अमरावती (प्रतिनिधी) : जिल्हा प्रशासन व विविध विभागांच्या कार्यालयासाठी अमरावती येथे स्वतंत्र व सुसज्ज इमारत उभी राहणार आहे. कार्यालयांनी केलेल्या मागणीनुसार व त्यांच्या गरजेनुसार जागा उपलब्ध करून द्यावी. इमारतीच्या सुव्यवस्थित रचनेसाठी काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज येथे दिले.
नियोजित इमारतीच्या अनुषंगाने बैठक जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली महसूलभवनात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. उपजिल्हाधिकारी रणजीत भोसले, मनीषकुमार गायकवाड, समृद्धी महामार्गाचे उपजिल्हाधिकारी विवेक घोडके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस. पी. थोटांगे व विविध विभागप्रमुख आदी यावेळी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्रीमती कौर म्हणाल्या की, कार्यालयांच्या गरजेनुसार जागा उपलब्ध व्हावी. प्रत्येक कार्यालयाला रेकॉर्डरूमसाठीही पुरेशी जागा मिळणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, आवश्यक कॉन्फरन्सरुम, स्वच्छतागृहे, अभ्यागत कक्ष, उपाहारगृह, आदींबाबत योग्य नियोजन व्हावे. त्यासाठी सर्व कार्यालयप्रमुखांशी सविस्तर चर्चा करून आराखड्यात आवश्यक ते बदल व्हावेत, असे निर्देश त्यांनी दिले.
नियोजित इमारतीत जिल्हा प्रशासनाबरोबरच पशुसंवर्धन कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय, गुप्तवार्ता विभाग, रेशीम कार्यालय, मत्स्यव्यवसाय कार्यालय आदी कार्यालयांचा समावेश असेल. नियोजित इमारतीच्या कामासाठी सुमारे ६० कोटींची प्रशासकीय मान्यता आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मॅन्युअलनुसार अधिकारी व कर्मचारी कक्षाच्या जागा निश्चित केल्या जातील. नियोजित इमारतीचा परिसर प्रशस्त असेल. अंतर्गत भागात आवश्यक रस्ते, मोकळ्या जागा आदी सुटसुटीत रचना असेल. विविध कार्यालये एकाच छताखाली येणार असल्यामुळे नागरिकांसाठी एक चांगली सुविधा निर्माण होणार आहे, अशी माहिती श्री. थोटांगे यांनी दिली.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या