• Sun. Jun 11th, 2023

जीवनायन: नव्या स्वप्नांच्या आंदोलनाची युध्दकविता

  कवी यशवंत मनोहर यांनी मराठी कवितेच्या प्रांतात नव्या सृजनात्मक शब्दक्रियेने नवा मार्ग स्थापन केला आहे.आंबेडकरी तत्वज्ञानाच्या अग्नीफुलांचा सुगंध घेऊन बंडखोरवृत्तीने मराठी कवितेला नवे आत्मभान दिले आहे.उत्थानगुंफा कवितेतील अग्नीप्रलय,काव्यभीमायन मधला आंबेडकर क्रांतीचा उद्यघोष, मूर्तिभंजन मधील स्नेहभावगर्भ व सामाजिक आविष्कार आंबेडकरवादी कवितेला नव्या उंचीवर घेऊन जाणारा आहे.कवी यशवंत मनोहर यांचा चौथा कवितासंग्रह जीवनायन उच्चतम नवकृतीचा मुक्त झंझावात आहे.मुक्तछंदाच्या निर्मितीची धगधगती ज्वाला त्यांनी वाचकाला दिली आहे. जीवनायन कवितासंग्रहातील कविता छंदात्म, छांदस अभिव्यक्तीमुळे खिन्नतेचे, दुःखाचे,अपेक्षाभंगाचे, क्रोधाचे प्रक्षोभाचे विविध स्वर कवेत घेऊन त्यांवर तळपळत राहणारा एक आश्वासक गंभीर स्वर निनादत असल्याचा प्रत्यय येतो.ओजस्वी शब्दकळाच्या क्रियान्वयेतून तिमिराचा निषेध करते.उजेडाची नवीन लेणी खोदण्याची ताकत देते.

  जीवनायन हा कवितासंग्रह मानवी भावजीवनाचे उत्कट प्रेमस्वरूप विशद करते. मनाच्या अंतरंगातील दोलनामय आयामाचा वेध घेते.प्रेमाची उत्कट अभिव्यक्ती या कवितासंग्रहात पाहावयास मिळते.प्रेमिका ही कविला सातत्याने नवी ऊर्जा देत राहते.या कवितेत नवसृजनत्वाचा नवा मुक्त आविष्कार रेखांखित झाला आहे.आंदोलनाच्या कविता,स्वातंत्र्याच्या कविता,प्रेमाची कविता, सामाजिक कविता,अंभगात्मक कविता,पाऊस कविता,स्वःजाणीव कविता,अशा अनेक अंगाने मोहरून आल्या आहेत.

  आंबेडकरवादी कविता ही ज्वाजल्यांचे महाबारूद घेऊन प्रस्थापित सनातनी समाजव्यवस्थेची छिन्नविछिन्न समीक्षा करते.तर जीवनायन या कवितासंग्रहातील कविता नव्या माणूसप्रेमी स्वातंत्र्याचे नितळ गीत गात आहे.बंडखोर असलेला कवी अत्यंत भावस्पर्शी हृदयद्रावक प्रणयत्वमक मनाचे चांदणे शिंपीत जाते.जीवनायन कवितासंग्रहाच्या समीक्षेत अक्रम पठाण म्हणतात की,”उत्थानगुंफा या कवितासंग्रहातून त्यांनी सांस्कृतिक मूल्यसंघर्षाची चिकित्सा वैचारिक विद्रोहाने केली तशीच “जीवनायन”या कवितासंग्रहात सांस्कृतिक मूल्यप्रणालीची पुनर्रचना केली आहे.”सामाजिक बदलाची भूमिका विशद करताना कवी संभ्रमावस्थेत मशगुल न राहता सत्यनिष्ठता अधोरेखित करतो. ही या कवितेची जमेची बाजू आहे.प्रा.वसंत आबाजी डहाके आपल्या समीक्षेत म्हणतात की,”माणसामधल्या सर्जनशीलतेवर यशवंत मनोहरांचा विश्वास आहे आणि ही सर्जनशीलता माणसाला माणसीचे रूप देईल यावर कविचा विश्वास आहे”तर डॉ.सुलभा हेर्लेकर आपल्या भावना व्यक्त करताना म्हणतात की,”जीवनायन मधील कवितांनी मनोहरांना श्रेष्ठत्व प्राप्त करून दिले ,खूप उत्कटायचे आहे.त्यातले हे थोडे..!खूप पेटवायचे आहे त्यातले हे थोडे..! हे थोडे उत्कटणे आणि थोडे पेटणे यांनीच जीवनायन मधील कवितांना समृध्द केले आहे.”हा आशावाद नक्कीच सुखावणारा आहे.

  जीवनायन कवितासंग्रहात एकूण एकशे नऊ कविता असून अत्यंत तरल भावगंधाचा सुगंध दळवळणारा आहे.सामाजिक परिवर्तनासाठी सज्ज असलेली कविता वाचकाला अंतर्मुख करते.जपून रे माझ्या फिनिक्स पक्ष्यांनो,तेजःपुज,आपण,बाकी सर्व अंधार,बंधो,हे गाव,या मोसमानो,माणूसच या कवितेची रचनात्मकता उंची कलेची अनुभूती व भावस्पर्शतेने ओतपोत भरलेली आहे.देशातील अन्यायकारी व्यवस्था भारतीय समाजाचे शोषण करीत असून मानवाला त्याचे हक्क देत नाही.धुर्तेपणाने सामान्य लोकांच्या जीवनात अंधारपण पेरत आहेत.त्यावर कवी वादळांचे वंशज होऊन प्रचंड विद्रोहाने तुटून पडतात.कवी आपल्या भावना प्रस्फोटीत करताना लिहितात की,

  “पायाखाली सुरूंग आणि माथ्यावर आगीचा ढग ओथंबून आहे;
  जपून रे माझ्या फिनिक्स पक्ष्यांनो खुपदा आपला वध झाला आहे.
  …………………….
  अशक्य नाही ज्वालांचे वादळ आणि रक्ताच्या समुद्रात नावा आपल्या;
  जपून रे नावाड्यानो,जपून जरा,उरात क्रांतीची कविता आपल्या.”
  पृ क्र १

  आपल्याला प्रस्थापित समाजासोबत लढायचं असेल तर आपले आयुध पाजवले पाहिजे.कारण आपला अनेकदा इथे वध झाला आहे.नव्या युध्दाईच्या क्रांतीसाठी अंधाराची पैदास नष्ट करावी लागेल तेव्हाच नास्तिकांचा विजय होईल.आपल्या धडावर आपले डोके असावे,डोक्याच्या मेंदूत बाबासाहेबांची अंगार तर हृदयात बुध्दाची मानवता असावी .उजेड केव्हाचाच भेटला आहे.त्या उजेडाला स्वतःच्या मनामनात पेरायचा आहे.”आपण “या कवितेत कवी म्हणतो की,

  “उजेड केव्हाचा उभा आहे,आधी गुहेची दारे उघडा आपण;
  श्वास केव्हाचे ताटकळत आहेत,
  थडग्यांबाहेर या आपण…”
  पृ क्र २७

  माणसाला आपण सुंदर करतो,माणूसकिचे गाणे गातो,माणसासोबत माणसासारखे वागतो.हाच आंबेडकरी क्रांतीचा विचार आहे.सनातन्यानी विषमतेचा उन्माद घालणाऱ्या अंधत्वाच्या झाडांना उखळून फेकले पाहिजे.”बाकी सर्व अंधार”या कवितेत कवी म्हणतो की,

  तुमच्या डोळ्यांत माणूस मारणारा उन्माद दाटला आहे.;
  थोड्या जळत्यासह अजिंक्य; बाकी सर्व अंधार आहे.”
  पृ क्र २८

  देशामध्ये बहुसंख्य अंधार पसरला असून अंधाराच्या बेटावर करूपाचे साम्राज्य आहे.पण या अंधार बेटाला उध्दवस्त करायला अजिंक्य उजेडाचा भीमसैनिक तत्पर आहे.विषम समाजव्यवस्थेचा मुळ स्वःभाव कधीही बदलत नाही.त्याला दफन केल्याशिवाय माणव्याचे सुंदर विहार निर्माण होत नाही.अनेक मोसमात माणसाचे जीणे उद्धवस्त होते.”या मोसमात”या कवितेत ते लिहितात की,

  “या कोडवाड्यात श्वास कोंडला जातो आहे;
  कुजलेल्या या चौकटीत उजेड दफन केला आहे.”
  पृ क्र ४६

  त्रिपदी ही अतिशय दीर्घ कविता असून छोट्या छोट्या रूपकातून बदलत्या समाजजीवनाचे चित्रण केले आहे हृदयानी हृदयाशी संवाद साधला आहे.गरीब व श्रीमंत दुनियेचा परामर्श घेतला आहे.अणुबॉम्ब पेरून पृथ्वीला स्मशान करणाऱ्या हातांना कलम केले पाहिजे.ते “बंधो”या कवितेत लिहितात की,

  बंधो..! मृगजळाच्या पुरातून माणूस बाहेर काढला पाहिजे
  माणूस म्हणजे जीवनाचा आणि त्याच्या सौंदर्याचा कास्तकार
  त्याच्यावर वाढलेली बांडगुळे काढून नीट जाळली पाहिजे.”
  पृ क्र ६१

  कवीच्या आयुष्यात आलेल्या प्रेमजीवनाचा सोज्वळ भावार्थ प्रदिप्त केला आहे.कवीची प्रेयसी क्रांतीकारी विचाराची नास्तिक आहे.बदलत्या परिघाशी सातत्याने तीने परिवर्तन केले आहे.असफल असलेले हे प्रेम जीवनाला फुलवणारे सफल प्रेम आहे.असे मला वाटते.या कवितासंग्रहात तूच युध्द पेटले, तुझी आठवण आली,होईल उजेडच ,प्राण्याची रांगोळी,संहिता ,आगीतल्या वाटा,एकमेंकाशिवाय आकान्त, आपण या कवितातून निर्मळ प्रेमाचा सुंदर झरा झुळझुळत आहे.कुठेही प्रेमिकाविषयी तक्रार नाही तर तीच्या अंतरंगात शिरून तीला नवे जीवन प्रदान करणे हेच कविला मान्य आहे.”तुझी आठवण आली”या कवितेत लिहितात की,

  “प्रश्नांनोत्तरांच्या पायघड्यावरून आता साठीकडे निघालो आहे;
  जखमांचे वर्गिकरण करता करता तुझी आठवण आली आहे.
  शोकाकुल किती विजय पाहिले,सुखे पाहिली किती रडवेली;
  जहराचे प्याले पिता पिता तुझी आठवण आली.”
  पृ क्र १६

  या कवितेतून मानवीय मनातील संवेदशील पदर हळूवार रेखांखित केले आहे.हृदयातील तरलभावनाच्या आवेगाला वाट मोकळी करून देतांना “संहिता”या कवितेत लिहितात की,

  “पातळ्यांच्या कल्पनेतही न मावणारा सुगंध झालो;
  आपण नग्न मने झालो:कात टाकलेल्या हृदयाची संहिता झालो.”
  पृ क्र ४२

  प्रेम माणसाच्या संघर्षाला ऊर्जा देते.रक्तातील जळणाऱ्या ज्वालाना योग्य पथावर घेऊन जाते.ऐकमेंकाशिवाय दोन जीवन नांदू शकत नाही.नवा सृजनोत्सव क्रियान्वयन करून अंतरंगातील धमणीधमणीतून प्रेमाचे शिल्प कोरून ठेवण्याची कला कविने अवगत केली आहे.कवीची प्रेयसी अग्नीज्वालेचे निखारे कविला देत आहे.मुलतत्ववाद्यांना मुळासकट उखळून फेकण्याची ताकत देत आहे.क्षितीजाने जरी नाकारले असले तरी श्वासाचे तुकडे जुळवणारे हात आहोत आपण हा आशावाद कवीने मांडला आहे .”आकान्त आपण”या कवितेत ते लिहितात की,

  “प्रत्येक गाण्याच्या गळ्यात रडणारी आसवे आपण
  प्रत्येक सरणाच्या आगीत तडफडणे आकान्त आपण…”
  पृ क्र ४३

  कवीने स्वतःचे आशयसुत्रे निश्चित केल्याने ही कविता आवर्तात सापडली नाही.शब्दाची आखिव व रेखिव मांडणी करून नव्या सौंदर्याचे अजिंठामय कोरीवनक्षीकाम केले आहे.मोहरूननआलेल्या सौंदर्याला रेखाटतांना कवी म्हणतो की,

  “न्यायासाठी संग्राम झालेली दुःखे म्हणजे सौंदर्य
  आईच्या अश्रूंनी संदीप्त झालेला आशय म्हणजे सौंदर्य..”

  सौंदर्याची अचूक व निटनेटकी परिभाषा कवीने केली आहे.या कवितासंग्रहात पावसावर कविता रचल्या आहेत.जो पाऊस उत्थानगुंफा या कवितासंग्रहातून प्रस्फोटीत झाला तो पाऊस जीवनायनमधून वेगळ्या स्वरूपात व्यक्त झाला आहे.”माती पेरावी “ही कविता सृष्टीच्या जन्मजाणिवाचा अनोखा फिसारा फुलवणारी आहे.मन पावसाळा झाल्यावर शब्दाची पेरणी करून मानवतेची शेती कवीने केली आहे.ते म्हणतात की,

  “माती पेरावी शब्दात
  मन व्हावे पावसाळा
  फुटू आल्या कुशीतला
  जाळ करावा मोकळा…”
  पृ क्र ३७

  अत्यंत विचार परिपक्व कविता पावसाच्या आर्त उठणाऱ्या झंकाराचे गाणे पाखराच्या ओठावर पेरते.पाऊस म्हणजे नवपीकाची निर्मिती पण कधी कधी तो छळतो ,हैरान करतो.डोळ्यातील आसवांनी मन गैहवरून येते.कधी कधी एवढे दुःख असते की डोळ्यातल्या पाण्यात ठिपूसही दिसत नाही.”पाऊस सांगेल कदाचित “या कवितेत कवीने पावसाचे विविध रूप प्रस्तुत केले आहेत,

  “खुपदा वाटते,मातीलाच पुसावी,आपली आणि पावसाची व्यंजक नाती
  खूपदा उत्तरे वाहून नेतो पाऊस,फक्त प्रश्न ठेवतो आपल्या हाती.”
  पृ क्र ११

  सरीताच्या मनशोक्त जलधाराची प्रवाह अखंड झुळझुळतो,पाखरांना तृप्त करतो.तहानलेल्या मानवाला आनंद देतो.कवी नदीच्या पाण्यासोबत संवाद साधतांना म्हणतो की,

  नदीच्या वाहत्या पाण्याशी बोलता बोलता
  मी होते वाटते पाणी माझ्या आयुष्याचे
  गर्भार भरतीला घेतो मी बाहूत
  आणि माझ्या बाहूलाच गर्भ राहतात नव्या स्वप्नांचे.
  पृ क्र ४७

  जीवनायन कवितासंग्रहात वेगवेगळ्या शैलीचा उत्तुंग भावगर्भ प्रगत झाला आहे.आंदोलनाच्या कवितेतून आशयसंपन्न, रचनात्मकता,कलात्मकता, वास्तवदर्शी,संग्रामशील अशा अनेक अंगाने प्रयुक्त झालेल्या आहेत.अजून,चूल विझली नाही,सत्य संग्राम होत आहे,कविता इतका माणूस खुळा हवा,या कवितामधून नव्या परिवर्तनाचा क्रांतीसूर्य अग्नीतेजाने प्रखर झाला आहे.भेदाभेदाची भींत उध्दवस्त करून समतेचे नवीन नंदनवन फुलविण्याची ताकत या कवितेत दिसून येते.ही कविता माणसाच्या मनोविश्लेषणाचे स्पंदन अचूक टिपते.अंधाराला चिरून प्रकाशाचा नव माणूस तयार करते.

  “तिमिरकुलाशी भांडावा दिप तसा शुर माणूस हवा
  “मानव मी मानव”म्हणणारा सर्व प्रकाशक सूर्य हवा.
  पृ क्र ८७

  आपण सारे समान असून कोणत्याही मानवासोबत भेदभाव न करता मैत्रीचे नाते ठेवावे .आपआपसातील तंटे चर्चेने सोडवावे .कवीच्या अंतरंगातून अग्नीपक्ष्यांचा निर्णायक थवा फुलू लागला असून उकळत्या ढगांचा मोहल्ला मोर्चात सामील झाला आहे.कवीची कविता विजांचे संग्राम झालेली आहे.ते म्हणतात की,

  पावलांना त्यांच्या पंख नव्हे पोलादी निर्धाराची मुठही नवी
  संग्राम होत आहे कविता जंगल ज्वालाचे कफन बांधत आहे..
  पृ क्र ६७

  स्वातंत्र्य हे मानवी जीवनातील महत्तम मूल्य आहे.देशात स्वातंत्र्य असतांना अजूनही कितीतरी माणसे पारतंत्र्यात जगत आहेत.त्यांना त्याच्या जीवनाचे नवे ऋृतू निर्माण करता आले नाही.कवी या माणसाच्या स्वातंत्र्याचे गीत गात आहेत .त्याच्या दुःखाना वाचा फोडत आहेत.स्वातंत्र्य म्हणजे मनामनातील काटे मुळापासून नष्ट करणारी व्यवस्था.कवी “स्वातंत्र्य” या कवितेत लिहितात की,

  ‘मनामनातील काटे नष्ट करणारी संस्कृती म्हणजे स्वातंत्र्य
  पारतंत्र्याचा वंशविस्तार मुळातून जाळण्याचा हक्क म्हणजे स्वातंत्र्य..!’
  पृ क्र १९

  स्वातंत्र्य हे जनमाणसाला नव्या स्वप्नांची उभारी देणारे क्रांतीगर्भ असते पण या स्वातंत्र्याने फक्त धनिकाची मिरासदारी निर्माण केली आहे.शोषित ,पिडित,कामगार, आदिवासी,शेतकरी यांना नागवले आहे.जर भारतीय लोकशाहीचे फळे त्यांना मिळाली तर त्यांचे आयुष्य सूर्यमान होऊ शकत हा आशावाद कवीने मांडला आहे.ते “हे स्वातंत्र्या..!”यामध्ये लिहितात की,

  ‘जहरी मनेसुबे आणि बहिरी मने
  कोणापाशी तरी तक्रार करू.?
  सर्वत्रच सांडलेले रक्त तुझे
  कोणत्या थारोळ्याची चौकशी करू.?’
  पृ क्र २५

  ‘मी मुक्त झालो आहे’ही दिर्घ कविता स्वातंत्र्याच्या क्रांतीयुध्दाची थोरवी गाते . नव्या प्रयोजनाचे थवे उडवते.स्वातंत्र्याचा पाऊस माणसाला महान करणारा आहे.विद्रोहाची मशाल प्रज्वलीत करणारा आहे.कवी स्वातंत्र्याच्या उत्सवासोबत महाकाव्य लिहितांना म्हणतात की,

  “मांडली आहे फुगडी त्याने धमन्यांमधील वेग धुंद उत्सवासोबत
  हे स्वातंत्र्या
  मी लिहतो आहे जगण्याच्या जळत्या ओळीचे महाकाव्य
  जगू दे मला सूर्याच्या विश्वासू किरणांसोबत…”
  पृ क्र ५५

  देशामध्ये घडणाऱ्या घटना मुळे कवी अस्वस्थ झाला आहे.अंगाअंगात क्रांतीची खदखद पसरली आहे. नव्या आंदोलनासाठी निर्णायक र्मोच्यात सामील झाले पाहिजे.ते “अजून”या कवितेत म्हणतात की,

  देश झाला आहे स्मशान अख्या, प्रेतांनीच आता आंदोलन झाले पाहिजे
  अजून लाव्हा धावतो आहे रक्तात,मोर्चाने निर्णायक झाले पाहिजे.
  पृ क्र २३

  अत्यंत ज्वालाग्राही विचाराची धगधगती कविता रणांगणावर लढण्याची अणुऊर्जा देते. जीवनायन हा कवितासंग्रह प्रेमानुभूती व समाजप्रबोधनाचा उत्तम आकृतीबंध असून नव्या नव्या शब्द प्रतिमाचा अनोखा भावस्पर्श जागवणारा आहे.तरल मनाच्या व्याकुळतेचे सुंदर चित्रण या कवितेत पाहायला मिळते.कविता ही एक ज्वालाग्राही असते ती सत्याची बाजू मांडत असत्याला बेचिराक करत मानवतेचे निर्मळ सरोवर निर्माण करते.हा कवितासंग्रह प्रतिमायुक्ताने मोहरून आलेला आहे.जहरी मनेसुबे,बहिरी मने,अनंत हस्ते,मरण चाटले,सर्जनभूमी,स्वागताचे महाद्वार,दांभिकांचे बुरखे,अंजिक्य उजेड,शतकांची शेते,दिशा गर्भार,शब्दकार,रत्नहार,मोरपिसारे,चार्वाकपिसारा,नक्षत्राचे वेल्हाळ,पोलादाचे घास,जखमांचा मोर्चा ,निरालंब,हृदयाची संहिता,दीपकराज,अशा विभिन्न शब्द शैलीने कवितासंग्रह दर्जेदार झाला आहे.

  अभिव्यक्तीच्या पातळीवर हा कवितासंग्रह वाचकाला अंतर्मुख करते.नव्या क्रांतीआंदोलनासाठी प्रेरित करते.देशातील सम्यक क्रांती यशस्वी करण्यासाठी नवी आखणी करते.जीवनायन कवितासंग्रह नव्या स्वप्नांच्या आंदोलनाची युध्दकविता आहे.ही कविता भारतीय समाजाला नवे मूल्यमंथन करायला लावणारी अग्नीसौंदर्य आहे.कविने अत्यंत मूलगामी चिंतन रेखाटले आहे त्या करीता कवीचे अभिनंदन व पुढील काव्यप्रवासाला लाख लाख मंगलकामना चिंतितो..!

  -संदीप गायकवाड
  ९६३७३५७४००

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *