भूकंप…

Thank you for reading this post, don't forget to subscribe!
    भूकंप इथे झालेला प्रायोजित केला आहे
    सत्तेची भूक अधर्मी पोचली शिगेला आहे..
    सांगितले गेले त्याला हा तुझाच ठेला आहे
    पण त्यांच्या गोठ्यामधला तो नवीन हेला आहे..
    जनतेच्या होरपळीशी त्यांना ना देणे घेणे
    पण केवळ खुर्चीसाठी हा सूर टिपेला आहे..
    खुर्चीवर डोळा कसला ? खुर्चीसच डोळा आहे
    हा घोडा चाऱ्यासाठी शोधतो तबेला आहे..
    तो अपुल्या मतदारांना सोयीस्कर विसरत गेला
    न पुतळ्यासमोर वदला ..’मी तुमचा चेला आहे..’
    शब्दास दगाबाजीचे लावले विशेषण गेले
    विश्वास म्हणाला तेंव्हा ‘ विश्वासच मेला आहे..’
    जो प्रवेशकर्ता होतो ईडीची मुक्ती त्याला
    जनतेच्या हातामध्ये फुटलेला पेला आहे..
    प्रायोगिक थापेबाजी सांगून जगाला गेली
    सडक्याच विचारांवरती पांघरला शेला आहे..
    बोक्यानी स्वतःस येथे तारांकित बंदी केले
    हा सत्तेच्या लोण्याचा हव्यास जिभेला आहे…
    ही सामान्यांची शक्ती इतकीही चिल्लर नाही
    हिशोब साऱ्यांचा त्यांनी वेळेवर केला आहे..
    -प्रसाद कुलकर्णी,
    इचलकरंजी