशिंग व्यवसायात स्वत:चा वेगळा ठसा उमटवू शकता.

    याशिवाय लिबरल आर्ट्स या पदवीमध्ये पारंपरिक विषयांबरोबरच समकालीन विषयांच्या जोडीने तुम्ही अधिकाधिक नव्या गोष्टी शिकू शकता. या विषयामध्ये मानसशास्त्र, माध्यमे, मास मीडिया, पत्रकारिता, फाईन आर्ट्स, वैदिक विज्ञान, परफॉर्मिंग आर्ट्स या विषयांचा समावेश होतो. एकूणच काय तर… लिबरल आर्ट्सच्या माध्यमातून कला, वाणिज्य आणि विज्ञान या तीनही शास्त्रांच्या मर्यादेमधून बाहेर पडत तुम्ही प्रभावी व मुक्तपणे तुम्हाला आवडणा-या विषयांचे शिक्षण घेऊ शकता.

    याबरोबरच लिबरल आर्ट्स खेरीज बी. ए. ऑनर्स या पर्यायाचादेखील तुम्ही विचार करू शकता. यामध्ये तुम्हाला राज्यशास्त्र, मानसशास्त्र आणि इंग्रजी अशा ठराविक विषयांमध्येच आवड आहे आणि करिअर करायचे आहे, तर सुरुवातीपासून तुम्हाला त्याच विषयाचा अभ्यास करण्याची संधी बी. ए. ऑनर्स या पदवीमध्ये मिळू शकते. या उलट ज्यांना एकापेक्षा जास्त विषयांमध्ये रस आहे आणि या सर्व विषयांचे एकत्रित ज्ञान घेऊन करिअर करण्याची इच्छा जे बाळगून असतील, अशांसाठी लिबरल आर्ट्स हा महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त पर्याय आहे.

    या कोर्सची फी किती आहे? एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीस्कूल ऑफ लिबरल आर्ट्सच्या प्रमुख प्रा. प्रीती जोशी यांनी सांगितले की, “मागील काही वर्षात पारंपरिक शिक्षणाची वाट सोडून ऑफबीट किंवा नवीन विषयात अभ्यास करण्याचा ट्रेंड दिसून येत आहे. नवनवीन पर्यायांचा शोध घेतला जातो आहे. यातलाच एक उत्तम पर्याय ४ वर्षांचा पदवी अभ्यासक्रम आहे. याची फी ६०,००० ते ३,५०,००० प्रति वर्ष आहे. तसेच या कालावधीत इंटर्नशिप हा ६-३० क्रेडिट्सचा अनिवार्य घटक आहे.”

    लिबरल आर्ट्सचा विचार केला तर सुदैवाने पुणे शहरात अनेक ठिकाणी या अभ्यासक्रमाचे शिक्षण दिले जाते. उच्च शिक्षणाच्या जगात नावाजलेल्या अनेक संस्थांमध्ये या विषयाचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. त्यामुळे या संधीचा नक्की फायदा घ्या. पब्लिकेशन हाऊसेस, क्रिएटिव्ह रायटिंग, ब्रँडिंग कम्युनिकेशन, मीडिया हाऊसेस, राजकीय विश्लेषक, सेफोलॉजिस्ट, कॉन्सेलर्स, शैक्षणिक, संशोधन इ. अशा विविध क्षेत्रात करिअरची विस्तृत व्याप्ती आहे. त्यामुळे नोकरीच्या संधीच संधी उपलब्ध होतील यात काही शंकाच नाही.

    शब्दस्पर्शी-सुनील शिरपुरे
    कमळवेल्ली,यवतमाळ
    भ्रमणध्वनी-७०५७१८५४७९

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *