- * राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त रोजगार मेळावा व रक्तदान शिबीराला मोठा प्रतिसाद
- * अमरावतीत लवकरच कार्यान्वित होणार ‘सारथी’चे विभागीय कार्यालय
- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : सारथी ही संस्था मराठा, कुणबी, कुणबी- मराठा, मराठा- कुणबी या लक्षित गटाच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकासासाठी कार्यरत असून, विविध विभागांच्या सहकार्याने अनेक उपक्रमांची अंमलबजावणी होत आहे. विशेषत: कौशल्य विकास व रोजगारनिर्मितीवर भर देण्यात असून, अधिकाधिक युवकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय महसूल उपायुक्त संजय पवार यांनी आज येथे केले.
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेतर्फे (सारथी) नियोजनभवनात आयोजित अमरावती विभागस्तरीय कौशल्य विकास जनजागृती मेळावा व रक्तदान शिबिराच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी श्री. पवार व विविध मान्यवरांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
अतिरिक्त जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, ‘सारथी’चे वरिष्ठ प्रकल्प संचालक (सामाजिक न्याय) डी. डी. देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद निरवणे, उपजिल्हाधिकारी रणजीत भोसले, समाजकल्याण उपायुक्त सुनील वारे, सहायक रोजगार व उद्योजकता आयुक्त प्रफुल्ल शेळके, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, मराठा सेवा संघाचे अरविंद गावंडे, अश्विन चौधरी, मराठा महासंघाचे भाऊसाहेब निचळ, नरेशचंद्र काठोळे, जयसिंहराव देशमुख, पल्लवी काठोळे आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांसाठी संवाद-सूचना कौशल्य, सॉफ्ट स्किल्स, इंग्रजीसहित इतर भाषांवर प्रभुत्व, आत्मविश्वास वृद्धी, व्यावसायिक मार्गदर्शन, समुपदेशन, कौशल्य, नैसर्गिक कल कौशल्य विकास आदी विविध कार्यक्रम शासनातर्फे राबविण्यात येतात. कौशल्याधारित प्रशिक्षणातून अनेक संधी प्राप्त होऊ शकतात. त्याचा युवकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय उपायुक्त श्री. पवार यांनी केले.
- ‘सारथी’चे कार्यालय लवकरच सुरू होणार : श्री. देशमुख
राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त राज्यातील आठ विभागीय ठिकाणी ‘सारथी’तर्फे विविध कार्यक्रम आयोजिण्यात आले. ‘सारथी’चे विभागीय कार्यालय अमरावतीत लवकरच कार्यान्वित होईल. त्यादृष्टीने जागेबाबत गतीने प्रयत्न होत आहेत. त्याचप्रमाणे, पुढील काळात विद्यार्थी व विद्यार्थीनींसाठी वसतिगृह, अभ्यासिका आदी उपक्रमही हाती घेण्याचे नियोजन आहे, असे, ‘सारथी’चे वरिष्ठ प्रकल्प संचालक डी. डी. देशमुख यांनी यावेळी सांगितले.
- ‘महास्वयम’ हे एकात्मिक वेब पोर्टल : श्री. शेळके
किमान कौशल्यावर आधारित प्रशिक्षण, रोजगारविषयक संधींची माहिती रोजगार मेळाव्यात देण्यात आली. होतकरूंना रोजगारविषयक संधी मिळवून देण्यासाठी ‘महास्वयम’ हे एकात्मिक वेब पोर्टल कार्यान्वित असून, रोजगारविषयक सर्व सुविधा एकाच व्यासपीठावर मिळत आहेत. ही प्रक्रिया जलद व पारदर्शक आहे. वेगवान संपर्क यंत्रणा हे त्याचे वैशिष्ट्य असून, सर्व सेवा विनामूल्य उपलब्ध आहेत. त्याचा युवकांनी लाभ घेण्याचे आवाहन सहायक आयुक्त श्री. शेळके यांनी केले.
- उद्यमशीलतेचा विकास करून आर्थिक विकास साधावा : श्री. मोंढे
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना, गट प्रकल्प कर्ज योजना राबवल्या जातात. त्याचा लाभ घेऊन नागरिकांनी उद्योग-व्यवसायात प्रगती साधावी, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा समन्वयक रोहित मोंढे यांनी केले. रक्तदान शिबिरात पन्नासहून अधिक युवक, अधिकारी- कर्मचारी, विविध क्षेत्रातील मान्यवर, महिलाभगिनींनी रक्तदान केले. या उपक्रमासाठी जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या चमूने सहकार्य केले. रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन यावेळी गौरविण्यात आले.
कार्यक्रमाला माजी उपजिल्हाधिकारी मनोहरराव कडू, जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे, निवेदिका क्षिप्रा मानकर, आरोग्य समन्वयक वैभव तेटु, माजी वनपरिक्षेत्र अधिकारी संजय जगताप, प्रा. अंबादास मोहिते, प्रा. रवींद्र दांडगे, प्रवीण वासनिक, तालुका उपनिबंधक राजेश भुयार, मयुराताई देशमुख, शोभा रोकडे यांच्यासह अनेक मान्यवर व मोठ्या संख्येने युवक, महिलाभगिनी, ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.