• Wed. Jun 7th, 2023

पवार साहेब, उर्वरीत आयुष्य समाजकारणाला द्या.. !

    राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व देशाचे ज्येष्ठ नेते मा.शरद पवार यांच्याबद्दल मागील काही दिवसात सोशल मीडियातून अत्यंत गलिच्छ आणि विकृत पातळीवर टिका सुरु आहे.शरद पवार यांच्यासोबत कोणाचेही राजकीय,वैचारिक मतभेद असू शकतात.ते मतभेद व्यक्त करण्याचा प्रत्येकाला अधिकार सुध्दा आहे.परंतु मतभेद व्यक्त करण्याची पातळी जेव्हा विकृती या शब्दाला सुध्दा लाजविते, तेव्हा ती जातीय विद्वेषाची ओकारी असते हे राष्ट्रवादीसह सर्वच राजकीय व सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी लक्षात घेतले पाहिजे.त्यामुळे निव्वळ निषेध,विरोध किंवा मोर्चे काढून हा विषय थांबविण्यासारखा नाही.राष्ट्रवादीच्या काही चिकित्सक लोकांनी अशा घटनांच्या मुळाशी जाऊन शोध घेणे अत्यावश्यक आहे.कारण हा प्रश्न फक्त पवार साहेबांपुरता किंवा कोण्या एका व्यक्तीपुरता मर्यादित नाही.यामागे फार मोठे छुपे कारस्थान आहे.कारण सोशल मीडियात अशा प्रकारे घाण ओकणारी ही मंडळी जर तुम्ही बारकाईने तपासली तर ती विशिष्ट जातीवर्गातील,विशिष्ट विचारधारेशी संबंधित,वर्णवर्चस्वाचा प्रचंड अभिमान बाळगणारी आणि इतरांना तुच्छ,हीन,हलकट समजणारी ही जात्यांध व वर्णाभिमानी मंडळी आहे. हे लोक अशिक्षित नाहीत,चांगले उच्चविद्याविभूषित आहेत आणि ते हा नालायकपणा ठरवून,जाणूनबुजून करीत आहे.परंतु आमच्या राजकीय लोकांना अजूनही चिकित्सक पध्दतीने विचार करण्याची सवयच नसल्यामुळे आम्ही फार उथळ आणि उतावीळपणे प्रतिक्रिया देवून थांबून जातो.

    हा संघर्ष खूप मोठा व जीवघेणा आहे.पुरोगामी चळवळीत झोकून काम करणाऱ्या लोकांनाच फक्त त्याची दाहकता आणि दुष्परिणाम समजू शकतात.राजकीय नेत्यांच्या मागेपुढे फिरुन फोटोसेशन करणाऱ्या व सोशल मीडियात मिरविणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या लोकांना हे षडयंत्र समजणे कठीण आहे.म्हणूनच तिकडे राहूल गांधी आणि इकडे शरद पवार यांची प्रचंड निंदानालस्ती,चारित्र्यहनन सतत सुरु असतांनाही दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते कुठेही अभ्यासपूर्ण आणि आक्रमक प्रतिवाद करु शकत नाही हे कटू असले तरी सत्य आहे.एका विशिष्ट विचाराच्या गटाकडून मागील काही वर्षापासून नियोजनपूर्वक हे षडयंत्र सुरु आहे.पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते स्वतःचा जीव धोक्यात घालून या विकृतांसोबत सर्व पातळीवर टक्कर देतात.परंतु काँग्रेस-राष्ट्रवादीचे लोक कुठेही अशा पुरोगामी विचारवंत,अभ्यासक,लेखकांना सहकार्य करीत नाही.उलट पुरोगामी चळवळी उध्वस्त करण्याचा प्रयत्न करतात.त्यामुळे नियोजनबध्द पध्दतीने अशा घृणास्पद घटना घडवून त्यांच्या नेत्यांवर पुन्हा पुन्हा खालच्या स्तरावर टिकाटिपणी केली जाते.

    ‘बारामतीच्या गांधीसाठी नाथूराम तयार करण्याची वेळ आली आहे’ असे जाहीरपणे सोशल मीडियात लिहिले जाते.तरीही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पेटून उठत नाही.एकटे जितेंद्र आव्हाड प्रत्येक वेळी किल्ला लढवितात.कारण त्यांना सोशल टच असल्यामुळे या सर्व गोष्टींचे गांभीर्य माहित आहे.बाकी नेत्यांना तर यामधील कारस्थान काहीच समजत नाही.त्यामुळे ते आपल्याच राजकीय विश्वात रममाण असतात.सोशल मीडियात पवार साहेबांविरुध्द व्देष,विद्वेष पसरविणारे मुस्लिम नाहीत.मग हे असे विकृत,विषारी,विखारी लिहणारे,बोलणारे कोण आहेत हे अजूनही राष्ट्रवादीच्या लोकांच्या लक्षात येत नसेल व ते जाहीरपणे बोलणार नसेल तर त्यांच्यासारखे मूर्ख कोणीच नाही.त्यामुळे आतातरी काँग्रेस-राष्ट्रवादीने हा विषय गांभीर्याने घेतला पाहिजे.चळवळीतील अभ्यासू लोकांसोबत संवाद,संपर्क,समन्वय साधून काहीतरी ठोस भूमिका ठरविली पाहिजे.निव्वळ राजकीय नफ्या-तोट्याचा विचार करणार असाल तर मग यापेक्षाही भयंकर गोष्टींना तुम्हाला सामोरे जावे लागेल.

    शरद पवार साहेबांचे महाराष्ट्राच्या उभारणीत मोठे योगदान आहे.त्यांच्यासोबत अनेकांचे अनेक राजकीय मतभेद असले तरी त्यांचे कार्य नाकारता येणार नाही.दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राची पायाभरणी केली.त्यांनाही त्यावेळी अशाच जातीय व्देषाला सामोरे जावे लागले होते.आता तीच परिस्थिती पवार साहेबांवर आली आहे.तेव्हा काँग्रेस-राष्ट्रवादीत जे काही थोडेफार वैचारिक व सामाजिक जाण असलेले नेते आहेत,त्यांनी सध्याच्या सर्व घटनांचा गांभीर्याने अभ्यास करुन हे असे आता का घडत आहे यावर चिंतन केले पाहिजे.त्यासाठी महाराष्ट्रात अतिशय ताकदीने शिव-फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेचे काम करणाऱ्या ज्या सामाजिक संघटना आहे, त्यांच्यासोबत संवाद,समन्वय साधून व आपले राजकीय अहंकार बाजूला ठेवून मोठ्या मनाने चर्चा करावी.निश्चितच यावर सकारात्मक उपाय सापडेल अशी आम्हाला खात्री आहे.तसेच शेवटी सर्वात महत्वाचे, मा.पवार साहेबांनी आता राजकारणातून पूर्णपणे निवृत्ती घ्यावी. आपले उर्वरीत आयुष्य शिव-फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांनी हा महाराष्ट्र घडविण्यासाठी १०० टक्के सामाजिक कार्यात स्वतःला वाहून घ्यावे.निश्चितच हा महाराष्ट्र तुम्हाला डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही.

    -प्रेमकुमार बोके
    अंजनगाव सुर्जी
    ९५२७९१२७०६

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *