शब्दांचा शोध मानवी आयुकष्यातील महत्वाचा शोध मानला जातो. मानवाला शब्द गवसला आणि त्याची वैचारिक दिशाच बदलून गेली. तो अधिक प्रगल्भ झाला, आणि प्रभावी वाटचाल करू लागला. शब्द जर हाती आले नसते तर आपण आज जे काही वाचतो लिहितो, ती वाचन संस्कृती नसती, आणि ही साहित्य संस्कृती नसती तर आजची मानवी प्रगती नसती.साहित्य हे मानवी जीवनात महत्वाचं आहे. चांगलं सकस साहित्य माणसाला संस्कारित करत असतं. माणसाला दिशा देत असत. अंधाराकडून उजेडाकडे नेत असतं. मानवी जीवनात साहित्याच असं मोल असतं.
माणूस आपल्या भावभावना, व्यथावेदना, चीड, आक्रोश, शब्दाद्वारा, कथा कवितेतून मांडत आलाय. जे साहित्य मानवी सुखदुःख, वेदना, यांना उजागर करत आलंय ते साहित्य काळाच्या पटलावर स्थिरस्थावर झालं.निव्वळ मनोरंजनसाठी निर्माण झालेल साहित्य कालबाह्य ठरलं, ठरत आहे. मानवी जीवन अनेक सुखदुःखांनी, व्यथावेदनेनी, व्यापलेल असतं. त्या व्यथांची उकल करणं, अन्याय अत्याचाराला वाचा फोडनं, वेदनेच्या गर्तेतून मानवी जीवन बाहेर काढून सुखद आणि सुंदर जीवन बहाल करणं हेच चांगल्या साहित्यचं प्रयोजन असतं. माणसाला साहित्याची गरज याचसाठी असते. माणुसकेंद्री साहित्यच या प्रयोजनाला पूर्णत्व देऊ शकते.
साहित्यक्षेत्रात अनेक समंजस साहित्यकारांनी माणुसकेंद्री साहित्य लिहिलंय, आजच्या घडीलाही अनेक कवी लेखक लिहिताहेत आणि मानवी मूल्ये जपण्यासाठी लढा देताहेत.रत्ना यशवंत मनवरे या अशाच मुक्त श्वासाच्या शोधात आपली लढाऊ कविता घेऊन साहित्य प्रांतात दाखल झाल्याय.कोणताही साहित्यकार असो, त्याची साहित्य निर्मितीच्या मागे एक ठोस, भक्कम अशी भूमिका असते. भूमिकेशिवाय लिहिलेलं साहित्य हे “गोल-गोल” असतं, भूमिका घेऊन लिहिलं गेलेलं साहित्य मानवी हिताचं असतं. कवयित्री रत्ना मनवरे यांचा अलीकडे(1 नोव्हेंबर2021) “मुक्त श्वासाच्या शोधत” हा कविता संग्रह प्रकाशित झालाय.
आपल्या लेखनाच्या भूमिकेविषयी त्या मनोगतात लिहितात,”लेखनाची ओढ शाळा कॉलेज मधेच लागलेली होती पण त्याचा प्रवास कमीच, वाटले मनाला तर लिहायचं नाहीतर संसारात मग्न!” पुढे त्या लिहितात,”घर, परिवार, सण, उत्सव,यातच माझ्या भगिनी जास्त मग्न राहायच्या, आपल्या जन्माचे ध्येय काय? या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरीतच. मी माझ्यातील रमाई,सावित्री, जिजाऊ आता जागविली पाहिजे, त्यांचे महान कार्य भगिनींना समजावून सांगितले पाहिजे, ही तळमळ मनात होती, या मनस्वी तळमळीतून माझी प्रवाहबंद लेखणी पुन्हा प्रवाहात वाहू लागली”. रत्ना यशवंत मनवरे या गृहिणी आहेत. आपली कौटुंबिक जिम्मेदारी निभेउन नेताना काही काळ त्यांची लेखणी “डब्बाबंद” होती परंतु संसाराचा आणि जिम्मेदारीचा दोर जरा सैल होताच त्यांची लेखणी ” मोकळा श्वास ” घेऊ लागली. मोकळ्या श्वासांना कवितेचे रूप देता यावे म्हणून रत्ना मनवरे यांनी पुन्हा हाती लेखणी घेतली.
हाती लेखणी घेताना मात्र त्याची वैचारिक बाजू भक्कम आहे. सावित्रीआई, रमाई, जिजाऊ, फातिमा, अहिल्याबाई, यांचे विचार कवयित्री कोळून प्यालेली आहे, नव्हे तर त्यांच्या विचारांनी ती पुरती भारावून गेलेली आहे, प्रेरित झालेली आहे. कवयित्रीला सवित्रीआईचा , रमाई आईच्या कार्यकर्तृत्वाचा इतिहास माहिती आहे, तो मला माहिती आहे, तो इतर भगिनींना माहिती व्हावा याच तळमळीतून त्या लिहित्या झाल्याय. तसेच महामाया, यशोधरा, बुद्ध, फुले, आंबेडकर, शाहू शिवबा अण्णाभाऊ साठे कल्पना, सुनीता, इत्यादी प्रेरणांचा विचार कवयित्रीला कविता लिहिण्यास प्रेरित करत आलेला आहे.
जीवन संकटांनी भरलेलं असतं. सुख कमी आणि दुःख जास्त असं जीवन अनेकांच्या वाट्याला येतच. परंतु अश्यांनी खचून जाऊ नये म्हणून त्यांनी संकटांची प्रखर लढा दिला पाहिजे, संकटाच्या दगडाला हिंमतीने तराशुन सुखाची सुंदर नक्षी तय्यार केली पाहिजे हे सांगताना कवयित्रीने सुंदर ओळी लिहिल्या आहेत. बघा,” संकटात एकटी पहाड कोरणार आहे अडचणीत धाडसाने महाड साकारणार आहे” महाड हे गाव आणि त्या मागचा क्रांतिकारी इतिहास सर्वश्रुत आहे. संकटावर मात करत निराशेच्या गर्तेतून बाहेर कसे पडावे इतकेच सांगण्यासाठी कवयित्रीने किती सुंदर ओळी निवडल्याय. अगदी समर्पक शब्द, ही ताकद असते शब्दांची. आम्
- आम्हा घरी धन
- शब्दांचीच रत्ने,”
- तुकाराम बाबा सांगून गेले ते उगाच नव्हे.
मानवी समूहामुळे समाजाची निर्मिती होते, आणि समूह म्हटलं की बऱ्या- वाईट गोष्टी या आल्याच. पण समाजमनातून वाईट गोष्टी दूर व्हाव्यात, समाजअंगणात चांगल्या गोष्टी नांदाव्यात या करिता रत्ना मनवरे यांची कविता धडपडते. सामाजिक भान असलेल्या या कवयित्रीला समाज डोळस करण्याचा द्यास लागलाय, या ध्यासापोटी त्याची लेखणी लिहून जाते या सुंदर ओळी, बघा,
- “अंधाना मी डोळस करिन म्हणतो
- मानवतेचे चित्र रंगविण म्हणतो”.
समाजाचे वाचन करत असताना कवयित्रीला अनेक गोष्टींचे आकलन झालेले या संग्रहातील कवितेवरून दिसते, उदा. नवि ओळख या शीर्षकाची कविता, सर्व नाती जपणारी, सर्वांसाठी खपणारी, सर्वांना सांभाळून नेणारी तू नारी, या सर्वांना जपता जपता तू तुझ्यातील ओळख, तुझ्यातील तू ची ओळख विसरूनच गेली. तसेच, ” तो तोच असतो या शिर्षकाची कविता, मुलगा आणि मुलगी यात कसा फरक केला जातो, मुलीला कसे दुय्यम स्थान दिले जाते हे सत्य विशद करते.
अग्निपरिक्षा ही कविता तर संपूर्ण मानवी समूहाला अमानवी समूह कसा वेठीस धरतो, याचे यथार्थ चित्रण करते.तसेच झेप, माणुसकी, बाबा, मास्टर,माणसातील पशु, श्वास, भाकरीसाठी, समानतेच्या लढ्यासाठी, गणित जीवनाचे , मतदान, कोरोना,विटंबना, बलात्कार, क्रांती या सारख्या कवितेतून कवयित्रीने मांडलेले सामाजिक व्यवस्थेचे चित्रण, कवयित्री किती डोळसपणे समाजमन समजून घेते याची प्रचिती येते.
या कविता संग्रहात अनेक कविता या स्त्रीवादाशी निगडित आहेत. कवयित्री स्वतः एक स्त्री आहे, एक स्त्री दुसऱ्या स्त्रीच्या वेदना पुरुषापेक्षा अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकते. कवयित्रीला वाटतं की, स्त्रीच्या वाट्याला कष्ट जास्तच येतात,तिलाच साऱ्या प्रश्नांना सामोरे जावे लागते,तिला स्वतःच्या अनेक स्वप्नांना मारावे लागते, अनेक ठिकाणी अडजेस्टमेंट करावे लागते, अनेक प्रसंगी कारण नसताना नमतं घ्यावं लागते.स्त्री च्या संदर्भान रत्ना मनवरे यांनी केलेले आकलन अनेक कवितेतून आलेले आहे, स्त्रीच्या मनाची घुसमट मांडताना, रत्ना मनवरे यांच्या लेखणीचा श्वास ही अनेकदा गुदमरला आहे, परंतु आपल्या मार्गदर्शक प्रेरणांचा विचार तिला या सर्व घुसमटीतून बाहेर पडण्यासाठी मदत करतो आहे या घुसमटीतून कवयित्री स्वतः बाहेर पडते आणि इतरही स्त्रियांना उभे करण्यासाठी मार्गदर्शक ओळी लिहून जाते, त्या ओळी अश्या,
- “उठ तू कला गुणांना दे आकार
- तुझ्या स्वप्नांना कर साकार”.
स्त्री कमजोर नाही तर तीच जगाची खरी ताकद आहे हे सांगताना कवयित्री मोठ्या अभिमानाने लिहून जाते,
- “आईच्या उदरी
- जन्मली रे आई
- थोर जगी बाई
- एकमेव.”
मुक्त श्वासाच्या शोधत या कवितासंग्रहातील कवितांचे मुळात तीन भागात विभाजन करता येते, एक: मार्गदशक प्रेरणा, म्हणजे, सावित्री, रमाई, जिजाई, बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर, शिवबा, गाडगेबाबा, अण्णाभाऊ साठे, कल्पना, सुनीता, कवयित्रीचे आईवडील आणि शिक्षक हे सर्व कवयित्रीने प्रेरणास्थान आहेत, याच प्रेरणांचा विचारउजेड समाजाच्या अखेरच्या माणसापर्यंत पोहचवावा करिता त्यांनी त्यांच्या विचारावर आधारित कविता लिहिल्या आहेत, किंबहुना असे म्हणता यरील की याच मार्गदर्शक प्रेरणांनी कवयित्रीकडून कविता वदवून घेतल्या आहेत.
दोन: सामाजिक आशयाच्या कविता, मानवी समाजाचे चित्रण करणाऱ्या अनेक कविता यात विखुरलेल्या आहेत.
तीन; प्रेम कविता, अल्लड स्वभावाच्या पण मनाला मोहविणाऱ्या प्रेमाच्या दहा कविता यात आहेत, प्रेम, प्रेमासक्ती, सौंदर्य, यात पाहायला, वाचायला मिळते.
परंतु संपूर्ण संग्रह मनपूवर्क वाचताना असे जाणवले की रत्ना मनवरे यांच्यात दडलेली खरी कवयित्री ही सामाजिक अंगाने लिहिल्या गेलेल्या कवितेतच सापडते, किंवा असे म्हणता येईल की सामाजिक कवितेत कवयित्री अधिक प्रामाणिक आणि प्रगल्भपणे व्यक्त होते. या कवयित्रीला सामाजिक पुरेपूर भान आलेले आहे, प्रगल्भ विचाराने प्रेरित असलेल्या या कवयित्रीला रूढी- पर॔परेच्या जोखडात राहायचे नाही आहे, विनाकारण बंधनात राहायचे नाही आहे, या जुनाट परंपरेतील चिखलातुन तिला तिचा आणि तिच्या सारख्या अनेक स्त्रियांचा पाय मोकळा करायचा आहे, या विचित्र अश्या बंधनात तिचा गळा गुदमरतोय, तिला यातून मुक्त व्हायचे आहे, मोकळा श्वास घयायचा आहे.
“स्त्री आणि मुक्ती हे दोन्ही शब्द अनेक शतकांपासून परस्पर एकदूसर्यांचे पूरक बनण्यासाठी तडफडत आहेत” प्रस्तावनेत एके ठिकाणी डॉ युवराज सोनटक्के वरील विधान लिहून गेलेत. परंतु कवयित्रीला आता ही तडफड मान्य नाही, तिला हे सर्व पाश तोडायचे आहे, या अंधारातून तिला बाहेर पडायचे आहे, याच करिता तर तिने कवितारुपी मशाल हाती घेतली आहे, बाबासाहेब आनि ज्योतिबांच्या विचारांची “ठिणगी” लेखणीत पेरली आहे.आणि कवितारुपी आयुध सोबत घेऊन ” मुक्त श्वासाच्या शोधात” निघाली आहे. कवयित्रीला हा शोध जारी आहे. ती मार्गक्रमण करत आहे,तिच्या या प्रवासात कुठलीही अडचण येऊ नये, अशीच सर्वांची इच्छा आहे कारण कवयित्रीचा हा शोध तिच्या एकटीचा नसून प्रातिनिधिक स्वरूपाचा आहे.समष्ठीचा आहे.
मुक्त श्वासाच्या शोधात, या कवितासंग्रहातील कविता साध्या सोप्या भाषेत आहेत, उपमा अलंकार चा सोस टाळून लोकांच्या नेहमीच्या बोलीतील शब्द घेऊनच या रचना कवयित्रीने रचल्या आहेत, म्हणून या कविता सर्वांना कळतात, आपल्या मनातील बोल वाटतात. असे असंले तरी या कविता सूचक आहेत, त्या काहीतरी सुचवितात, त्यांची कविता प्रश्न मांडणारी आहे सोबतच त्या प्रश्नांचे उत्तर पण सांगणारी आहेत. स्वतःच्या अनुभवासह इतरांचेही अनुभव कवेत घेण्याचा प्रयत्न ही कविता करते.आणि म्हणून ही कविता समष्टीची होऊन जाते.
मनात आलेले विचार कवितेच्या रुपांन कागदावर उतरवताना कधी कधी आपण भान हरपून जातो, विचार आणि शब्द, अनुभव आणि अभिव्यक्ती यात कधी कधी फरक पडून जातो, असाच काहीसा फरक रत्ना मनवरे यांच्या कवितेत प्रस्तावनाकार डॉ युवराज सोनटक्के यांना दिसला असावा म्हणून प्रस्तावनेत त्यांनी लिहिलंय, ” थोड्या थोड्या शब्दात का असेना कवितेला तासून अर्थपूर्ण करणे चांगल्या कवीची ओळख असते, कवयित्रीचा प्रयत्न त्या दिशेने” काही” कवितेत दिसून येतो. वरील विधायानंतर मी वाचकांचे लक्ष याच संग्रहात अभिप्राय(?) म्हणून आठ पानी लेख लिहिणारे डॉ हबीब भंडारे यांच्या काही ओळींकडे वळवू इच्छितो. ते लिहितात,”मुक्त श्वासाच्या शोधात हा रत्ना मनवरे यांच्या कवितासंग्रहात माणसाला माणूसपण शिकवत माणुसकीच्या अस्तित्वाचा दिशादर्शक शोध घेणारी प्रेरक आशयाची अर्थसंपन्न कविता आहे.”
डॉ युवराज सोनटक्के यांनी दिलेली मोलाची “समज” आणि डॉ हबीब भंडारे यांनी दिलेली शाबासकीची “थाप” या दोन्ही गोष्टीवर काळजीपूर्वक लक्ष केंद्रित करून रत्ना मनवरे यांनी कवितेची पुढील वाटचाल अधिक समंजस पणे करावी. मला काय आवडते या पेक्षा वाचकाला काय भावते हे जाणून आपले लेखन करावे, असे मला नम्रपणे नमूद करावेसे वाटते. कवी अरुण काळे म्हणतात, “कुणी अक्षर सुधारण्यासाठी कविता लिहीत नसतो” मानवी दुःखाला वाचा फोडण्यासाठी कविता लिहिली जाते, असं सांगत कवी अरुण काळेच्या या ओळी आल्या आहेत. शेवटी अभियक्ती ही कवींच्या अनुभवावर अवलंबून असते.
- “थकलेल्या पाखरांना सावली देवू
- चल आपण माणुसकीचे झाड लावू”
या सारख्या अनेक मनमोहक आणि तितक्याच मार्मिक ओळी लिहिणाऱ्या आणि मानवी जीवनाचे सार सुंदर शब्दात मांडणाऱ्या रत्ना मनवरे यांच्या लेखणीतून आणखी सकस साहित्याची निर्मिती व्हावी हीच मनोमन इच्छा व्यक्त करतो, पुढील वाटचालीस शुभेछ्या देतो तूर्तास थांबतो.
- कवितासंग्रह : मुक्त श्वासाच्या शोधात
- कवयित्री : रत्ना मनवरे
- प्रकाशन : परिस प्रकाशन, पुणे
- मूल्य : 150/
- पृष्ठ : 112
- समीक्षक
- -संजय गोडघाटे
- जयभीम नगर
- नागपूर