- ग्रामपंचायतच्या मुख्य आवारात
- भल्यामोठ्या अक्षरातील
- दारिद्र्यरेषेखालील लाभार्थ्यांच्या
- गुणांच्या यादीमध्ये
- उच्च रक्तदाबाचा त्रास झालागत
- घुसमटतेय गेली कित्येक वर्ष घरकुलाचे स्वप्न..
- कधी पात्र लाभार्थ्यांचे निकष अपुरे पडतात,
- तर कधी याला त्याला द्यायची हिरवी नोट नसल्याने,
- गाळल्या जाते नाव अगदी शेवटच्या क्षणी
- हळूच…
- बापाच्या कित्येक टायवरी चपला
- ग्रामपंचायतच्या पायऱ्या घासून-घासून
- बठ्ठर झाल्या त्याचं त्यालाच माहीत…
- कधी चुकून भुलून आलच एकदाचं नाव
- तर जीवनातल्या चार आश्रमासारखे
- दिसायला लागतात डोळ्यापुढे चार चेक
- अन् सुरू होते त्याची धडपड
- मातीतुन, कुडातून, धुरड्यातून
- सिमेंटममध्ये येऊन
- सोफीस्टिकेटेड होण्यासाठी
- पहिला चेक हातात येण्या आधीच
- कारकूनापासून ते साहेबापर्यंत
- केली जाते वाटणी
- आपापल्या हिश्याची,
- अन् तिथुनच बापाच्या स्वप्नांचे
- भागाकार होत जातात
- बाप नाइलाजाने हो म्हणावं लागतं
- स्वप्नातल्या घरकुलासाठी…
- दुसरा तिसरा चेक येतो
- सिमेंटचे टोपले उचलून
- जेवढं शक्य होईल
- तेवढं काम घरीच करून
- बाप घामाझोकील होतो
- आता कुठे त्याला सुगीचे
- कॉलम दिसायला
- लागता न लागता तोच….
- अरे !!काय बोलतोस काय ?
- चौथ्या चेकची रक्कम
- कालच खर्च झाली म्हणे,
- तरी बाप आज सकाळीच दिसला
- पुन्हा व्याजावर पैसे घेतांना
- घरावर पत्रे टाकण्यासाठी
- काय रे ?आपणही उघडे,
- आपलं घरकुलही उघडं,
- मग आपली स्वप्नेही कसे झाकल्या जातील ?
- तेही खुलेआम धुळ खात बसलेय उघड्यावरच…
- साली जिंदगीना चक्रवाढ
- व्याजासारखी झाली रे
- फक्त घामातून मिळवलेल्या
- तुटपुंज्या मिळकतीवर
- व्याजावरचे व्याजच फेडतोय
- मुद्दल तर तसेच ढिम्म दगडासारखं…
- आमरण सोबत असल्यासारखं…
- -प्रविण जगन्नाथ बोपुलकर
- खेट्री,जि. अकोला