• Sun. Jun 4th, 2023

धर्म एक चकव्यूह :ज्ञानसत्ता की धर्मसत्ता

  भारतीय प्रशासकीय सेवेतील सेवानिवृत्त सनदी अधिकारी, ज्येष्ठ तत्त्वचिंतक, उत्तम वक्ते, साहित्यिक आणि प्रखर प्रागतिक विचारवंत म्हणून बी.जी.वाघ हे नाव सर्वज्ञात आहे. ‘ताओवाद’ हा अस्पर्शीत विषय असो की, बुद्ध, जे.कृष्णमूर्ती यांच्या तत्वविचारांचे सखोल अभ्यासक या संदर्भाने बी.जी.वाघ हे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. मराठी साहित्यातील त्यांचे योगदान महत्वाचे आहेच परंतु इंग्रजी भाषेतही त्यांनी Tranquility, harmony and Balance, Art of Survial, The Undivided path ही चिंतनात्मक पुस्तकेह लिहिलेली आहेत. ‘Dreams and Realities’ हे इंग्रजीतील काव्यात्म विश्वचिंतन तसेच ‘विचारांच्या सावल्या’ हे पाश्चात्त्य तत्वज्ञानावरील त्यांचे चिंतनात्मक पुस्तकही प्रचंड गाजले.

  बी.जी. वाघ यांचा वाचन व्यासंग, विश्लेषण शैली आणि तर्कनिष्ठ प्रागतिक भूमिका त्यांच्या लेखनात ओतप्रोत दिसते. त्यांच्या ‘ज्ञानसत्ता की धर्मसत्ता’ ह्या लेखसंग्रहात एकूण २२ लेख असून हे सर्व लेख पीपल्स पोस्ट’ या पाक्षिकातील ‘धर्म:एक चक्रव्यूह’ ह्या लेखमालेत क्रमशः पूर्वप्रसिद्ध झालेले आहेत. अलीकडे धर्म ही अतीव संवेदनशील अशी बाब झाली आहे. धर्माबद्दलचे समज-अपसमज यांची चिकीत्सा सदर लेख संग्रहात वाघ यांनी अचूकपणे केलेली आहे. ही सर्व मांडणी करताना कोणताही विशिष्ट धर्म लेखकाच्या दृष्टीसमोर नाही, जी आहे ती मानवजातीची भयग्रस्तता. राजकारणी मात्र हे भय अधिक वाढवण्यासाठी वैचारिक, बौद्धिक षड्यंत्र सतत रचत असतात हे सत्य निर्भयपणे बी. जी. वाघ मांडतात.

  भगवान बुद्ध, महावीर, डॉ.आंबेडकर, बर्ट्रान्ड रसेल, जॉन ड्यु, महात्मा गांधी, सॉक्रेटिस, कान्ट, ग्रामसी, टॉलस्टॉय, थोरो, हेगेल, महात्मा फुले, पेरियार, मार्क्स या वैश्विक तत्त्वचिंतकांचे धर्मचिंतन आणि धर्मदृष्टीचा प्रत्यय सदर लेखांमध्ये ठिकठिकाणी आपणास येतो. लेखसंग्रहाची पाठराखण परिवर्तनवादी ज्ञानयोगी विनयशील धर्मचिकित्सक आदरणीय आ.ह. साळुंके यांनी केलेली आहे. त्यात ते लिहितात की, “बी.जी.वाघ यांनी ह्या पुस्तकात हाताळलेला विषय गंभीर व अतिशय महत्वाचा आहे. परंपरागत स्वरूपाचा, निकोप मानवी मूल्यांपेक्षा कृत्रिम कर्मकांडाला महत्व देणारा, विषमतेचे व शोषणाचे समर्थन करणारा आणि बऱ्याच प्रमाणात अज्ञानावर आधारलेला असा धर्म आणि सत्याला प्रमाण मानणारे ज्ञान त्यांच्यातील विरोध प्राचीन काळापासून चाललेला आहे. आज ज्ञानाला महत्व दिले तरच मानवजातीचे कल्याण होणार आहे, ज्ञानाच्या आधारे धर्मालाही नवी दिशा देऊन समृद्ध करणे शक्य आहे. त्यासाठी प्राचीन काळापासून जगातील विविध संस्कृतीतील माहितीचा आढावा घेणाऱ्या विस्तृत स्वरूपातील सदर लेखसंग्रहाचे मी स्वागत करतो.”

  ह्या संग्रहातील लेख बुद्धिजीवी वर्गासाठी महत्वाचे आहेतच पण कोणताही झेंडा आणि विचार यांना बळी पडणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचे, सर्वसामान्य नागरिकांचे बुद्धीमंथन घडवून आणणारे सहज सुलभ शैलीतील सहसंदर्भ प्रभावी मुक्तचिंतनही आहे असे मला वाटते. मुळात माणसाला धर्माची आवश्यकता असते का? येथपासून त्याच्या निर्मितीचे मूळ माणसाच्या सार्वकालिक भयात व असुरक्षितेत आहे. धर्माचा संबंध सत्याशी तसेच उच्चतम नैतिक जाणिवांशीही आहे परंतु लोक सामाजिक व राजकीय गरजांसाठीच धर्माचा वापर करतात असे मत वाघ मांडतात जे टोकदार सत्य आहे. धर्माचे चुकीचे आकलन माणसाला धर्मांध करते. धर्माचे मारेकरी त्याच धर्माचे असतात. त्यामुळे जो धर्म माणसाला अविवेकी, तर्कदुष्ट किंवा हिंसक बनवतो त्याची आवश्यकता आहे का? असा सार्थ प्रश्न लेखक निर्माण करतो.

  धर्म ही मानसिक गरज पुढे मानसिक गुलामगिरीत किंवा विकृतीत परिवर्तित होते. महात्मा गांधींचे धर्मचिंतन त्यांच्या प्रागतिक, वैश्विक अशा सत्याच्या प्रयोगात आहे. डॉ.आंबेडकर हे बुद्धांचे अनुयायी त्यामुळे ते वैचारिक गोंधळात सापडले नाहीत. त्यांनी बौद्धिक, मानसिक व नैतिक स्वातंत्र्यालाच सत्य मानले आहे. बुद्धाने ईश्वराऐवजी माणसालाच धर्माच्या केंद्रस्थानी आणले, त्याला विश्वनायक ठरवले. ईश्वर,आत्मा, वेद, यज्ञसंस्था, स्वर्ग-नरक, वर्णव्यवस्था या सर्व दलदलीतून त्याने माणसाला मुक्त करून बौद्धिक नैतिक स्वातंत्र्याची घोषणा केली.

  सत्य ही अंतिमतः एक गतिमान संकल्पना आहे. सत्य शोधण्यासाठी आधी मनाचे व कर्माचे स्वातंत्र्य असावे लागते ते जातीव्यवस्थेत नव्हते. सत्याच्या साधनेसाठी समाजव्यवस्था मुक्त असावी लागते धसर्मव्यवस्थेने नीतिमत्ता, सामाजिक न्याय, समता-स्वातंत्र्य-बंधुता या मुल्यांचा विकास होऊ दिलेला नाही. धर्म आणि श्रद्धा, परंपरांच्या संगतीचा प्रवास सत्याऐवजी चक्रव्युव्हाकडे, इतिहास हिंदुत्वाचा, धर्म:एक भयमूलक अज्ञान, हिंदुराष्ट्राचे मूळ ब्राम्हणयग्रस्त ब्राम्हणवादात, धर्माचे सामर्थ्य त्याच्या संदिग्धतेत, पंथ परंपरा आणि सहिष्णुता, सांस्कृतिक संघर्ष:धर्म-जाती-वर्ण-वर्ग, धर्मचिकित्सा, धर्म आणि सत्य, बुद्ध: नैतिक व बौध्दिक स्वातंत्र्याची घोषणा,धर्म: माणूस साधन नव्हे तर साध्य, क्रांती-प्रतिक्रांती, फॅसिझमचे मूळ: मनुस्मृती, भक्तीपंथ: धार्मिक स्वातंत्र्य व समतेसाठीचा संघर्ष, धर्मचिकित्सा/जातिनिर्मूलन, पाश्चात्य धर्म आणि तत्वज्ञान, धर्माचे भविष्यकालीन स्वरूप, धर्मनिरपेक्षतेचा युरोपियन प्रवास असे विविध विषय ह्या तत्वचिंतनपर लेखसंग्रहात आहेत. हे सर्वच लेख सहसंदर्भ, चिंतनीय आणि समर्पक वास्तव उदाहरणांसह पूर्णत्वास आलेले आहेत. वाचकास ते नवी दृष्टी देतात, विचार करायला भाग पाडतात आणि परिवर्तनशील करतात हे निश्चित!

  *पुस्तकाचे नाव- धर्मसत्ता की ज्ञानसत्ता (वैचारिक लेखसंग्रह)
  *संपादक- बी.जी.वाघ
  *प्रकाशन- ग्रंथाली प्रकाशन, मुंबई
  *प्रकाशन वर्ष- २०२२
  *मूल्य- ३५० रु.
  *एकूण पृष्ठ- ३०२
  -डॉ. प्रतिभा जाधव,
  नाशिक
  pratibhajadhav279@gmail.com

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *