• Mon. Jun 5th, 2023

गोरबंजारा समाजातील गौरवशाली ऐतिहासिक परंपरा आणि चालीरीती उजागर करणारा ग्रंथ-गोरमाटी लोकजीवन काल आणि आज

  गोरबंजारा साहित्यातच नाही तर मराठी साहित्यामध्ये अत्यंत गाजलेल्या ‘आठवणीचे गाठोडं’ या पुस्तकांचे लेखक मा. मोतीराम रूपसिंग राठोड यांना यंदाचा प्रसादबन या पुरस्काराने रोख 2500 रुपये देऊन गौरविण्यात आले आहे.त्याबद्दल सरांचे मनपूर्वक अभिनंदन..! सरांचा आठवणींच गाठोडं हे अत्यंत गाजलेलं पुस्तक. नुकतचं त्या पुस्तकावर मी समीक्षा केलेली असून ती समीक्षा प्रचंड लोकांना आवडलेली आहे. मोतीराम रूपसिंग राठोड या लेखकांनी आपल्या बाल वयापासून तर नोकरी लागेपर्यंत सोसलेल्या, भोगलेल्या मान, अपमान,भावभावनाचे आणि संघर्षमय जिवनाचे वर्णन अत्यंत परखड आणि स्पष्ट शब्दांमध्ये मांडलेले असून हा संघर्ष कहाणीचा एक अनमोल ग्रंथ आहे.

  बंजारा तांडयामध्ये शिक्षणाचा अभाव, दारिद्र्य, अंधश्रद्धा,वाईट परंपरा,जुन्या चालीरीती आणि लोक मानस अशा अनेक गोष्टीवर प्रकाश टाकणारा हा ग्रंथ त्यांनी लिहून मराठी साहित्या मध्ये फार मोठी भर टाकलेली आहे. सरांचे पहिले पुस्तक गाजल्यानंतर सरांनी ज्या समाजातून आलो. त्या समाजाचा गौरवशाली इतिहास, परंपरा चालीरीती सण उत्सव याचा सर्वांगीण आणि सूक्ष्म अभ्यास करून त्यांनी दुसरे पुस्तक ‘गोरमाटी लोकजीवन काल आणि आज’ हे लिहिलेले आहे. आठवणीचं गाठोडं या पुस्तकाची समीक्षा केल्यामुळे त्यांनी गोरमाटी लोकजीवन काल आणि आज या पुस्तकाची प्रस्तावना आपणच लिहावी असा आग्रह धरला. आणि त्यांनी ते त्या पुस्तकाचे पीडीएफ मला पाठविले. माझं अंत:स्वर या गोरबंजारा साहित्य समीक्षा ग्रंथाचे काम चालू असल्यामुळे मी प्रचंड कामात असून सुद्धा गोरमाटी लोकजीवन काल आणि आज हे पुस्तक नांदेड प्रवासादरम्यान वाचून काढले. आणि खरोखरच अत्यंत अभ्यासपूर्ण आणि ऐतिहासिक असलेल्या पुस्तकाची प्रस्तावना करण्याचे भाग्य मला लाभले आहे. त्यासाठी मी लेखक मोतीराम राठोड सरांना धन्यवाद देतो !

  सरांनी या पुस्तकाचे नाव केसुला ठेवले होते. परंतु ते नाव या पुस्तकाला साजेसे नसल्यामुळे सरांना मी विनंती केली. या पुस्तकाचे नाव जर गोरमाटी लोक जीवन काल आणि आज ठेवले तर फार चांगले होईल. सरांनी कुठेही आढेवेढे न घेता माझ्या शब्दाला मान देऊन या पुस्तकाचे नाव ‘गोरमाटी लोकजीवन काल आणि आज’ ठेवलेले आहे. त्याबद्दल मी सरांचा आभार व्यक्त करतो!

  गोरबंजारा समाजातील अनेक लेखकांपैकी हा प्रतिभावंत लेखक मोतीराम रूपसिंग राठोड शिक्षक नोकरीपासून गटशिक्षणाधिकारी पदापर्यंत मजल मारलेल्या या लेखकांचा दांडगा अनुभव, मेहनत करण्याची जिद्द, प्रामाणिकपणा आणि अभ्यासू वृत्तीमुळे ते नवनवीन साहित्य साहित्य क्षेत्रामध्ये दाखल करत आहे. हे समग्र गोरगणासाठी आंनदायी बाब आहे. निश्चितच या पुस्तकाचे वाचक स्वागत करतील. अशी मला आशा आहे. ‘गोरमाटी लोकजीवन काल आणि आज’ या पुस्तकामध्ये बंजाराचे घर, बंजारा समाज, बंजारा न्याय-निवाडा, बंजारा मनोरंजन, बंजारा विवाहपद्धती, बंजारा समाज रडतो का, बंजारा कुळ/गोत्र भाई, बंजारा समाज समज/गैरसमज, बंजारा पूजा विधी व कुटुंब पद्धती, बंजारा भांडण, बंजारा वेशभूषा व दागिने, बंजारा सण अशा विषयावर त्यांनी वेगळ्याच धाटणीने प्रकाश टाकलेला आहे. यापूर्वी गोरबंजारा साहित्य क्षेत्रामध्ये गोरबंजारा समाजाच्या संस्कृती आणि चालीरीती यावर अनेक पुस्तके आली. परंतु लेखक मोतीराम राठोड सरांनी जे या पुस्तकांमध्ये विषय हाताळलेले आहे. त्याची गंभीरपणे चर्चा व्हायला हरकत नाही. यामधील विषय हे अत्यंत महत्वाचे असून वस्तुस्थितीला आणि परंपरेला धरून आहेत. कुठेही विषयाचे पालाळं लावलेले नसून महत्त्वपूर्ण माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे.

  गोरबंजारा समाज हा निसर्ग पूजक मूळ निवासी समाज असून त्यांची परंपरा ही फार मोठी ऐतिहासिक आणि गौरवशाली होती. परंतु आपल्या देशामध्ये आर्य लोकांनी सिंधू संस्कृती जाळून टाकली. आणि तिथून गोरबंजारा समाजाची पूर्ण देशामध्ये सिंधू संस्कृती नष्ट झाल्यामुळे गोरबंजारा समाजाला भटकंती करावी लागली. लदेणी व्यवसाय करणारा हा समाज इंग्रजाच्या राजवटीमध्ये रेल्वे लाईन आल्यामुळे लदेणी हा व्यवसाय सुद्धा बुडाला. आणि शंभर एक वर्षापूर्वी गोर बंजारा समाजाचे तांडे हळूहळू स्थिर होऊ लागले.ते कसे स्थिर झाले.पालं ऐवजी कशी झोपडी आली. झोपडी आणि झुपडा त्यानंतर दगडाची घरे आली. घनदाट जंगलाच्या पायथ्याशी राहणारा हा बंजारा समाज छोट्याशा घरांमध्ये राहून आपली गुजरान कसा करत होता. झोपडी घर बांधकाम करिता लागणारी थुंळी, वासे. ते किती बाय किती फुटाचे असावेत. घर लीपेर, घरांमधील सामान साहित्य, गुणी, टाबरो, कमी उंचीचे दरवाजे घरामधील चुली, मंगळा खाण्यापिण्याचे साहित्य या सर्व गोष्टीचा अगदी सुक्षमपणे अभ्यास करून लेखक मोतीराम राठोड सरांनी या पुस्तकाची सुरेख मांडणी केलेली आहे.

  लेखक मोतीराम राठोड सरांचे जीवनचं तांडया मध्ये गेले. तांड्याची नाळ जोडलेला हा लेखक तांडयामधील गीत, लोकगीत ,लोकपरंपरा आणि लोक जीवनाशी समरस झालेला आहे. त्यामुळेच त्यांनी तांडयातील जे चाळीस वर्षांपूर्वी अनुभवलं त्या एकेक गोष्टी आठवून त्यांनी या गोरमाटी लोकजीवन काल आणि आज पुस्तकात प्रामाणिकपणे मांडलेल्या आहेत. बंजारा समाज आणि त्या समाजाचा गौरवशाली इतिहास इंग्रजांनी लादलेला सन 1871 सालाचा गुन्हेगारी जमातीचा कायदा सन 1952 साली भारत सरकारने या जातीवर बसलेला गुन्हेगार शिक्का पुसून टाकला. या सर्व ऐतिहासिक घटनेचा अत्यंत चांगल्या प्रकारे त्यांनी या पुस्तकात मांडणी केलेली आहे. ते एवढेच लिहून थांबत नाही. तर आजच्या बंजारा समाजाची आर्थिक परिस्थिती आहे. ती समाधानकारक नसल्यामुळे बंजारा तांड्यात आजही वैचारिक प्रभावाचा अभाव असल्याचे ते ठासून सांगतात.

  आजही बंजारा समाजामध्ये अंधश्रद्धेचा पगडा मजबूत असून, आजही बंजारा समाज अप्रगत आणि जुनाट व्यवसायात गुरफटलेला आहे. अजूनही शिक्षण तांडया-तांडया मध्ये पोचलेले नसून पाहिजे तेवढ्या प्रमाणात शिक्षणाचे महत्त्व कळालेले नाही. आधुनिक सुविधा आणि उच्च शिक्षणाचा तांड्यात आजही अभाव दिसून येतो. परंतु तांड्यातील पुढारी हे स्वतःपुरते विचार करताना दिसतात. आजही गोरबंजारा समाजाचे आमदार, खासदार तांडयाकडे फिरकत नाही. ते स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण करतात. हे सांगण्यासही लेखक मोतीराम राठोड डगमगत नाही. काहीतरी हालगु मालगु लिहिणे. हे लेखक मोतीराम राठोड सरांचा पिंड नाही.

  गोरबंजारा समाजातील रामराम करण्याची परंपरा,आलेल्या पाहुण्यांचे म्हणजे पामळों यांचे स्वागत करण्याची पद्धत त्यांनी अत्यंत खुबीने या पुस्तकात मांडलेली आहे. न्याय निवाडा कशा पद्धतीने करतात याची इत्थंभूत माहिती त्यांनी या पुस्तकात देऊन बंजारा समाजाचे मनोरंजन या विषयांमध्ये सुद्धा त्यांनी अभ्यासपूर्ण लेखन केले आहे. स्त्रियाचें गाणे त्यांच्या जीवनातील सुख दुखांचे, भावभावनांचे असायचे. त्यांचा होणारा छळ त्या गाण्यातून त्या व्यक्त करायच्यां माणसाचे विशेष कौतुक करताना त्या गीत गायाच्या….

  नांदेड रोड धिरोजी गाडी ।
  गाडीमा याडी बेटीच ये
  गाडी धिरो जायदो
  मुखेडेरी रोड धिरो जो गाडी गाडीमा बापु बेटोच
  गाडी धिरी जायदो

  असे अनेक सुंदर आणि मनाला भावणारे गीत देऊन या पुस्तकाची सरांनी उंची वाढवलेली आहे. गोर बंजारा समाजाची विवाह पद्धती ही सगळ्या विवाह पद्धतीपेक्षा कशी वेगळी आणि चांगली आहे. याबाबतचा सर्व लहान सहान रूढी परंपरा व त्यांनी बंजारा विवाह पद्धती यामध्ये गोळ खायरो, साकीयारो रपिया, दागिना, वदई, घोटा घोळेरो, टिळा घोटार हाट, हांडी मुसलाचे दोन रुपये, मेहंदी पिसेरो, ढोरणं बांधणो या सर्व गोष्टी त्यांनी अभ्यासपूर्ण अंतर्भूत केलेल्या आहेत. नवरी आपल्या ढावलो मध्ये सुंदर असे भावपूर्ण तेवढेच रोमांचकारी दु:खाचे गीत गाते त्या गीताचा दाखला देत.त्यांनी या पुस्तकांमध्ये वाचकांना भावनाविवश करण्याचा प्रयत्न केलेला आहे.

  सोने चांदीरो भाव करन बापू वेच नाको मन
  लुगें डोडारी पुडीकरण याडी गोकलय मन
  ढोरे छेळीरो भाव करन विरा वेचनाको मन
  लुंगे डोडारी पुडी करन भावजय गोकलाय मन

  हे अत्यंत भावस्पर्शी गीत आपल्या ढावलो या प्रकारातून जगाच्या पाठीवर फक्त गोरबंजारा समाजातील स्त्रीच रडता रडता गाणे गाणारी एकमेव स्त्री आहे. असे गोरबंजारा जातीतील अनेक गोष्टी अभ्यासपूर्ण त्यांनी या गोरमाटी लोकजीवन काल आणि आज या पुस्तकात सुंदर रीतीने मांडलेल्या आहे. एवढेच नव्हे तर वर्षोनवर्षे भटकंती करणारा हा समाज गुन्हेगार जमातीचा कायदा आल्यामुळे एका ठिकाणी वस्ती करून राहता येत नाही. म्हणून त्यांच्या नशिबी भटकंती आली दोन दिवसाच्या वर कोणत्याही गावात राहता येत नाही. त्यामुळे ते सतत भटकत राहायचे जीवन जगण्याच्या कोणतेही साधन सुविधा नसताना हा भटकंती करणारा समाज महामारी, रोगराई यामध्ये मुंग्यावानी माणसे मरायची,एकाची अंतविधी केली दुसरा मरून पडायचा. त्यामुळे पुन्हा भेट होईल की नाही याची खात्री नसल्यामुळे बंजारा समाजातील माणसे एकमेकांना भेटली. तर ती रडायची या गोष्टीचा सुक्ष्म आणि विस्ताराने या पुस्तकात मांडणी केली आहे.

  बंजारा समाज अनेक कुळ गोत्रात विभागलेला असून सारंगी, ढालिया, ढाडी न्हावी, बंजारा सोनार, हिंदू धर्मात जसे कर्मानुसार वर्ण तयार झाले.तसेच बंजारा समाजातील व्यवसायाच्या कामाच्या वाटणीवरून त्यांना नाव दिल्याचे दिसून येते. नृत्य व गाणे हे बंजारा समाजाचे आणि बंजारा संस्कृतीचे अविभाज्य भाग आहे. राठोड कुळाचे पाढे, चक्रीगडाचे चव्हाणचे पाढे धानानगर पवारचे पाढे, जाधवचे पाढे एवढेच नाहीतर बंजारा तुरी लोकांचा उल्लेख सुद्धा या पुस्तकात समाविष्ट केलेला आहे. बंजारा समाजामध्ये पूर्वीच्या काळी आणि आजही समज गैरसमज असून यामध्ये जादूटोणा,करणी, डाकी भानामती असे अनेक प्रकार असून भानामती या अंधश्रद्धेविषयी त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे मांडणी करून हा प्रकार कसा बोगस आहे हे वाचकाला पटवून देण्या मध्ये ते यशस्वी झालेले आहे. बंजारा समाजाच्या विधिव कुटुंब पद्धती याबाबतचा सुद्धा त्यांनी अभ्यास करून या पुस्तकामध्ये विस्तृत माहिती देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. बंजारा समाजातील स्त्रिया सकाळी उठल्याबरोबर कशा भांडण करतात ते भांडणात कशा शिव्या देतात याचीसुद्धा माहिती लेखकांनी या पुस्तकामध्ये दिलेली आहे. बंजारा समाजाचे भांडण हे सदर वाचतांना मात्र हसू आवरत नाही. बाया कशा घाण घाण शिव्या देतात. हे सर्व त्यांनी अभ्यासपूर्ण या पुस्तकात मांडलेले आहे.

  बंजारा वेशभूषा आणि दागिने या सदरात काचळी,भेटिया, लेपो, सदरा गोट, कपड्या कुंड्या, पावडी, लोमडी कुकरी, घुगंटो, हासली,फुलिा, भुरिया, फुली, कसोट्या, बदलू ,माडली गजरा, चुडो, बलिया, हासलो,चौकडी अशा अनेक गोरबंजारा आभूषणे बंजारा याडी वापरत होती. त्या सर्व वेशभूषा आणि दागिन्यांचा फार बारकाईने अभ्यास करून गोरमाटी लोकजीवन काल आणि आज या पुस्तकात त्यांनी मांडणी केलेली आहे.

  गोरबंजारा लोकांचे सण जसे पोळा, तीज, होळी, दवाळी या सणावर त्यांनी माहिती दिली. असून निसर्गाचा कोप होऊ नये म्हणून धरती मातेला पूजणारा आणि बकऱ्याचा बळी देणारा हा समाज प्रत्येक सण तेव्हारामध्ये कसा दारू पितो याबाबतची माहिती त्यांनी दिलेली आहे. एवढेच नाही. तर पूजा करण्याची पद्धत आणि प्रत्येक सणवारातील गोरबंजारा समाजाची गौरवशाली लोकगीत परंपरा यावर सुद्धा त्यांनी अनेक गीताद्वारे प्रकाश टाकलेला आहे. गीत होळी लेंगी, वायार गीत, वांझणा अशा अनेक चालीरीती बाबत त्यांनी अनेक तांडया तांड्यात जाऊन ही सर्व माहिती संकलन करून त्यांनी गोरमाटी लोकजीवन काल आणि आज पुस्तक अत्यंत अभ्यासपूर्ण लिहिल्यामुळे हे पुस्तक निश्चितच वाचकांना आवडेल असे माझे प्रामाणिक मत आहे. कोणताही आडपडदा न ठेवता स्पष्टपणे या पुस्तकाची मांडणी लेखकाने केली असून गोरबंजारा समाजातील गोरबंजारा संस्कृती, लोकजीवन, लोकगीते याबाबत अनेक लेखकांची पुस्तके आली परंतु लेखक मोतीराम राठोड सरांच्या पुस्तकाची मांडणी ही वेगळ्याच धाटणीची आहे. साधारणतः ऐतिहासिक पुस्तके लिहीत असतांना बरीच लेखक मंडळी संदर्भ ग्रंथाचा वापर सर्रास केला करतात परंतु लेखक मोतीराम राठोड सरांनी कुठल्याही संदर्भ ग्रंथाचा आधार न घेता अनेक तांडया तांडया मध्ये जाऊन आणि आपण स्वतः अनुभवलेल्या गोरबंजारा गौरवशाली इतिहासाची चालीरीती, परंपरा सण तेव्हाराची माहिती 40 वर्षांपूर्वीची आठवून त्यांनी हे पुस्तक मोठ्या ताकतीने लिहून वाचकांसमोर ठेवण्याचा जो प्रयत्न केलेला आहे. त्याबद्दल त्यांचे कौतुक करणे तेवढे कमीच आहे.

  दहा विस पुस्तक लिहूनही एखादा माणूस साहित्यक्षेत्रात प्रसिद्ध होत नाही. परंतु एकच पुस्तक लिहून लेखक मोतीराम राठोड सर हे प्रचंड मराठी साहित्य आणि गोरसाहित्यामध्ये प्रसिद्ध झालेले आहे. आणि त्यांचे हे दुसरे पुस्तक मराठी साहित्यामध्ये निश्चितच खळबळ माजवेल असा मला विश्वास आहे. सरांची लेखणी परखड, दर्जेदार आणि कोणाचेही भिड मुरवत न करता लिहिलेली लेखणी असून या लेखणीबाबत जेवढे लिहू तेवढे कमीच आहे.

  लेखक मोतीराम राठोड सरांचे छोटेसे हे ऐतिहासिक पुस्तक इतिहास संशोधक, प्राध्यापक आणि गोर विचारवंतांना निश्चितच कामी पडेल असे मला वाटते गोरबंजारा इतिहास संशोधकांना अतिशय अभ्यास पूर्ण माहिती असलेला ‘गोरमाटी लोकजीवन काल आणि आज’ हा ग्रंथ ऐतिहासिक बाबीसाठी कामी पडणार आहे. जेव्हा जेव्हा गोरबंजारा समाजाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा या पुस्तकाची इतिहास संशोधकांना दखल घ्यावीच लागेल. या पुस्तकाला मायनस करून गोरबंजारा संशोधक आणि इतिहासप्रेमींना पुढे जाता येणार नाही. एवढे हे पुस्तक महत्त्वाचे आणि अभ्यासपूर्ण लिहिल्या गेलेले आहे. त्यामुळे मी पुनश्च लेखक मोतीराम राठोड यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो..!आणि त्यांच्या साहित्य वाटचालीस माझ्या याडी परिवारातर्फे भरभरून शुभेच्छा देतो…!

  जय सेवा…… जय वसंत!

  ‘गोरमाटी लोकजीवन काल आणि आज’
  लेखक-मोतीराम रूपसिंग राठोड
  9922652407

  पुस्तके मिळण्याचे ठिकाण
  संजय सुरनर
  संगत प्रकाशन नांदेड
  किंमत -275 सवलतीत -100 रू.
  संपर्क-8149826454

  -याडीकार पंजाबराव चव्हाण,
  पुसद
  9421774372

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *