• Mon. Jun 5th, 2023

महिला व बालविकास योजनांच्या प्रभावी अंमलबजावणी- पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

  * जि. प. महिला व बालविकास विभागाचा अकरा कलमी कार्यक्रम
  * अनेक नाविन्यपूर्ण योजनांचा समावेश
  * उपक्रम राज्यात पथदर्शी ठरेल
  गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

  अमरावती (प्रतिनिधी) : कुपोषणमुक्ती व महिला व बालविकास योजनांच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी जि. प. महिला बालविकास विभागाकडून अकरा कलमी कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. यातील प्रत्येक उपक्रम समन्वय ठेवून प्रभावीपणे राबवावा. हा उपक्रम राज्यात पथदर्शी ठरेल, असा विश्वास राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज व्यक्त केला.

  अकरा कलमी कार्यक्रमातून बालके, गरोदर स्त्रिया -स्तनदा माता, किशोरी मुली, ज्येष्ठ नागरिक या सर्व घटकांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचा फायदा सर्व वयोगटातील लाभार्थ्यांना होणार आहे. त्याचप्रमाणे, बालकांसाठी महत्वपूर्ण ठरणा-या बाला अंगणवाडी केंद्रांचे बांधकाम जिल्ह्यात होत असून यावर्षी 60 पैकी 34 अंगणवाडी केंद्रे पूर्णत्वास जात आहेत. यावर्षी पुन्हा 60 अंगणवाडी केंद्रांची निवड केली असून ती सर्व केंद्रे विहित मुदतीत पूर्णत्वास जाण्यासाठी अचूक नियोजन व अंमलबजावणी करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

  अकरा कलमी कार्यक्रमाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी जिल्ह्यातील सर्व मुख्य सेविका, बालविकास प्रकल्प अधिकारी आणि गटविकास अधिकारी यांची संयुक्त बैठक आयोजित केली होती. उपक्रमाद्वारे अमरावती जिल्हा पथदर्शक जिल्हा म्हणून पुढे यावा, यासाठी प्रयत्न होत आहेत. त्यासाठी अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका आणि बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश यावेळी श्री. पंडा यांनी दिले. जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रांना नळजोडणीद्वारे पाणीपुरवठा, सर्व अंगणवाडी केंद्रांत चांगली स्वच्छतागृहे असण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांनी विविध निधीचा वापर करून एका महिन्यात ते काम पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

  उपक्रमात मेळघाटातील कुपोषण कमी करण्यासाठी एक दिवस मेळघाटासाठी, कन्या जन्मोत्सव, सर्व अंगणवाडी केंद्रांत शेवगा वृक्षांची लागवड, परसबागा तयार करणे, मध्यम कुपोषण आढळून येणा-या बालकांवर ग्राम बालविकास केंद्रात तत्काळ उपचार करणे, आरोग्य विभाग आणि महिला व बालविकास विभागाच्या कर्मचा-यांच्या उपस्थितीत सर्व बालकांची वजने घेणे, किशोरी मुलींचे सक्षमीकरण करण्यासाठी किशोरी समृद्धी योजना, माय-बापासाठी थोडेतरी आणि उत्कृष्ट काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीसांना प्रोत्साहन मिळण्यासाठी अमरावती आयसीडीएस मंत्रा बुलेटिन आदी अनेक बाबी समाविष्ट करण्यात आल्या आहेत, अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास घोडके यांनी दिली.

  या कामांच्या अंमलबजावणीचा आढावा मुख्य कार्यकारी अधिकारी स्वतः घेणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.मध्यम कुपोषित बालके कुपोषणात जाऊ नये म्हणून मेळघाट आणि गैरआदिवासी क्षेत्रात वेगवेगळ्या निधीचा स्त्रोत वापरून त्या बालकांना उपचार मिळवून देण्यात येणार आहेत, असेही श्री. घोडके यांनी सांगितले.

  उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. घोडके यांनी अकरा कलमी कार्यक्रमाची आखणी केली असून, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुलकर्णी, तुकाराम टेकाळे, गिरीश धायगुडे यांनी मार्गदर्शन केले. सर्व विभागांचा समन्वय साधून जिल्ह्यात हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येईल, असे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जोशी यांनी सांगितले.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *