बाबांची शाळा…

Thank you for reading this post, don't forget to subscribe!
  सारवलेल्या भुईवरती, पोरं दाटीवाटीने बसायची
  बाबा म्हणतात आमच्यावेळी,शाळा अशीच असायची
  लाकडी फळा लाकडी टेबल
  लाकडीच असायची खुर्ची
  विषय असायचे खूप सारे
  शिकवायला एकटेच गुरुजी
  काळ्या फळ्यावर पांढरी अक्षरे,छान उठून दिसायची
  बाबा म्हणतात आमच्यावेळी,शाळा अशीच असायची
  सफेद सदरा खाकी चड्डी
  शाळेचा गणवेश ठरलेला
  फाटकी चड्डी वरचा सदरा
  असायचा थोडासा विरलेला
  गळकी चड्डी सावरायला,पिळकावणी घट्ट बसायची
  बाबा म्हणतात आमच्यावेळी, शाळा अशीच असायची
  गुरुजी सांगायचे छान गोष्टी
  गोड गळ्याने कविता गायचे
  कित्ता त्यांचा गिरवताना
  अक्षर आमचे मोती व्हायचे
  अभ्यास नाही केला तर, छमछम छडी दिसायची
  बाबा म्हणतात आमच्यावेळी,शाळा अशीच असायची
  जेवणाच्या सुट्टीत सगळेच
  जेवायला घरी जायचे
  टोपल्यामधली भाकरी घेऊन
  कालवणात चुरून खायचे
  दूधभात खाऊन पोरं, पहिलवानासारखी दिसायची
  बाबा म्हणतात आमच्यावेळी शाळा अशीच असायची
  कबड्डी लंगडी खोखो
  दुपारी खेळ रंगायचे
  शेवटच्या तासाला गुरुजी
  पर्वचा म्हणायला सांगायचे
  पाठांतराच्या सुरात मग,शाळा चिंब भिजायची
  बाबा म्हणतात आमच्यावेळी,शाळा अशीच असायची
  -उत्तम सदाकाळ
  शिवजन्मभूमी,जुन्नर
  9011016655