• Sun. Jun 11th, 2023

अवैध विक्रीविरुद्ध कारवायांबरोबरच प्रभावी जनजागृती करा – जि. प. सीईओ अविश्यांत पंडा

    * जिल्ह्यात 40 टक्के पुरूष, 9 टक्के स्त्रिया तंबाखूजन्य पदार्थ खातात; सर्वेक्षणातील माहिती
    * मौखिक कर्करोगाचे तंबाखू हेच मुख्य कारण; तंबाखू नियंत्रण समितीच्या बैठकीत चिंता व्यक्त
    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : अमरावती जिल्ह्यातील 40.8 टक्के पुरूष व 9 टक्के स्त्रिया तंबाखूजन्य पदार्थ चघळतात, अशी माहिती राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातून समोर आली आहे. हे अत्यंत चिंताजनक आहे. तंबाखूजन्य पदार्थांची अवैध विक्री करणा-यांविरूद्ध कठोर कारवाया करतानाच विविध माध्यमांद्वारे प्रभावी जनजागृती करावी, असे निर्देश जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज येथे दिले.

    राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हा समितीच्या बैठकीत ते बोलत होते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद निरवणे, अतिरिक्त डीएचओ डॉ. रेवती साबळे, सहायक पोलीस आयुक्त प्रशांत राजे, पोलीस उपअधिक्षक दिलीप सूर्यवंशी, डॉ. मुकुंद गुर्जर, उद्धव जुकरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

    जगातील मौखिक कर्करुग्णांपैकी 50 टक्क्यांहून अधिक रुग्ण एकट्या भारतात आढळतात. मौखिक कर्करोगाचे मुख्य कारण तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थ चघळणे हेच आहे. जागतिक युवा तंबाखू सर्वेक्षणानुसार (जीवायटीएस) भारतात दररोज साडेपाच हजार व महाराष्ट्रात रोज 530 मुले तंबाखूच्या व्यसनात गुंतत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने (हू) याला ‘जागतिक आपदा’ म्हणून घोषित केले आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार (एनएफएचएस) अमरावती जिल्ह्यातील 40.8 टक्के पुरूष व 9 टक्के स्त्रिया तंबाखूजन्य पदार्थ चघळतात.

    ही आकडेवारी चिंताजनक आहे. तंबाखू नियंत्रणासाठी जिल्ह्यात राबविण्यात येणा-या कार्यक्रमाची परिणामकारकता तपासावी व अंमलबजावणी प्रभावी होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. नागरिकांमध्ये विशेषत: युवक, विद्यार्थ्यांपर्यंत व्यसनाधीनतेच्या दुष्परिणामांबाबत माहिती संवाद, व्हिडीओ, सोशल मिडिया, पत्रके आदी विविध माध्यमांतून पोहोचवावी. जनजागृती कार्यक्रमांत सातत्य असावे. जिल्ह्यात 86 शाळा तंबाखूमुक्त घोषित करण्यात आल्या आहेत. याबाबतच्या निकषांचे अद्यापही पालन होते किंवा कसे, याची वेळोवेळी तपासणी करणे आवश्यक आहे, असे निर्देश श्री. पंडा यांनी दिले.

    जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये व शासकीय कार्यालयांत तंबाखूविरोधी जनजागृती करावी. तंबाखू नियंत्रण कायद्याचे उल्लंघन करणारांवर कारवाई करावी. सर्व कार्यालये तंबाखूमुक्त करण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही निर्देश त्यांनी दिले.

    अन्न व औषध प्रशासनातर्फे एप्रिल 2021 ते मे 2022 या काळात 28 प्रकरणी कारवाई करून 92 लक्ष 71 हजार 368 रू. रकमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दंडात्मक कारवायांत 79 हजार 280 रू. रक्कम प्राप्त झाली, अशी माहिती डॉ. गुर्जर यांनी दिली. तंबाखूमुक्तीसाठी गतवर्षी 9 हजार 133 व्यक्तींना मार्गदर्शन करण्यात आले. त्याचप्रमाणे, 14 कार्यशाळा व 58 गटचर्चा घेण्यात आल्या, असे श्री. जुकरे यांनी सांगितले. डेंग्यू व मलेरिया नियंत्रणाबाबतही आढावा यावेळी घेण्यात आला.

    (Images Credit : Lokmat)

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *