• Sun. Jun 11th, 2023

आजचा नवलेखक…

    एक नवलेखक म्हटलं म्हणजे एखाद्या विचारप्रधान लिखाण करणारा किंवा कथा कादंबरी, कविता, नाटके, पटकथा, इत्यादी प्रकारातील कल्पनाप्रधान साहित्यकृतीची निर्मिती करणारी व्यक्तिरेखा आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. समाजातील अस्वस्थ करणाऱ्या गोष्टी, आजूबाजूला जे घडत जाते त्याचे प्रतिबंब, अंतर्मनात जाणवणारी वेदना, ज्या प्रश्नांनी पोखरले त्याचा घेतलेला शोध—-हे सारे मांडण्याचा प्रयत्न म्हणजेच त्या लेखकाचे लेखन—-समाजातील उलथापालथीचे चित्रण, समाज व राजकारणातील बदल त्यातूनच लेखकाच्या लेखनाची प्रक्रिया घडत जाते. या अशा प्रभावी लेखनातूनच वाचकाच्या मनाची, बुद्धीची पकड घट्ट टिकवून ठेवली जाते. त्यामुळे अज्ञानाची किवाड उघडली जातात. मानसिक मनोबल शक्तिशाली होत जाते.सकारात्मक विचारांनी जीवनात सकारात्मकता येऊन जीवन परिवर्तन होते.म्हणूनच लेखक म्हणजे समाजाचा एक महत्वपूर्ण घटक आहे.

    आजपर्यंत बहुसंख्य नामवंत लेखक होऊन गेले आणि आजही आहेत.परंतु ते सुद्धा सुरवातीला नवलेखक म्हणून होते हे आपण विसरू शकत नाही. तरी त्यांच्याच लेखनशैलीच्या प्रभावी प्रेरणेतून एक नवलेखक निर्माण होत असतो. ज्याप्रमाणे एखाद्या अंकुराला एक छोटं रोपटं होण्यासाठी योग्य तो प्रकाश, हवा, पाणि याची गरज असते. जर या तीन गोष्टींचा अभाव पडला तर त्या रोपट्याची वाढ न होता ते रोपटं सुकून जाते. त्याचप्रमाणे नवलेखक जेव्हा आपल्या लेखणीला प्रेरित करतो तेव्हा त्याला प्रोत्साहनच्या खत-पाण्याची गरज असते. ते प्रोत्साहन त्या नवलेखकाला मिळाले तर त्याच्या लेखन निर्मितीचे रोपटे नक्कीच फोफावते. त्या नवलेखकाची वाचकाला ओळख होऊन नावकीर्ती बरोबर त्याच्या लेखन शैलीला गती मिळते. परंतु आजच्या नवलेखकाला त्याच्या गतीमध्ये अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे.

    आज साहित्य क्षेत्र म्हणजे नवलेखकांसाठी एक निव्वळ व्यवहार होत आहे. नवलेखक स्वतःच्या साहित्य प्रसिद्धीसाठी धडपड करत असतो. मग त्यावेळी त्याच्यावर अन्याय होत असेल किंवा आर्थिक तणाव येत असेल तरी त्याची धडपड हि चालूच असते. साहित्य प्रसिद्धीसाठी तीन मार्ग आहेत. एक आहे साहित्यिक स्पर्धा, पुस्तक प्रकाशन आणि त्याच बरोबर साहित्यिक पुरस्कार आणि ऑनलाईन मार्ग…

    आता पुस्तक प्रकाशन म्हटले म्हणजे शंभर पानांच्या वरती पानांचे लिखाण असावे लागते. त्या लिखाणासाठी लागलेला बुद्धीचा कस, वैचारिक कसरत , अनुभवांची पुंजी, शब्द शृंगाराचा खजिना म्हणजे एवढ्या साऱ्या मेहनतीतून निर्माण केलेली साहित्य निर्मिती प्रकाशकाला देऊन त्याला लागेल तेवढा खर्च देऊन स्वतःच्या साहित्याचे एक पुस्तक तयार होते.त्यावेळी प्रकाशकाने लावलेली छापील किमतीच्या भावाने लेखकाला लागतील तेवढ्या प्रति खरेदी कराव्या लागतात.म्हणजे वाचक ज्या छापील किमतीला पुस्तक खरेदी करतो त्याच किमतीला लेखक आपल्या स्वतःच्या साहित्याचे प्रकाशित पुस्तक खरेदी करतो. सुरवातीला काही टक्केवारी सूट दिली जाते. परंतु अधिक पुस्तक त्याला छापील किमतीच्या दरानेच खरेदी करावी लागतात. यामध्ये लेखकाला त्याच्या मेहनतीने निर्मित केलेल्या साहित्याची काय किंमत मिळाली—–? किती मानधन मिळाले—–?

    मान्य आहे कि प्रकाशकांचा प्रकाशन साठी केलेला खर्च आहे. त्या खर्चाचा तर तो मोबदला तर घेणारच हे साहजिकच आहे. प्रश्नच नाही.परंतु लेखक शिवाय प्रकाशक अधुरा आहे तर प्रकाशक शिवाय लेखक अधुरा आहे.हे दोघेही एकमेकाला पूरक आहेत. म्हणून लेखकाला सुद्धा त्याच्या मेहनतीचा मोबदला मिळायला हवा. साहित्य क्षेत्र म्हणजे लेखक व प्रकाशक यांचा मिलाफ आहे.त्या दोघांना बरोबरीने त्याचा मोबदला मानधन म्हणून मिळणं आवश्यक आहे.परंतु तो त्याला मिळत नाही.

    पुस्तकाच्या पन्नास प्रति जरी छापून घेतल्या तरी पाच ते सहा हजार खर्च येतो. त्यावेळी प्रकाशक हजार प्रति छापून अमेझॉन, किंडल वगैरे ठिकाणी विक्री साठी पाठवून देतो. ज्यावेळी त्या पूर्णपणे हजार प्रतिची विक्री होईल तेव्हाच लेखकाला पाच टक्केच्या कमिशनने पैसे मिळू शकतील. विक्री नाही झाली तर काहीच मिळत नाही. आजकाल मराठी पुस्तकांची विक्री होणं सुद्धा फार कठीण झाले आहे. कारण हल्ली शिक्षणाचा ओढा इंग्रजी माध्यमाकडे गेल्याने आजच्या मुलांचा कल इंग्रजी पुस्तक वाचण्यात आहे. म्हणजे वाचून वाचणारे मराठी मध्यमवाले. त्यामुळे वाचक संख्या कमी कमी होत चालली आहे.त्यातून टी. व्ही. मोबाईल असल्यामुळे लोकांची वाचनाची गोडी कमी झाली आहे. त्याकारणाने साहित्य क्षेत्राचा कारोबर म्हणजे इ-बुक, इ-मासिक असा चालू झाला आहे. अशामुळे जे वयस्कर म्हणजे जुन्या पिढीचे मराठी नवलेखक आजची ऑनलाईन प्रक्रिया समजण्यास सक्षम नसल्याने साहित्य निर्मितीत मागे पडत आहे.

    परिस्थिती नसताना सुद्धा हजारोच्या घरात पैसे खर्च करून एक पुस्तक छापले जाते.त्या पुस्तकाची प्रसिद्धी होण्यासाठी पुरस्कार साठी पाठवले जाते. त्यावेळी पुरस्कार वितरक दोन प्रति मागवून घेतात.कोण कोण तर तीन प्रति सुद्धा मागवतात.त्या प्रतीची किंमत २०० रुपये असल्यास ४००रू. ते ६०० रु.अधिक टपाल खर्च शंभर ते दीडशे रु. येतो. या दोन तीन प्रती मागवण्याचे प्रयोजन काय असावे—-? काही ठिकाणी तर प्रवेश फी म्हणून रु.५०० मागितले जातात.

    जर पुरस्कार लागला तर लेखकाला पुन्हा खर्च येतो तो वेगळाच. बहुतेक हे पुरस्कार अकोला, जयपूर , नांदेड, कोल्हापूर, सोलापूर, बीड, भुलेश्वर यासारख्या लांबच्या ठिकाणी असतात.म्हणजे गाडी-भाडं आले. राहण्यासाठी हॉटेल-खर्च आला.. म्हणजे पुस्तक प्रकाशनापासून पुरस्कार पर्यंत लेखकाला एका पुस्तकापाठी किती खर्च आला असेल—-? त्यातून जे जेष्ठ नागरिक आहेत ते एवढ्या लांब जाऊ शकत नाही. किंवा काही कारणाने एवढ्या लांब जाता आले नाही तर लागलेला पुरस्कार दुसऱ्याला दिला जातो. त्यावेळी दुसऱ्या कोणाच्या हातात हि तो पुरस्कार देत नाही. निदान जेष्ठ नागरिकांचा तरी देण्यात यावा.

    निदान आतातरी पुरस्कार मध्ये हजार,दोन हजार अशी कॅश देणं चालू केले आहे. आधी तर तेही नव्हते. हे विशेष आहे. परंतु आजचा हा एक पुस्तक प्रकाशनापाठी येणारा खर्च बघून वाटते कि लेखकाने आपले पुस्तक प्रकाशित करूच नये का—-? लागलेला पुरस्कार सोडून द्यावा का—-? साहित्य निर्मिती करून ती अडगळीत ठेवून द्यावी का…?

    मासिक स्वरूपात म्हटले तर लेखकाला स्वतःच्या साहित्याचे मानधन म्हणून २०० रुपये मासिक स्वरूपात दिले जाते. हे विशेष आहे. तसे म्हटले तर मासिक म्हटले म्हणजे नवलेखकाचा पहिला प्लॅटफॉर्म असतो.त्या प्लॅटफॉर्मच्या आधारे तो आपल्या साहित्य निर्मितीत आत्मविश्वास कमावून साहित्य क्षेत्रात उंच भरारी घेऊ शकतो.नवलेखकाची सुरवात हि मासिकातूनच होत असते. हळू हळू त्याचे साहित्य क्षेत्र विस्तारात जाते. कथा, कादंबरी, चरित्र लेखन,ललित लेख यासारखे लेखन करून तो एक नवलेखकाकडून श्रेष्ठ लेखक बनून जातो. परंतु त्याच्या एका साहित्यावर अनेक जण कमावणारे निर्भर असतात. तो लेखक मात्र नामानिराळे राहून जातो.

    अनेक ठिकाणी कथा स्पर्धा घेतल्या जातात. परंतु त्यात सुद्धा स्पर्धा मध्ये आपले साहित्य पाठवण्यासाठी प्रवेश फी घेतली जाते.शिवाय त्या कथा जमा करून त्याचा कथा संग्रह करून बनवला जातो.त्याच कथा संग्रहाचे पुढे काय होते..? तसेच ऑनलाईन काव्य स्पर्धा होतात.त्यासाठी शुल्क सुद्धा लावले जाते. कोणी कोणी लावतही नाही. परंतु हा प्रकार बघितला तर असे वाटते कि लेखकाच्या साहित्याचा कसा व्यवहार होत आहे. ज्येष्ठ नागरिक आपला वेळ जाण्यासाठी, मनाच्या प्रसन्नतेसाठी,आपला छंद जोपासण्यासाठी साहित्य निर्मिती करतात. आपले अनुभवाचे क्षण, मनातील वेदना, त्यांच्या नजरेतील सामाजिक उलथा पालथ आपल्या कविता,कथा द्वारा लिहून आपल्या साहित्याची निर्मिती करून वाचकांसमोर व्यक्त होऊ पाहतात. परंतु ऑनलाईन प्रकाशनाचे अज्ञान आणि ऑफलाईन प्रकाशनाचा खर्च या कैचीत सापडून त्या नवलेखकांनी काय करावे…?

    यामध्ये दोष कोणाटला द्यावा…? परिस्थिती…व्यवहार…कि विचारसरणी…? परंतु या साहित्य क्षेत्रात नवलेखकाची मात्र कुचंबणा होत आहे हे तितकेच खरे आहे.

    -शोभना कारंथ

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *