जन्मदात्यांनो !

  माझ्या जन्मदात्यांनो !
  तुमच्या पायांच्या भेगा
  आणि हातांच्या अगणित जखमातून
  अधोरेखीत होणारी तुमची आभाळमाया
  काळीज कप्प्यात निरंतर सलत असते!

Thank you for reading this post, don't forget to subscribe!
  जणू , तुमच्या काळजाचे ठोके
  केवळ माझ्या उत्कर्षासाठी धावायचे रात्रंदिवस,
  गरीबीच्या जोखडातून पिल्लांना मुक्त करून नभात ऊंच भरारी घ्यायला शिकवायचे !
  तेव्हा तुमचा भविष्याचा वेध बघून मी पुरता हादरायचो !
  तुमच्यातल्या अगणित कष्टाला, धाडसाला, साहसाला, शिस्तीला, आत्मविश्वासाला, नियोजनाला आणि खंबीर मातृत्व व पितृत्वाला सन्मानाने नमनच!
  आज सारंकाही खुशालीचं असतांनाही मनात हूरहूर वाटतेय हो…
  तुमच्यासाठीची शेवटपर्यंत चाललेली माझी निरर्थक धडपड ,तुम्ही लुकलुकत्या डोळ्यांनी मरणासन्न खाटेवरून बघायचे इस्पीतळात असह्यपणे !

  तरीही कठोर मनाने,
  निसर्ग नियमाप्रमाणे
  तुम्ही मला पोरके करून गेलात
  मागे अनेक प्रश्न ठेऊन गेलात
  त्यावेळी खुप हळहळलो होतो,
  तडफडलो होतो, मुकलो होतो तुमच्या मायेला कायमचा !

  आता उरल्यात फक्त कँलेंडरच्या तारखात आणि स्मृतिपटलावर कोरलेल्या आठवणी त्यांनाच कुरवाळतो आहो
  आलेला प्रत्येक क्षण पुढे ढकलतो आहो !
  संकटांशी दोन हात करून जगण्याची
  तुमची शिकवण अजूनही माझ्या कानात घुमते आहे !
  म्हणूनच मी जगतो आहो,
  संकटांशी लढतो आहो
  तुमच्याचसारखा नित्य,
  ऊभा आहे असंख्य वादळं झेलत
  वादळातील दीपस्तंभासारखा
  पिंपळाच्या सावलीत !

  तुमचाच
  -अरुण विघ्ने
  वर्धा