• Mon. Jun 5th, 2023

डॉ. प्रतिभा जाधव यांचा अनुवादित काव्यसंग्रह इंग्रजी व हिंदी भाषेत प्रकाशित

    * सामर्थ्यशाली कविता अनुवादित स्वरूपात वैश्विक पातळीवर जाणे आनंदाचे- बी.जी.वाघ
    गौरव प्रकाशन न्यूज नेटवर्क

    नाशिक (प्रतिनिधी) : येथील प्रसिद्ध साहित्यिक वक्ता, स्तंभलेखिका तथा एकपात्री कलाकार डॉ.प्रतिभा जाधव यांच्या ‘संवाद श्वास माझा’ ह्या काव्यसंग्रहाच्या ‘डायलॉग माय लाईफ’ (इंग्रजी) व ‘संवाद मेरा संजीवन’ (हिंदी) भाषेतील अनुवादित आवृत्त्यांचा प्रकाशन सोहळा नाशिक येथे नुकताच संपन्न झाला. ऑथर प्रेस,दिल्ली ह्या नामांकित प्रकाशन संस्थेने दोन्ही पुस्तके वाचकांसाठी उपलब्ध करून दिलेली आहेत.

    प्रसिद्ध साहित्यिक व विचारवंत मा. बी.जी.वाघ (सेवानिवृत्त जिल्हाधिकारी भा.प्र.से.) यांचे हस्ते दोन्ही अनुवादित आवृत्त्यांचे प्रकाशन झाले. याप्रसंगी ते म्हणाले की, “मराठी साहित्यिकांचे कसदार साहित्य वैश्विक स्तरावर प्रसिद्ध होणे व वाचकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे. प्रेम, विद्रोह, न्यायनिष्ठ संघर्ष, वंचितांचे दुःख, उपेक्षितांचे अस्तित्व, सामाजिक जाणिवा, तळमळ व संवेदना हे गुण डॉ. प्रतिभा जाधव यांच्या कवितेचे सामर्थ्य आहे. हे सामर्थ्यच त्यांच्या कवितांना एका वेगळ्या उंचीवर घेऊन जातात. बुद्धिजीवी वर्गास भावणारी अशी त्यांची कविता आहे. ह्या कविता इंग्रजी व हिंदी पुस्तकरूपात अनुवादित करताना अनुवादक डॉ.किशोर इंगोले व डॉ.दीपा कुचेकर यांनी मूळ कवितेचा अर्थ व सौंदर्य यांचा अचूक मेळ साधला आहे. हा खऱ्या अर्थाने भावानुवाद म्हणता येईल. डॉ.प्रतिभा जाधव यांची मराठी कविता वाचताना मला प्रकर्षाने जाणवले होते की, ह्या कवितेत इंग्रजी कवितेचा स्वर आहे. आज इंग्रजी व हिंदी अनुवादित आवृत्ती प्रकाशित करताना मला खूप आनंद वाटतो आहे.”

    ज्येष्ठ साहित्यिक सुमती पवार अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की, “डॉ.प्रतिभा जाधव यांच्या सातत्यपूर्ण दर्जेदार लेखनामागे एक तळमळ असते, मानवी वेदना व संघर्षावर त्या सतत लिहीत असतात. स्त्री, प्राध्यापिका म्हणून अनेकविध जबाबदाऱ्या पेलताना त्यांच्या मनाची अस्वस्थता, लेखनातील धग अशीच चिरंतन राहो, त्यांचे साहित्य सामाजिक परिवर्तनाचा ध्येय आणि ध्यास घेतलेले साहित्य आहे, त्यांच्या लेखनास उत्तम भविष्य आहे.”

    याप्रसंगी मंचावर साहित्यिक डॉ.प्रतिभा जाधव, हिंदी अनुवादक डॉ.दीपा कुचेकर, डॉ.राजेश झनकर उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रा.निलेश निकम यांनी मानले.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *