Header Ads Widget

सोशल मिडिया वर व्यक्त होताना जरा जपूनच.!

  सोशल मीडिया ही आजच्या आधुनिक जगातील सगळ्यांना परिचित असलेली कालानुरूप संकल्पना. आज लहानथोरांपासून प्रत्येकाच्या जीवनाचा सोशल मीडिया हा अपरिहार्य भाग आहे. फेसबुक, ट्विटर वा इन्स्टाग्रामने आज प्रत्येकाचे दैनंदिन आयुष्यच बदलून टाकले आहे. जगाच्या दुसऱ्या टोकाला असणाऱ्या लोकांचा संदेश आपल्याला आणि आपल्याकडून त्यांना क्षणात पोचू शकतो.त्यामुळेच या दुधारी शस्त्राचा वापर करताना जरा जपूनच करा अशी म्हणायची वेळ पुन्हा एकदा आली आहे.

  सध्याच्या काळात प्रत्येकजण स्मार्ट व हुशारीपणा दाखवण्यासाठी सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसतात. त्यात इकडे-तिकडचे मेसेज फॉरवर्ड करण्यात अनेकांचा हातखंडा आहे. त्यात धार्मिक, राजकीय, जातिय, देशविरोधी विषयांवर तर सेकंदात हे वापरकर्ते व्यक्त होतात. मात्र या मीडियाचा वापर दक्षता बाळगुन न केल्यास, व कोणत्याही पोस्टला लाईक, शेअर आणि फॉरवर्ड केल्यास चांगलेच अंगलट येऊन 'करिअर खराब' होऊ शकते व 'जेल ची हवा' लागण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सोशल मिडियाचा वापर जरा जपूनच.

  सध्या राज्यात विविध जातीय, धार्मिक, हिंदू-मुस्लिम, आरक्षणांच्या मुद्यांवर भडकाऊ भाषणे करून युवकांची माथी भडकवण्यासठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी विशेष आयटीच्या छुप्या सायबर टिम कार्यरत असुन, त्यांच्याकडुन विविध जातीधर्माच्या विरोधात बदनामीकारक मेसेसे तयार करणे तसेच नेते मंडळींच्या विरोधात आक्रमक पवित्रा निर्माण होईल असे मेसेज बनवून व्हायरल केले जातात. त्यावर कोणताही विचार न करता व मेसेजची खात्री न करता त्यावर तातडीने प्रतिक्रिया देत ते शेअर करत आपण सर्वांपेक्षा किती अपडेट व हुशार आहोत हा दाखविण्याचा केविलपणा युवकांकडून केला जातो. परंतु या मीडियावर काही समाजभान नसलेले आणि विघ्नसंतोषी लोकांचाही मोठा भरणा असल्याने, ही मंडळी जहाल, तीव्र, भडक, जातीय तेढ निर्माण करणाऱ्या शांतता भंग करणाऱ्या, वात्रट पोस्टच शेअर करण्यावर अधिक भर देतात. यातील एकही पोस्ट तुमच्याकडून चुकून नकळत अनावधानाने असो की भावनेच्या भरात शेअर केली जाते अन् त्यामुळे समाजात जातीय तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता असते.

  सध्या सोशल मीडियाच्या या जगात पोस्ट, लाइक्सची चढाओढ आहे. त्या नादात चुकीची माहिती शेअर होणे असे प्रकार होतात. आपल्याला व्यक्तिस्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे; परंतु येथे व्यक्त होताना त्याच्या परिणामांचा विचार केला जात नाही. त्यातून अफवा पसरतात, गैरसमज होतात. सोशल मीडियाचा वापर विधायक कामांसाठी केला, तर तो नक्कीच चांगला आहे; मात्र त्यातून अनेकदा विध्वंसक कृत्येही केली जातात. त्यामुळे सोशल मिडियावर आलेल्या पोस्टची खात्री करूनच ते लाइक्स कमेंट्स व फॉरवर्ड करावे अन्यथा, अतिघाई संकटात नेई म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.माहिती फॉरवर्ड करताना घ्या काळजीएखाद्या कुणाची बदनामीकारक, धार्मिक भावना दुखावणारा, कायदा सुव्यवस्था धोक्यात आणणारा मेसेज जर तुम्हाला आला असेल आणि तोच मेसेच तुम्ही इतरांना पाठवल्यास तो सायबर क्राइमनुसार गुन्हा आहे. त्यामुळे पाठवणारा आणि तो मेसेज आणखी इतरांना पाठवणारासुद्धा दोषी असल्यामुळे त्याच्याविरुद्ध सुद्धा गुन्हा दाखल होऊ शकतो.पोस्ट करताना घ्या काळजी- सोशल मीडिया च्या माध्यमातून अनेक गुन्हे घडत आहेत. त्यामुळे व्हॉट्सअप, ट्विटर व फेसबुकवर संवेदनशील माहिती टाकल्यास अथवा ती शेअर केल्यास संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल होऊ शकतो.सोशल मीडियावरील कोणत्याही प्रकारचे धार्मिक भावना दुखावतील, तसेच वादग्रस्त पोस्ट वापरकर्त्यांनी करू नये. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता, आपण अथवा जवळचे कोणीही त्यात सहभागी होऊ नये याची खबरदारी घ्यावी. सोशल मीडियाचा वापर योग्य ती दक्षता बाळगुनच करावा. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे मेसेज फॉरवर्ड करू नये. वादग्रस्त पोस्टकडे पोलिसांचे लक्ष असुन, अशा घटना निदर्शनास येताच कायदेशीर कारवाई होत असते.

  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या चितळे व एका युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या तरुणीने शरद पवार यांच्या वर आक्षेपार्ह पोस्ट केली तर त्या तरुणाने शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. या तरुणाच्या मोबाईलमध्ये आणखी काही आक्षेपार्ह मजकूर आढळून आला आहे.ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केल्या प्रकरणी दूरचित्रवाहिनीवरील मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री केतकी चितळे हिच्या विरुद्ध देखील सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

  एकंदरीत, सोशल मीडिया जितका फायद्याचा तितकाच तोट्याचादेखील आहे हे वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये सिद्ध झालेले आहे, त्यामुळे त्याचा वापर करताना जपूनच केला पाहिजे.बोलण्याचा आणि व्यक्त होण्याचा अधिकार प्रत्येकाला मूलभूत अधिकार असला तरी त्याच्या मर्यादा पाळणे गरजेचे आहे. सोशल मीडिया हा अभिव्यक्तीचे व्यासपीठ आहे. या ठिकाणी कुणाबाबतही लिहिताना, बोलताना कुणाचीही अब्रुनुकसानी होणार नाही, याची काळजी घेण्यात यायला हवी. जर ही पाळण्यात आली नाही, तर दोन गटांत वाद निर्माण करण्याच्या प्रयत्नांत शिक्षा होण्याची शक्यता असते.

  -प्रा. डॉ. सुधीर अग्रवाल
  ९५६१५९४३०६

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या