जिवापाड प्रेमाच्या चुकीच्या धारणा ; इन्स्टाग्रामवरील अल्पवयीन प्रेम पोलिसांच्या जाळ्यात तर पंचवीस-सत्तरचं प्रेम यशस्वीतेच्या उंबरठ्यावर

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

  स्त्री पुरुषांच्या प्रेमाबाबत अनेक कथा प्रसिद्ध आहेत. ज्यात परस्परांविषयीची भावना त्यांच्या मनात आहे. एकमेकांच्या विरहाची होणारी तडफड, वियोगाचे दारुण प्रसंग आणि अंतिम मिलन अशक्य आहे. त्यामुळे परस्परांवरील प्रेमापोटी त्यांनी केलेले आत्मसमर्पण याविषयी अनेक गोष्टी आहेत. प्राचीन भारतीय साहित्यात अशा प्रकारच्या प्रेमाची अनेक उदाहरणे आहेत की, पहिल्याच दृष्टिक्षेपात प्रेम बसले आणि प्रेमाच्या वेदीत आयुष्याची आहुती दिली.

  जेव्हा दोन व्यक्तीमध्ये एकमेकांविषयी अदम्य आकर्षण आणि मिलनाची आतुरता असते, तेव्हा त्याला आपण प्रेम म्हणत असतो. परंतु ह्रदयाचे स्पंदन अथवा मिलनाची तीव्र ओढ हे खरोखरच प्रेम नाही. या आकर्षण अथवा मिलनाच्या तीव्र ओढीमागे अनेक वैज्ञानिक कारणे आहेत. तीव्र इच्छेमुळे माणूस स्वत:चा विवेक गमावतो आणि मग सर्प नि दोरी यामधील भेद तो ओळखू शकत नाही.तुलसीदास आपल्या पत्नीला भेटण्यासाठी इतका उतावीळ झाला होता की, तो सापालाच दोरी समजून त्याला पकडून खिडकीवरून चढला होता. हे उदाहरण दोन व्यक्तीमधील पारस्पर्शक आकर्षण किंवा अनार्थ प्रेमाचे नाही, तर फक्त मोहाचे आहे. अशा मोहाला प्रेम म्हणता येईल का? जेव्हा प्रेमी मिलनाची अशक्यता ओळखतो आणि आत्मसमर्पण करतो, तेव्हा तो स्वत:च्या असाहाय्यतेचे प्रदर्शन करतो.

  आपल्या प्रेमाच्या अनुपस्थितीत मानसिक संतुलन आणि जीवनप्राप्तीची आसक्ती गमावतो. अशावेळी त्यांचे परस्परांवर प्रेम असते असे म्हणण्यापेक्षा ते परस्परांवर मानसिकदृष्ट्या अवलंबून असतात, असे म्हणणे योग्य ठरेल. रोमियो-ज्युलिएट, लैला-मजनू यांच्यासारखी गाजलेली प्रेमीयुगुल एकमेकांवर इतके अवलंबून होते की, एकमेकांशिवाय ते राहूच शकत नव्हते. हे प्रेम खरे प्रेम नाही. जोपर्यंत प्रियकर किंवा प्रेयसीच्या मनात असुरक्षिततेची भावना असते, तोपर्यंत प्रेम संभव नसते. एखाद्यावरील तीव्र प्रेमापोटी आज जो आपल्या प्रेमासाठी जीव द्यायलाही तयार होईल. तीच व्यक्ती उद्या परिस्थिती बदलली, तर त्याचा जीव घ्यायलाही मागेपुढे पाहत नाही. अँथेलेचे डेस्टीमोनावर जिवापाड प्रेम होते; पण जेव्हा त्याला तिच्या चारित्र्यावर संशय आला, तेव्हा त्याने तिचा गळा दाबून तिला मारून टाकले.

  अशाप्रकारे भावनेचा उद्रेक म्हणजेच प्रेम नाही. आपण म्हणतो की, आपण आपल्या मुद्यांवर प्रेम करतो; परंतु जोपर्यंत तो आपली इच्छा आणि आदेशांचे पालन करतो, विश्वासाला तडा जाऊ न देण्यासाठी जपतो, तोपर्यंत तो आपला खूप लाडका असतो. पण जेव्हा तो आपल्या मनाविरुद्ध आचरण करू लागतो, तेव्हा त्याच्यावरील प्रेम अचानक आटते आणि मग आपण त्याच्यावर बंधने घालू लागतो. त्याचप्रमाणे पत्नी जोपर्यंत आपल्या पतीच्या इच्छेनुसार वागते, तोपर्यंत ती त्याच्या प्रेमास पात्र ठरते. परंतु जेव्हा ती स्वत: स्वतंत्र व्यक्तीमत्त्व घडवू इच्छिते आणि पतीच्या सिद्धांताचा अथवा आदर्शापेक्षा वेगळ्या सिद्धांताचा पुरस्कार करू लागते, तेव्हा तिच्या पतीचे तिच्यावरील प्रेम अदृष्य होते आणि मग त्यांच्यातील संघर्षाला सुरुवात होते. यावरून असे वाटते की, आपण ज्याला प्रेम म्हणतो ते फक्त स्वत:वरीलच प्रेम असते.

  जेव्हा आपण दुस-यावर प्रेम करतो असे म्हणतो, तेव्हा खरं म्हणजे आपण आपल्या मानसिक सुखाच्या पूर्ततेसाठी समोरच्या व्यक्तीला साधन बनवीत असतो. आजकाल प्रेमविवाहाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे; पण त्यापैकी अधिक प्रेमविवाहाची परिणीती घटस्फोटात होते. कारण व्यक्ती आपल्या भिन्न स्वभावाच्या व्यक्तीवर प्रेम करते, ते केवळ स्वत:मध्ये नसलेल्या त्याच्या गुणांमुळे…परंतु भिन्न स्वभावाच्या माणसात विपरीत स्वभावगुणाने त्यांच्यात संघर्ष निर्माण होऊ लागतात. म्हणूनच त्याचे प्रेम खरे होते असं म्हणणं योग्य नाही. मग खरं प्रेम म्हणजे नक्की काय? असा प्रश्न मनात निर्माण होतो. वास्तव्यात खरं प्रेम हे आंतरिक चैतन्य असते. बाह्य आचरण नसते. प्रेम हे अंतर्मनाचे स्वयंस्फुरण असते.

  प्रेम एखाद्या बाह्य वस्तूवरच बसते असं नाही, तर आपल्या मनात प्रेमाचा अंबड प्रवाह वाहत असतो. ज्याप्रमाणे सूर्य स्वयंस्फूर्त असते, त्याचप्रमाणे प्रत्येकाचे मन अथांग प्रेमाने पुरेपुर भरलेले असावे. मग त्याच्यासमोर प्रेम करण्यासाठी एखादी व्यक्तीच असणे आवश्यक नसते. प्रेम ही एक अशी आंतरिक स्थिती आहे की, ज्यामुळे संपर्कात येणा-या प्रत्येक व्यक्तीवर, वस्तूवर ती प्रेम करू लागते. राबीया नावाच्या एका संन्याशीला विचारले की, “तुम्ही अल्लावर प्रेम करता म्हणजे सैतानाचा धिक्कार करता ना!” तर तिने उत्तर दिले की, माझ्या मनात अल्लाविषयीचे प्रेम इतके भरलेले आहे की, सैतानावरील तिरस्कारासाठी त्यात जागाच नाही. राबीयाच्या मनात प्रेमाचा असा अखंड झरा वाहत होता, जो पुण्यात्मा किंवा पापात्मा असा नसतो. जेव्हा प्रेम हा माणसाचा स्वभाव बनतो, तेव्हा त्याच्या मनात घृणेला स्थानच नसते. ख-या प्रेमात एकमेकांविषयी मानसिक दुरावाच राहत नाही. जेव्हा समस्त जीवांप्रति प्रेम वाटू लागते त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे संत महावीर…ते जेव्हा रस्त्यावरून चालत असत, तेव्हा आपल्या पायाखाली एखादी मुंगीही चिरडली जाऊ नये याबाबत दक्षता बाळगत. यावरून मनात ख-या प्रेमाची भावना असल्याशिवाय अहिंसेचे आचरण शक्य नाही, हे दिसून येते.

  प्रेमाचे अनेक भन्नाट किस्से सतत समोर येत असतात. काही लोक प्रेमासाठी वाटेल ते करतात. इन्स्टाग्रामवर झालेल्या ओळखीतून पंजाबहून थेट परतवाडा गाठत एका अल्पवयीन मुलीला पळवून नेण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका १७ वर्षीय मुलाला नागपूर रेल्वे पोलिसांनी मंगळवारी रात्री ताब्यात घेतले. अल्पवयीन अपहरणकर्ता लुधियाना जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्याने त्या अल्पवयीन मुलीला शारीरिक संबंध बनविण्याच्या हेतूने पळवून नेण्याचा प्रयत्न केला, अशा तक्रारीवरून परतवाडा पोलिसांनी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्याला बालगृहात पाठविण्यात आले आहे.

  परतवाडा येथील एका अल्पवयीन मुलीची इन्स्टाग्राम व स्नॅपचॅटवर या १७ वर्षीय मुलाशी ओळख झाली. पुढे दोघांमधील प्रेमसंवाद वाढला. तासन तास दोघांचाही वेळ सोशल मीडियावर जाऊ लागला. दोघांनी प्रेमाच्या आणाभाका घेतल्या. दरम्यान, एकमेकांना पाहण्याची ओढ आणि प्रेमाच्या अतिरेकामुळे तो १२ जूनच्या सुमारास घरी काहीही न सांगता पंजाबहून अमरावतीच्या प्रवासाला निघाला. १३ जून रोजी बडनेरा रेल्वे स्टेशन गाठले. तेथून तो एसटीने परतवाडा शहरात पोहोचला. आपण परतवाड्यात पोहोचल्याची माहिती मैत्रिणीला दिली. १४ जून रोजी कुटुंब निद्राधीन असताना पहाटे २.१५ च्या सुमारास तो मुलीच्या घराबाहेर पोहोचला. तिला घेऊन तो ऑटोरिक्षाने पसार झाला. पुढे हे जोडपे नागपूरला पोहोचले. इकडे मुलगी दिसत नाही म्हणून प्रचंड शोधाशोध करीत असताना तिच्या पालकांनी परतवाडा पोलीस ठाणे गाठले. तक्रार नोंदविणे सुरू असतानाच त्या मुलीला एका मुलासह ताब्यात घेतल्याची माहिती नागपूर आरपीएफने परतवाडा पोलिसांना दिली.

  आरपीएफ नागपूरच्या माहितीवरून महिला अंमलदारांसह दोन पोलिसांना नागपूरला पाठविण्यात आले. तेथून त्या अल्पवयीन मुला-मुलीला बुधवारी ताब्यात घेण्यात आले. मुलीला पालकाच्या स्वाधीन करण्यात आले. मुलाला बालगृहात हलविण्यात आले. तो तिला लुधियाना येथे पळवून नेण्याच्या प्रयत्नात होता.

  प्रेमाला वयाचं बंधन नसतं असं म्हणतात. अशीच एक अजब घटना आता समोर आली आहे. २५ वर्षीय नवरी आणि ७० वर्षीय नव-याने लग्न केले आहे. पण जगाची पर्वा न करता, लोक काय म्हणतील याचा विचार न करता हे दोघंही अत्यंत आनंदाने आयुष्य जगत आहेत. वयामध्ये खूप मोठं अंतर असलं तरी त्यांच्या नात्यावर अजिबात परिणाम होत नसल्याचं देखील या कपलने म्हटलं आहे. कॅनडामध्ये ही अजब घटना घडली आहे.

  एका शोमध्ये पती-पत्नीने आपल्या नात्याविषयी माहिती दिली आहे. स्टेफनी आणि डॉन अशी या दोघांची नावं आहेत. स्टेफनीचं वय २५ आहे तर डॉन यांचं वय ७० वर्ष आहे. त्यांच्या वयात तब्बल ४५ वर्षांचं अंतर आहे. पण हे वय आपल्या नात्याच्या आड कधीही येत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. लोकांना काय वाटतं? याची पर्वा करत नसल्याचंही त्यांनी सांगितलं. एका शोमध्ये त्यांनी स्वतःबद्दलची ही माहिती दिली आहे. पत्नी स्टेफनी हिने Love Don’t Judge या शोमध्ये सांगितलं की, ५ वर्षांपूर्वी ती डॉन यांना एका पबमध्ये भेटली.

  पबमध्ये ती काम करत होती. डॉन जेव्हा या पबमध्ये यायचे, तेव्हा तिला खूप आनंद व्हायचा. त्यानंतर त्यांच्यातली जवळीक वाढली. मग त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. मात्र लग्नाबाबत आपल्या घरचे खूश नसल्याचं स्टेफनीनं सांगितलं. जेव्हा आई-वडील आणि भावाला त्यांच्या नात्याबद्दल कळालं, तेव्हा त्यांना स्टेफनीची काळजी वाटली. वयातल्या अंतरामुळे हे नातं फार काळ टिकू शकणार नाही, अशी भीती घरच्यांना होती. मात्र स्टेफनी आणि डॉन यांनी कोणाच्याही बोलण्याकडे दुर्लक्ष करत लग्न केलं.

  या कपलला दोन वर्षांचा मुलगाही आहे. त्याचं नाव लाचलान असं आहे. डॉन सांगतात, की अनेकदा लोकांना ते लाचलानचे आजोबा आहेत असं वाटतं. पण अशा लोकांच्या बोलण्याकडे आपण लक्ष देत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच लोकांना खरं काय ते सांगण्याचा देखील प्रयत्न करत नाही. डॉन यांच्या जीवनविम्याच्या पैशांसाठी आपण त्यांच्यासोबत राहत असल्याचं अनेकांना वाटतं, असं स्टेफनीचं म्हणणं आहे; मात्र हे दोघेही जगाची पर्वा न करता आनंदाने जगत आहेत.

  शब्दस्पर्शी-सुनील शिरपुरे
  कमळवेल्ली,यवतमाळ
  भ्रमणध्वनी-७०५७१८५४७९