रोजगार केंद्रातर्फे ऑनलाईन रोजगार मेळावा ; 374 पदे उपलब्ध

Thank you for reading this post, don't forget to subscribe!
    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : विविध कंपन्यांच्या 374 रिक्त पदांवर जिल्ह्यातील रोजगार मिळविण्यास इच्छूक युवकांना संधी मिळवून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे पं. दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा दि. 17 जूनपर्यंत सुरू आहे.

    रोजगार विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या पोर्टलच्या माध्यमातून मेळावा घेण्यात येत असून, केवळ ऑनलाईन पध्दतीने सहभाग नोंदविणाऱ्या उमेदवारांनाच नोकरीची संधी मिळणार आहे. दहावीपासून ते अभियंत्यांपर्यंत विविध अर्हताधारकांसाठीची पदे त्यात समाविष्ट आहेत. इच्छूकांनी आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध असलेल्या रिक्त पदासाठी सहभाग ऑनलाईन पध्दतीने नोंदवावा. पसंतीक्रम नोंदविताना शक्यतो आपण वास्तव्यास असलेल्या क्षेत्रातील आसपासच्या कंपन्यांची, तसेच आवश्यक पात्रता धारण करत असल्याची खात्री करुन पदाची निवड करण्याची दक्षता घ्यावी, असे आवाहन सहायक रोजगार व उद्योजकता आयुक्त प्रफुल्ल शेळके यांनी केले आहे.

    अर्जदारांना पसंतीक्रमानुसार व उद्योजकाच्या सोयीनुसार त्यांच्या मुलाखतीचे ठिकाण, दिनांक व वेळ एसएमएस अलर्टव्दारे कळविण्यात येईल. शक्य असेल तिथे ऑनलाईन किंवा ऑफलाईन मुलाखतीचे आयोजन करण्यात येईल. तरी इच्छुक युवक युवतींनी दि. 17 जून पर्यंत ऑनलाईन अर्ज करावा. वेबपोर्टलवर नोकरी साधक ( नोकरी शोधा ) या ऑप्शनवर क्लिक करावे. जॉबसिकर हा पर्याय निवडून आपल्या युझरआयडीने साईन ईन व्हावे. त्यानंतर डाव्या बाजुकडील पं. दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर वर क्लिक करावे. नंतर अमरावती जिल्हा निवडून त्यातील अमरावती जॉब फेयर हा पर्याय निवडावा पात्रतेनुसार अप्लाय बटणावर क्लिक करावे. याबाबत काही अडचण असल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, या कार्यालयाच्या मोबाईल क्रमांक 9405447890, 9370011643 किंवा amravatirojgar@gmail.com वर संपर्क करावा.