• Wed. Jun 7th, 2023

मराठी भाषेसाठी भरीव काम करता आल्याचा आनंद – मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई

    * महाराष्ट्राच्या सहा दशकांतील जडणघडणीचा मागोवा घेणाऱ्या ग्रंथांचे प्रकाशन

    मुंबई, : मुंबईत मरिन लाईन्स येथे ‘मराठी भाषा भवन’ उभे राहणे आणि मराठीसाठी त्या भाषेचा मंत्री म्हणून काम करता आले याचा अभिमान वाटतो, अशी भावना मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी केलेला प्रयत्न, मराठी भाषा अनिवार्य करण्याचा आणि दुकानावरील पाट्या मराठी भाषेतून असाव्यात यासाठी केलेला कायदा, अशा प्रकारचे मराठी भाषेसाठी भरीव काम करता आले याचा आनंद आहे. ‘ग्रंथाली’ व ‘मराठी भाषा विभाग’ यांच्या संयुक्त विद्यमाने मंत्रालयात आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.

    मराठी भाषा, साहित्य-संस्कृती आणि विज्ञान या क्षेत्रांत गेल्या सहा दशकांत काय प्रगती झाली, काय राहिले याची वस्तुनिष्ठ नोंद घेणारे तीन खंडांची ग्रंथाली या प्रकाशन संस्थेने निर्मिती केली आहे. या खंडांचे आज प्रकाशन करण्यात आले. यावेळी डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर आणि ऋतुरंगचे संपादक अरुण शेवते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

    श्री. देसाई म्हणाले, मराठी भाषा जगभरात 80 देशांत बोलली जाते. मराठीच्या प्रचार प्रसिद्धीसाठी आंतरराष्ट्रीय मराठी मंच आणि प्रतिनिधींची नेमणूक करण्यात आली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी आवश्यक पुरावे केंद्राला सादर केले. केंद्रीय मंत्र्यांकडे व्यक्तीशः याचा पाठपुरावा केला आहे. त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, प्राधिकरण आणि शासनाच्या कामकाजात मराठी भाषेतून व्यवहार करणे अनिवार्य केले आहे. सर्व मंडळांच्या शाळेतून मराठी विषय शिकविणे सक्तीचे केले आहे.

    राज्यात एक मोठी गुंतवणूक प्रस्तावित असून त्यासाठी नुकतेच दिल्ली येथे बैठकीला उपस्थित राहून याबाबत चर्चा केली असल्याचे त्यांनी सांगितले. उद्योगमंत्री म्हणून राज्यातील मोठ्या तसेच लहान उद्योगांच्या विकासासाठी पोषक असे वातावरण तयार केले. राज्यात प्रस्थापित जुन्या उद्योगांच्या वाढीसह नविन 86 हजार स्टार्टअप्सने राज्यात सुरुवात केली आहे. शंभर युनिकॉर्न कंपन्यांमधे किमान 25 कंपन्या या मुंबई-पुण्यातल्या आहेत. शेअर बाजारात गुंतवणूकीसाठी लिस्टींग करता यावे, यासाठी एस एम ई प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन दिल्यानंतर जवळपास 400 लघु उद्योगांनी शेअर बाजाराच्या माध्यमातून 15 हजार कोटी रुपयांचे भांडवल उभे केले आहे, असेही श्री. देसाई यांनी यावेळी सांगितले.

    भाषेचे सौष्ठव सांभाळण्याची जबाबदारी माध्यमांची – राजीव खांडेकर

    भाषा जगवणे हे काम माध्यमांचे नाही, मात्र भाषेचे सौष्ठव सांभाळण्याची जबाबदारी माध्यमांनी सांभाळावी, अशी अपेक्षा वृत्त वाहिनी चे संपादक राजीव खांडेकर यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर मराठीचा प्रवाह हा आकुंचन पावणार नाही यासाठी अनेक ठिकाणी काही लोक तन्मयतेने मराठी भाषेच्या संवर्धनाचे कार्य करीत आहेत त्यांचे कौतुक होणे आवश्यक आहे.

    नव्या पिढीला राज्यातील गौरवशाली कामगिरीची ओळख करुन देण्याचे काम या ग्रंथांच्या माध्यमातून होणार असल्याची भावना डॉ. पी. डी. पाटील यांनी व्यक्त केली. चांगल्या प्रयत्नांना कायम साथ देण्याचे आश्वासनही श्री. पाटील यांनी दिले. मराठी भाषेच्या विकासासाठी केवळ तळमळ असून चालत नाही, त्यासाठी दूरदृष्टी देखील असावी लागते. ती ग्रंथालीच्या विश्वस्थांकडे आहे, म्हणूनच हे ग्रंथ निर्मितीचे काम पूर्ण होऊ शकले, असे गौरवोद्गार ज्येष्ठ साहित्यिक अरुण शेवते यांनी काढले.

    महाराष्ट्राच्या जडण घडणीचा दस्तावेज

    ‘विज्ञान-तंत्रज्ञानात हीरकमहोत्सवी महाराष्ट्र’ या ग्रंथाचे संपादन विवेक पाटकर, हेमचंद्र प्रधान यांनी केले. यात 36 विचारवंताचा समावेश आहे. ‘मोहरा महाराष्ट्राचा’ याचे संपादन रमेश अंधारे यांनी केले आहे. यात 43 अभ्यासकांचा सहभाग आहे. ‘मराठी राज्यातले मराठीचे वर्तमान’ याचे संपादक म्हणून डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, डॉ. अजय देशपांडे यांनी काम पाहिले आहे. हे तीन महत्त्वपूर्ण खंड म्हणजे महाराष्ट्राच्या जडणघडणीचा दस्तऐवज आहेत. वाचक, अभ्यासकांसाठी पथदर्शी असणारा हा ऐवज संग्रही असावा, असा आहे. मूळ 3,000 /- रुपयांचा तीन खंडांचा संच ‘ग्रंथाली’ने केवळ 1,500 /- रुपयांत उपलब्ध केला आहे, असे ‘ग्रंथाली’चे सुदेश हिंगलासपूरकर यांनी सांगितले.

    महाराष्ट्राच्या हीरकमहोत्सवी 3 खंडांनिमित्त ग्रंथालीच्या गेल्या दोन वर्षातील निवडक 60 पुस्तकांचा संच, तीन खंड आणि ‘शब्द रूची’ या मासिकाचे तीन वर्षाचे तीन वर्ष अंक घरपोच केवळ 8500/- रुपयांत मिळणार असल्याची माहिती श्री. हिंगलासपूरकर यांनी यावेळी दिली. ‘ग्रंथसखा’चे श्याम जोशी यांनी सूत्रसंचालन केले.

***

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *