• Sat. Jun 3rd, 2023

मायबोली बंजारा भाषा आणि तिचा अभिजात वारसा

    बंजारा बोली ही बंजारा समाजाची मायबोली , मातृभाषा असून भारतभर बोलली जाणारी राजस्थानी प्रभाव असलेली इंडोआर्यन परिवारातील एक समृृद्ध बोली भाषा आहे. डॉ. हिरालाल शुक्ल यांनी बंजारा भाषेला ‘इंडोआर्यन’ परिवारातील भाषा म्हणून संबोधले आहे. तर डॉ. उदय नारायण तिवारी, डॉ. राहुल सांस्कृत्यायन यांनी बंजारा बोलीला ‘राजस्थानी बोली’ म्हटल्याचे आढळून येते. इतिहास संशोधक बळीराम पाटील यांच्या ‘बंजारा क्षत्रियोका इतिहास’ (१९३०) या ग्रंथातही बंजारा भाषेतील दोहे आलेले आहे. भारतीय विविधतेला संपन्न करणाऱ्या विविध मातृभाषा यापैकीच बंजारा ही एक समृद्ध वारसा जपणारी बंजारा समाजाची मातृभाषा होय. बंजारा भाषा संदर्भात प्रख्यात बंजारा भाषा, साहित्य आणि संस्कृतीचे अभ्यासक एकनाथ पवार-नायक यांनी “बंजारा भाषा ही ग्लोबल सिटीझनची चौदाखडी शिकवणारी एक सहिष्णूतेची मातृभाषा आहे. ज्यात कोणत्याही प्रकारची द्वेषमूलकता स्पर्शत नाही. ती निसर्गाच्या कुशीत बहरणारी आहे. धरती, आकाश, चंद्र, तारे, पशू-पक्षी, नदी-नाले, झरे , वृक्ष-वेलीशी संवाद साधणारी निसर्गाची बोली आहेे.” या शब्दात वर्णन‌ केले आहे. बंजारा बोलीभाषेला स्वतंत्र लिपी नाही, परंतु आज देवनागरी लिपीत साहित्य निर्मिती होत आहे. येणाऱ्या काळात बंजारा भाषेची स्वतंत्र लिपी येण्याची शक्यता अधिक आहे. बंजारा मायबोली आजही टिकून आहे, हे विशेष.

    *बंजारा बोली आणि मराठी भाषांतर :
    बंजारा-याडी, ये जगेम तू सेती रूपवान छी | याडी, थारो घंळो रीण छ |
    मराठी अर्थ-आई, या जगात तू सर्वात सौंदर्यवान आहेस. आई, तुझे थोर उपकार आहे.
    बंजारा-नायक, मारास्टेनं हारोभरो किदो | किरत वोरी सारी दनियाम गावै |
    मराठी अर्थ-नाईक,यांनी महाराष्ट्राला हिरवेगार केले. किर्ती त्यांची जगभर गातात.
    बंजारा-तू घंळी हार्द आवछी | तू आयीस कना ? वाटं जोवूं थारी | तू आयीस कना?
    मराठी अर्थ-तू खूप आठवतेस. तू येथील केंव्हा ? वाट बघतो/बघते तुझी. तू येथील केंव्हा?

    *बंजारा भाषा-साहित्याचा गौरव :

    बंजारा साहित्य-संस्कृती विश्वात अनेक प्रतिभावंत साहित्यिक, कवी, लेखक, समिक्षक, गीतकार तर काही इतिहास संशोधक देखील लाभले आहे. ज्यामुळे बंजारा भाषा साहित्य आणि संस्कृती अबाधित राहण्यास फार मोठी मदत झाली. बंजारा भाषेचा गौरव लेखणीतून दिसून येतो. बंजारा साहित्य व इतिहासाचे आदयसंशोधक, साहित्यिक व इतिहासकार म्हणून स्मृ.बळीराम पाटील यांना मानले जाते. तांडाकार स्मृ. आत्माराम राठोड उपाख्य डॅनियल राणा यांनी बंजारा साहित्याला पुढे आणले. आत्माराम राठोड यांची सर्वप्रथम बंजारा बोलीभाषेत साहित्यकृती प्रकाशित झाली. “या पुढची घटना आम्हीही लिहू, आमची बंजारा बोली अजून लिपीबद्ध व्हायची आहे.” असे ‘लदेणी’ मध्ये त्यांनी म्हटले होते. बंजारा भाषिक अस्मिता जाणवणारा हा प्रवास आजच्या एकविसाव्या शतकातही कायम टिकून आहे. बंजारा भाषा , साहित्य आणि संस्कृतीचे अभ्यासक तथा विचारवंत एकनाथ पवार- नायक यांनी बंजारा भाषेचे गौरवगीत लिहिले आहे. जे बंजारा भाषेचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करणारे आहे.

    “केसूला नै मोरा री । मायड भाषा बंजारा री। चांदा सुर्यास्यूं अमरारी। जीवे जीवेस्यूं प्यारी।।”
    (मराठी भावार्थ : पळस फुलाप्रमाणे बहरणारी माझी मातृभाषा बंजारा आहे. चंद्र सूूूूर्याप्रमाणे ती अजरामर आहे. अशी माझी बंजारा बोली जीवाहुन प्रिय आहे.)
    *बंजारा भाषेच्या दर्जासाठी लढा :

    बंजारा बोली ही भारतभर बोलली जाणणारी बंजारा समाजाची मायबोली आहे. संविधानाच्या आठव्या सुचीत समावेश करण्यात यावे, यासाठी सर्वप्रथम लोकसभेत खासदार हरिसिंग उर्फ हरिभाऊ राठोड यांनी शासनाकडे मागणी केली. त्यानंतर खासदार राजीव सातव यांनी देखील लोकसभेत मागणी रेटून बंजारा बोलीला भाषेचा दर्जा मिळण्याबाबत लढयाला गती दिली. कर्नाटक येथील खासदार उमेश जाधव, खासदार सुरेश धानोरकर यांनी देखील तशी मागणी शासनाकडे केली. ‘तांडेसामू चालो’ अभियान अंतर्गत पहिल्यांदाच बंजारा बोलीला भाषेचा दर्जा देण्यात यावे, याबाबत ‘चांदा ते बांदा’ स्वाक्षरी मोहीम राबवली. प्रसिद्ध लेखक भिमणीपूत्र मोहन नाईक यांनी पत्रव्यवहार केले. पुढे राष्ट्रीय बंजारा परिषद व इतर संघटनांकडून जागृती निर्माण झाल्याने महाराष्ट्रातील अनेक खासदार व आमदारांनी शासनाकडे लेखी पत्रव्यवहार केला. राज्यातील विधान परिषदेचे आमदार हरिसिंग राठोड व तत्कालीन मंत्री संजय सिंह राठोड यांनी शासनाकडे जोरकस मागणी रेटल्याने बंजारा बोलीला भाषेचा दर्जा देण्याबाबत केंद्राकडे तशी शिफारस देखील करण्यात आली. बंजारा बोलीला भाषेचा दर्जा देण्यात यावे, यासाठी बंजारा समाजाकडून सातत्याने मागणी सुरू झालेली आहे. अखिल भारतीय बंजारा साहित्य संमेलनात देखील या संदर्भात अनेकदा ठराव मंजूर केले जात आहे.

    *बंजारा भाषिक साहित्यिक व लेखक :

    मराठी, हिंदी प्रमाणेच आता बंजारा भाषिक साहित्यिक, लेखकाची फौज दिसून येते. ज्यांनी बंजारा भाषा, संस्कृतिची अस्मिता गौरवान्वीत करण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्य, बळीराम हिरामण पाटील, आत्माराम कनिराम राठोड, जयराम सिताराम पवार, सुरेश कापडिया, डॉ.वी.रामकोटी पंवार, डॉ.इंदलसिंह जाधव, भिमणीपुत्र मोहन नाईक, प्रा. अशोक पवार, एकनाथ नायक-पवार, महेशचंद्र बंजारा, राजूसिंग बाणोत, डॉ.. रमेश आर्या, जयपाल सिंह राठौड, हरलाल सिंह पवार, विरा राठोड, पंजाबराव चव्हाण, प्रा. दिनेश राठोड, डॉ.विजय जाधव अशा जुन्या नव्या काळातील अनेक साहित्यिक व लेखकांचा बंजारा भाषा, साहित्यामध्ये उल्लेख केला जातो. आज बंजारा भाषेत मोठ्या प्रमाणात नवोदितांची साहित्य निर्मिती होतांना दिसून येते. निश्चितच बंजारा भाषेच्या संवर्धनासाठी बंजारा साहित्यिक, संशोधक, लेखक, कवी, समिक्षक योगदान देत असल्याचे दिलासादायक चित्र निदर्शनास येत आहे.

    संदर्भ : विकिपीडिया
    1. “Inclusion of Banjara language in 8th Schedule sought”. द हिंदू (इंग्रजी भाषेत). 24ऑक्टोबर 2021
    2. “केसुला नै मोरारी मायड भाषा बंजारारी”. दैनिक सकाळ, नागपूर. एप्रिल 2022
    3. हुंमाळो नंगारारो. पोहरादेवी (महाराष्ट्र). डिसेंबर २०१८. p. 49. ISBN 978-16-30412-22-7.
    4.चव्हाण, डॉ. मोहन (२००७). बंजारा बोली भाषा : एक अध्ययन. सूर्या प्रकाशन.
    (Images Credit : Banjara Times News)

    (संग्रहित)

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *