• Fri. Jun 9th, 2023

आंधळा आवेश टाळून विवेकपणा शिकविणारा श्री संदीप वाकोडे ह्यांचा गझल संग्रह -किनारा

    बऱ्याच दिवसापासून श्री संदीप वाकोडे मूर्तिजापूर ह्यांनी त्यांचा पहिला गझल संग्रह “किनारा” रसग्रहना साठी पाठविला होता पण वाचण्यासाठी विलंब झाला त्यासाठी माझा आजार व मुलीचे दुःखद निधन हे जरी कारणीभूत असले तरी मन स्थावर असल्याशिवाय वाचन होत नाही हेही तितकेच खरे विलंबासाठी वाकोडे सर क्षमस्व !

    शिक्षक असलेले श्री संदीप वाकोडे हे समाजात चौफेर वावरत असल्याने त्यांच्या अवती भवती जे जे समाजातील उणिवा, अंध श्रद्धा, मानापमान, नाते संबंध, जातीयता, आर्थिक विषमता, इत्यादी भावभावनांचे दृश्य त्यांना दिसत असल्याने आणि ते भावनिक कवि मनाचे असल्याने समाजातील हेच अलग अलग परीदृष्ये त्यांनी शब्दात गुंफून आपल्या समोर -किनारा -च्या रूपाने प्रस्तुत केलेले आहे कवि स्वतः अशा परीदृश्यातून गेलेला असल्याने त्यांच्या गझला परिपुर्ण झालेल्या आहेत म्हणूनच संपूर्ण गझल संग्रह वाचनीय ठरला आहे माणूस आपल्या देहाला लागलेला जरासा मळसुद्धा सहन करत नाही आपला देह मळू नये म्हणून माणूस किती काळजी घेतो तसेच आपल्या देहातील किंवा अंतःकरणातील दुर्गुणांचे डाग धुतले म्हणजेच मिटविले तर माणूस माणसाशी माणसा सारखा माणुसकीने वागत जाईल हे सांगताना श्री वाकोडे सर आपल्या शेरात सांगतात-

    किती तू काळजी घेतो जराही देह मळला तर
    तुझ्या आतील दोषांचे धुवावे डाग यंदा तू

    कोणी किती ढोंग केले, कितीही पाखंड केले किंवा कितीही देखावा केला तरी जोवर आतील मन शांत नसते , कशाचा राग लोभ नसतो, सर्व इच्छा मेलेल्या असतात, तेंव्हाच माणसाला संतत्व प्राप्त होते, लोकात, जनमाणसात त्याला सन्मान मिळतो, तो काटेरी बनातिल फुललेला गुलाब दिसतो आणि हेच श्री संदीप सर आपल्या शेरात सांगतात, बघा-

    ढोंग वरवरचेच केल्याने कुठे संतत्व येते
    संत तो असतो खरा आतूनही जो शांत आहे

    हाडाचे शिक्षक असलेले श्री संदीप सर शिक्षकी पेशाला जागून समाजभान ठेवून समाजाला प्रबोधनात्मक शिकवण शिकविताना पर्यावरणाबद्धल माणसाला उपदेश वजा सूचना करतांना सांगतात की माणसाने आपल्या मतलबासाठी जंगले तोडलीत, त्यामुळे पर्यावरणाचा समतोल ठेवण्यासाठी वृक्षारोपण करणे जरुरी आहे पहा किती छान शेर जुळून आला आहे.

    तोडली राने वने तू मतलबासाठी किती
    झाड एखादे तरी ते लाव पहिल्या सारखे

    एखादा माणूस गझलेचा किती दिवाना असतो, गझलेवर त्याचे किती प्रेम असते त्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे श्री संदीप वाकोडे होय, गझलेच्या पालखीचे भोई का असेनात, बनून गझलेची सेवा ते गझलदीप प्रतिष्ठान मार्फत करीत आहेत, गझलेसाठीच अजून जिवंत असल्याचे ते ठासून सांगतात-

    नको विचारू गड्या मला अर्थ गझल चा तू
    तिच्याच साठी उरात ठोका जिवंत आहे

    माणूस जिवंत असताना तो कितीही चांगल्या वर्तणुकीचा असला तरी त्याचे गुणगान अथवा त्याची स्तुती कोणी करत नाही उलटे त्याच्यातील दोष काढून त्याची निंदाच करतात अशी ह्या दुनियेची तऱ्हा आहे पण तोच माणूस मृत्यू पावल्यावर तो किती चांगला होता हे सांगताना जे लोक त्याची निंदा करायचे तेच अहमकीने त्याची स्तुती करतांना दिसतात हे जीवनातील वास्तव श्री संदीप सर छान चितारतात-

    जसा मी स्मशानी जळू लागलो
    तसा या जगाला कळू लागलो

    आंबेडकरी विचारांचा जो जो पाईक असतो तो तो अन्याय सहन न करता अन्यायाविरुद्ध विद्रोह करीत असतो श्री संदीप वाकोडे हे पण आंबेडकरी बाण्याचे असल्याने ते डॉ आंबेडकरांचे निष्ठावान पाईक असल्याचे त्यांनी वेळोवेळी दाखवून दिलेले आहे डॉ आंबेडकर ह्यांच्यामुळेच मिळालेला मान सन्मान कसे विसरणार आणि तो मिळविण्यासाठी डॉ आंबेडकरांचे विचारच अवसान, हिम्मत देतात असे श्री संदीप वाकोडे निक्षून सांगतात, बघा-

    अन्याय निपटताना विद्रोह मांडतांना
    झुंजावयास देतो अवसान भीमराया

    आंबेडकरी चळवळीची आजची शोकांतिका चित्रित करतांना श्री संदीप सर सांगतात की आम्हाला आमचे भविष्य अंधकारमय दिसते आहे तरीही आम्हाला आपापसातील दोषच दिसतात तरीही आम्ही निगरगट्ट मनाने त्यातच आनंद मानत आहोत त्यांचा हा शेर आंबेडकरी विचाराला मानणाऱ्या कोणालाही अंतर्मुख केल्याशिवाय राहणार नाही.

    जाहलो बकरे बळीचे याच आनंदात आम्ही
    आमचा आम्हा कसाई निवडण्याची सूट आहे

    माता रमाईचे बाबासाहेबांच्या जीवनात अनन्य साधारण महत्व आहे कारण ती बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी आणि ऐकूनच तिच्या नऊ कोटी लेकरासाठी झिजली खंगली आणि शेवटी संपली पण चळवळीसाठी व बाबासाहेबांसाठी माता रमाईचा त्याग , कळकळ दिसून येते, बाबासाहेबांना कवीने वादळ संबोधिले आहे आणि ते खरेही आहे ह्या वादळासोबत त्या माउलीने संसार केलेला ह्याबद्धल श्री संदीप वाकोडे सांगतात-

    लेवून वादळाचा शृंगार तू रमाई
    केलास वादळाचा संसार तू रमाई

    जो प्रवाहाच्या विरुद्ध पोहतो त्याला गरजेपेक्षा जास्त ऊर्जा खर्च करावी लागते जो जगाच्या प्रचिलीत रीती भाती विरुद्ध बोलतो वागतो त्यालाही समाजाच्या विरुद्ध संबोधिले जाते त्याला बंडखोर विद्रोही समजून वाळीत टाकल्या जाते परंतु तोच जेंव्हा सारा अन्याय सहन करून मख्ख स्वभावाचा होऊन अबोल होतो तेंव्हा मात्र तोच पूज्यनीय ठरतो हेच कवी ह्या लहान बहरातील शेरात सांगतो, बघा-

    जाहलो पुज्यनीय जेंव्हा
    दगड जेव्हा स्वभाव केला

    श्री वाकोडे सर आंबेडकरी विचारांचे प्रगल्भ ठेवण असलेले कवि आहेत त्यामुळेच त्यांच्या लिखाणात विद्रोह दिसून येतो अन्याय तरी का सोसावा हे डॉ बाबसाहेबांनीच सांगितलेले आहे त्यामुळेच वर्ण व्यवस्थेने येथील शोषित वंचितांना दिलेल्या यातना ते आपल्या गझलेत मांडतात आणि हे मी शौकात लिहीत नसून मनातील कोंडमारा मांडतो आहे असे मार्मिक लिहिताना त्यांचा हा शेर बघा-

    बातमी येईल नक्की एकदा, ही
    शब्द माझे मी कुठे शौकात लिहतो

    डॉ बाबासाहेबांनी महत प्रयासाने,कष्टाने,तब्बेत साथ देत नव्हती तरी ह्या देशाला संविधान लिहून दिले ,त्यांच्या अपार कष्टा मुळेच येथील समस्त शोषित वंचित दीन,गरीब, सर्वहारा समाजाला न्याय समता बंधुता या मानवी मूल्यांची दौलत ,सर्वांच्या प्रगतीचे हक्क प्रदान केलेले संविधान संपूर्ण जगात निर्दोष आणि अलौकिक असे संविधान मिळाले, देशाच्या संविधानावर खूप छान भाष्य कवि श्री वाकोडे ह्यांनी केलेले आहे, बघा-

    स्वातंत्र्य समता बंधुतेचा उदघोष संविधान आमचे
    एकमेव ते दुनियेत साऱ्या निर्दोष संविधान आमचे

    श्री संदीप वाकोडे सामाजिक भान असलेले व्यक्तिमत्व असल्याने समाजात होत असलेल्या घडामोडीवर त्यांची पारखी नजर असते,त्यातूनच त्यांना वर्तमानातील समाज मनाचे नको ते दिखावे दिसत असतात आणि जे जे दिसले ते ते निर्भीडपणे ते आपल्या गझलेत मांडतात आता हेच पहा ना, हा शेर त्यांनी फार अगोदर जरी लिहिला असला तरी त्याचा मतितार्थ आजच्या वर्तमानाला तंतोतंत लागू पडतो, धर्म प्रत्येकाला आपल्या स्वातंत्र्या प्रमाणे जरी जगता येत असले तरी चार चौघात धर्माचे प्रदर्शन जर केले तर काय होते त्याला अनुसरूनच कवि आपल्या शेरात लिहितो-

    तो उगा आणला आज चौकात तू
    धर्म आपापला जो घरी पाहिजे

    बुद्ध धम्मा मध्ये दान परिमेतेला अनन्य महत्व दिले गेले आहे, दान करणारा दानशूर म्हटल्या जातो आणि श्री संदीप सर दानाचे महत्व जाणणारे असल्याने एक अफलातून शेर त्यांनी लिहिला आहे, रात्रीला चांदण्याची गरज असावी म्हणून ते रात्रीलाच चांदणे दान करतात , काय मस्त कल्पना कविने मांडली आहे बघा-

    थांबते दारात माझ्या रात्र जेंव्हा
    चांदणे माझे तिला मी दान करतो

    अंहकुश सत्ता मिळाली की भले भले अहंकारी,घमेंडी, अभिमानी ,उद्धाम होतात आणि आपल्याच मस्तीत जगतात, त्यांना गोर गरिबांची, वंचितांची मुळीच पर्वा नसते, अशा बेमुरतखोर सत्ताधिशाना श्री वाकोडे सरांनी “सत्ते” ह्या गझलेतून अशा नाथाळाना शब्दांची चांगली चपराक मारली आहे, ते लिहितात-

    गुर्मीत कोणत्याही वागू नकोस सत्ते
    कमजोर तू बळीला समजू नकोस सत्त
    मस्तीत बहुमताच्या निर्णय तुझे अघोरी
    जनतेवरी कधीही लादू नकोस सत्ते
    उद्धाम हिटलरांची झाली अखेर दैना
    जाणीव ठेव याची विसरू नकोस सत्ते

    गरिबांना दु:खा शिवाय काही मिळत नाही,सुखाची स्वप्ने पाहत संपुर्ण जीवन व्यतीत होते तरीही सुख त्यांना मिळत नाही, म्हणून रोजच्या दुःखातच ते आपले समाधान मानत असतात हा भावगर्भि आशय श्री संदीप सरांनी खूप छान ह्या शेरात मांडलाय, बघा-

    जरी रिक्त हंगाम गेला सुखाचा
    व्यथेलाच ते पाखडू लागलेले

    कोणत्याही माणसाला कितीही खुशी मिळाली, सारी सुखे जरी त्याला मिळालीत,तरी त्याच्या इच्छा कधीच पूर्ण होत नाहीत कारण तो मनाने समाधानी नसतो, हावरटपणा मुळे तो पुन्हा पुन्हा सुखाच्या मागे धावतो,तर काही लोक जे मिळाले त्यातच समाधान मानून सुखी राहण्याचा प्रयत्न करतात श्री संदीप सरांनी हेच त्यांच्या ह्या शेरात सांगितले आहे -पहा

    काल चटणी भाकरी वर खुश होतो
    दुःख पुरणाच्या पोळीत आता

    आजच्या कली युगात लावालावी करणारे खूप मिळतील , त्यांच्या लावालावी मुळे दुसऱ्या चे होणारे नुकसान भयंकर असते पण असे लोक त्याची पर्वा करीत नाहीत ते आपल्या बोलण्याने, वागण्याने दुसऱ्यांना त्रासच देत असतात हेच नेमके वाकोडे सरांनी कमी शब्दात ह्या शेरात मांडलेले आहे -बघा

    विस्तावास ही नसेल कल्पना
    शब्द लावतात जाळ केवढा

    आज जगात हिंसक वातावरण झालेले आहे .कुठे आतंकवादी, कुठे नक्षलवादी तर कुठे प्रत्यक्ष युद्ध करून माणसांच्या कत्तली सुरू आहेत, मानवाच्या जीवनाला काहीच किंमत राहिली नाही,अशा हिंसक वातावरणात तथागत बुद्धाची अहिंसावादी शिकवणच पाहिजे असे श्री संदीप वाकोडे सांगतात,हे खरे आहे कारण माणसाच्या मनातील इच्छा मेली तर त्याच्या मनातील मोह, माया, लालच अशा भावनांचा अंत होतो आणि शिक्षण घेतल्यावर मनात उजेड पडतो, ह्यासाठी बुद्धाची अहिंसावादी, सदाचारी शिकवणच कामी पडते हेच त्यांनी त्यांच्या गझलेत मांडलंय, बघा-

    वैरभाव मारण्या बुद्ध पाहिजे
    या जगास तारण्या बुद्ध पाहिज
    अंत ना कधीच तृष्णेस आमच्या
    मोह दूर सारण्या बुद्ध पाहिजे
    भेटतो उजेड अज्ञान सोडता
    ज्ञान अंगिकरण्या बुद्ध पाहिजे

    “किनारा” हा श्री संदीप वाकोडे ह्यांचा ९४ गझलांचा प्रस्तावना विरहीत गझल संग्रह , समग्र प्रकाशन, तुळजापूर जि उस्मनाबाद तर्फे श्री दास पाटील ह्यांनी प्रकाशित केलेला ,तर संसारात ज्यांची साथ मिळते अशा आपल्या कुटुंबाला अर्पण केलेला हा किनारा गझल संग्रह आहे , ह्या गझल संग्रहाचे मुखपृष्ठ श्री विष्णू थोरे ह्यांनी फारच कल्पकतेने व सुबकतेने रेखाटलेले असल्याने संग्रह देखणा झाला आहे हा गझल संग्रह त्यातील आशय गर्भ गझला मुळे वाचनीय झालेला आहे ,प्रत्येक वाचक, रसिक ह्यांच्या संग्रही असावा असा हा गझल संग्रह श्री संदिप वाकोडे ह्यांनी आपल्या हाती दिल्या बद्धल त्यांचे मी अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील गझल लिखाना साठी अनंत शुभेच्छा देऊन थांबतो-

    -रमेश निनाजी सरकाटे
    भुसावळ
    फोन नंबर 9968330465, 8356859422

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *