Header Ads Widget

आखोजीचा कानोला...

    आमावसेच्या दिवशी
    लयच घोटाया झाला
    एक म्हतारा माह्या
    रात्री सपनात आला !!
    मोठ झाकुयल होत
    जरा दिसे झावझाव
    माह्या घरावर राज्या
    हळया करे कावकाव !!
    त्यात दिसे बाप मले
    अन कई दिसे हळया
    सुचेना मले काहीच
    बसत दांतखिळया !!
    हिम्मत करुन पक्की
    गेलो गा मी गच्चिवर
    माहेच म्हतार बाबा
    झोपेल होते खाटीवर !!
    गेलो मंग हळयाजोळ
    हातात घेऊन कट्टा
    सांग म्हतल कावळ्या
    काय हा जांगळबुत्ता ?
    आसु भरल्या डोयानं
    मले देल्ल त्यान उत्तर
    आहो म्हणे गड्या मीच
    तुह्या पित्राचा पित्तर !!
    जितेपनी रे बापानं
    तुह्या देला रे झकोला
    म्हणून आलो रे खाया
    अखोजिचा रे कानोला !!
    कोरोनात मेलो होतो
    श्राद्ध केलं रे काशीले
    धन धान्य दान केल
    अकरा बामन भटाले !!
    अर्पण केल तर्पण केल
    स्वर्गी पोहचवु पितराले
    कर्ज काळून तेरवी केली
    स्वर्ग,मोक्षासाठी पितराले !!
    नाही आला रे बामण कोणी
    नाही भळजी आला भेटाले
    स्वर्ग, नरक थोतांड सारे
    आलो सर्वांस मी सांगायले !!
    सतपात्री दान करा रे
    सदा रंजल्या गांजल्याले
    घासातला घास खाऊ घाला
    जित्तेपनीच मायबापाले !!
    रोज वाटा जेवताना
    ताटातील तीन घास
    पहिला घास भरवावा
    देवरूपी मायबापास !!
    दुजा घास ध्यावा भुकेल्
    या मानव,प्राणी किटकास
    तिसरा घास तो नभिच्या
    बिना झोळीच्या फकिरास!!
    वासुदेव विनवी सर्वा
    कानोल्याचाअनव्यार्थ
    सार्थ करून संसार
    साधावा रे परमार्थ !!
    -वासुदेव महादेवराव खोपडे
    सहा पोलीस उप निरीक्षक (सेनी)
    अकोला
    9923488556

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या