हेरवाड चा ठराव …एक आदर्श

    4 मे 2022 रोजी ग्रामपंचायत हेरवाड येथे ग्रामसभेमध्ये एक क्रांतिकारी निर्णय घेण्यात आला. महत्त्वाचं म्हणजे हेरवाड च्या ठरावा मध्ये सूचक,अनुमोदक दोन्ही महिला आहेत याचा मनापासून अभिमान वाटतो. आणि प्रसारमाध्यमांनी तो सुंदर निर्णय आजूबाजूच्या प्रत्येक गावात पोहोचवला. तो अतिशय सुंदर,उल्लेखनीय आणि वैशिष्ट्यपूर्ण निर्णय असा होता की, “गावातील विधवा प्रथा बंद करणे”

    Thank you for reading this post, don't forget to subscribe!

    खरोखरच आपल्या देशाला समाज सुधारकांचा एक इतिहास आहे. सतीची चाल बंद करणे, विधवेचा पुनर्विवाह करणे, केशवापण करणे, इत्यादी यासारख्या अनिष्ट प्रथा बंद करण्यासाठी अनेक समाजसुधारक,संत-महात्मे यांनी खूप प्रयत्न केले.यासाठी त्यांना समाजकंटकांकडून अतोनात त्रास देखील झाला. परंतु हळूहळू का होईना समाजाने या सुधारणा मान्य केल्या. हेरवाडच्या ठरावामुळे हा विषय बऱ्याच ठिकाणी चर्चिला जाऊ लागला.

    खरे पाहिले तर विधवा होणे कोणाच्या हाती नसतं. किंवा विधवा होणे हा त्या स्त्रीचा गुन्हा नव्हे. तरीही विधवा झाल्यानंतरचा तिच्याबरोबर होणारा जो व्यवहार आहे त्यामुळे ती स्त्री मनातून खूप खचून जाते. पतीच्या निधनानंतर कपाळावरचं कुंकू पुसणे, बांगड्या फोडणे, मंगळसूत्र तोडणे,इ. एकूणच तिचे सर्व सौभाग्य अलंकार काढले जातात. पतीच्या निधनानंतरच्या त्या क्षणापासून तिला समाजामध्ये कोणत्याही धार्मिक कार्यात पुढे येता येत नाही. आजही जाणून-बुजून तिला सण समारंभामध्ये डावललं जातं. तसं पाहिलं तर पती-पत्नी एकमेकाचे खरे आधारस्तंभ असतात. आपला आधार गमावल्यामुळे एक तर स्त्री मनातून खूप खचलेली असते.स्वतःला निराधार समजू लागते. त्यातूनच या जाचक प्रथांमुळे ती आणखीनच सर्वांपासून स्वतःला अलिप्त समजू लागते.

    खरंतर बदलत्या काळानुसार अशा अनिष्ट प्रथा बंद व्हायलाच हव्यात. आज कित्येक स्त्रिया शिकून स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. नोकरीच्या निमित्ताने दररोजच त्यांचा प्रवास घडतो आहे. घराबाहेर पडलेल्या स्त्रीच्या कपाळावर टिकली नाही किंवा गळ्यात मंगळसूत्र नाही हे पाहताच समाजाच्या वखवखलेल्या नजरांचा पावलोपावली तिला त्रास होतो. परिणामी आज बऱ्याच विधवा स्त्रिया कपाळाला टिकली व गळ्यामध्ये घंटण घालून समाजात वावरताना दिसतात. हा देखील बदल स्त्रियांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे आणि तितकाच गरजेचा देखील आहे.

    संत वेणाबाई ,संत महदंबा, संत मिराबाई या संत स्त्रिया खूप लहान वयात विधवा झाल्या. आणि अनेक अनिष्ट प्रथांना ,कर्मकांडांना त्याकाळात त्यांनी कडाडून विरोध केल्याचे त्यांच्या साहित्यातून स्पष्ट होतं. वयाच्या अठरा वीस वर्षांमध्ये या स्त्रिया संत म्हणून नावारूपाला आल्या ही काही साधी बाब नाही. वेणाबाईसारखी विधवा स्त्री पहिली स्त्री कीर्तनकार होऊन महिलांचे उद्बोधन करते ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. मग आपण तर सुशिक्षित, प्रत्येक क्षेत्रात हिरीरीने पुढे जाणाऱ्या, अवकाश झेप घेणाऱ्या आधुनिक महिला आहोत.

    स्त्रियांनीच स्त्रियांना अनिष्ट प्रथा ,कर्मकांडात गुंतवलं आहे. म्हणूनच शिकलेल्या, सुशिक्षित,वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विचार करणाऱ्या,प्रत्येक स्त्रीने स्वतः एक पाऊल पुढे टाकून आवश्यक तो बदल स्विकारला पाहिजे. मी नेहमी सांगते, कार्यक्रम हळदी कुंकाचा असुदे किंवा कोणत्याही सण समारंभाचा असू दे विधवा स्त्रियांना देखील सहभागी करून घ्यावं. कारण विधवा होणं हा काही तिचा अपराध किंवा गुन्हा नव्हे.

    मान्य आहे,आपली संस्कृती खूप आदर्श आहे, अप्रतिम आहे, परदेशीयांना देखील आपल्या संस्कृतीची भुरळ पडते,एवढे सुंदर आचार ,विचार आणि नातेसंबंध आपल्या संस्कृतीने जपलेले आहेत. परंतु याचा अर्थ असा नव्हे की पिढ्यानपिढ्या चालत आलेली एखादी चुकीची गोष्ट देखील आपण स्वीकारावी. उलट योग्य अयोग्य याचा सदसद्विवेक बुद्धीने विचार करून काळानुरूप बदल व्हायलाच हवा.

    मोठमोठ्या शहरांमध्ये विधवा विचार फारसा होत नसेल ही मात्र ग्रामीण भागांमध्ये व निमशहरी भागांमध्ये महिलांना विधवा विचाराचा खूप त्रास होतो. म्हणूनच क्रांतिकारी निर्णय घेणाऱ्या हेरवाड गावचा आजूबाजूच्या ग्रामीण भागाने खरोखरच आदर्श घ्यायला हवा. या निर्णयामध्ये सूचक सौ मुक्ताबाई पुजारी,अनुमोदन सौ सुजाता गुरव, माननीय ग्रामविकास अधिकारी आणि गावचे सर्वेसर्वा माननीय सरपंच साहेब तसेच निर्णयाचे स्वागत करणारे सर्व ग्रामस्थ यांचे मी मानापासून अभिनंदन करते.

– सौ आरती अनिल लाटणे
इचलकरंजी
मोबाईल नंबर 9970264453