• Mon. May 29th, 2023

धोका वाढत्या तापमानाचा…

  * वाढत्या उष्णतेचा आरोग्य, शेती, अर्थकारणा वर परिणाम

  गेल्या काही दिवसांपासून सूर्य आग ओकत असून उन्हाच्या वाढत्या उन्हाच्या झळा ह्या दुपारनंतरच नाही तर दिवसा उजाडताच सुरु होत आहे. हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज अगदी तंतोतंत खरा ठरला असून सध्या सूर्य उजाडताच आग ओकतोय अशी अवस्था झाली आहे. १२१ वर्षात यंदाचा मार्च महिना हा ऐतिहासिक ठरलेला आहे. उन्हाळ्याला सुरवात होताच हा महिना सर्वाधिक उष्ण ठरलेला आहे. शिवाय मे महिन्यातही अशीच अवस्था राहणार असल्याचा अंदाज आहे

  हवामानात वेगाने होत असलेले हे बदल म्हणजे जलवायू परिवर्तनाचा परिणाम आहेत. येणार्‍या काळात या संकटांची संख्या आणि तीव्रता कितीतरी पटींनी वाढण्याची भीती आहे. धोका आपल्या अगदी जवळ आल्याचे संकेत परिस्थिती आपल्याला देतेय. या आव्हानाकडे केवळ तापमानवाढीच्या द़ृष्टिकोनातून पाहणं योग्य ठरणार नाही.

  मार्च महिन्यातल्या उकाड्याने १२१ वर्षांचा विक्रम मोडीत काढला. हवामानशास्त्र खात्याच्या म्हणण्यानुसार, मै मध्येही अशीच परिस्थिती राहील आणि आपल्याला उन्हापासून सुटका मिळणार नाही. भारतात मार्च ते जून हा कालावधी उन्हाळ्याचा मानला जातो. पण मे महिन्यात उन्हाच्या झळा अधिक तीव्र असतात.

  हवामानात बदलांची कारणं जागतिक आहेत. येणार्‍या काळात या संकटांची संख्या आणि तीव्रता कितीतरी पटींनी वाढण्याची भीती आहे. या आव्हानाकडे केवळ तापमानवाढीच्या दृष्टिकोनातून पाहणं योग्य ठरणार नाही. आरोग्य, शेती, अर्थकारण अशा सर्वच घटकांवर त्याचं गंभीर परिणाम होणार आहेत.

  सध्या संपूर्ण देश उष्म्याने अक्षरश: बेजार झाला आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या पंधरवडय़ातच कमाल तापमानाने उच्चांक गाठायला सुरुवात केली. या महिन्यात क्वचित अनुभवाला येणारे ४० किंवा त्याहून जास्त अंश सेल्सिअसचे तापमान मुंबईसारख्या शहरानेही अनुभवले. यापुढील काळातही कमाल तापमान देशभरात सरासरीपेक्षा जास्त असेल, असे भाकीत हवामान खात्याने जाहीर केले आहे. दिल्लीत एप्रिलमध्येच ४२.४ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान वाढले. थंडी, ऊन आणि पाऊस या भारतातील तिन्ही ऋतूंचे वेळापत्रकही गेल्या काही दशकांत बदलत चालले आहे. त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर जेवढा होतो, तेवढाच शेतीवरही होतो आहे. संपूर्णत: निसर्गावर अवलंबून असलेली भारतीय शेती या वाढत्या तापमानामुळे अडचणीत येऊ लागली आहे.

  मागील पावसाळय़ात आलेल्या वादळांच्या गंभीर परिणामांपासून अजूनही पूर्णपणे सावरण्याच्या आतच तापमानवाढीमुळे कोकणातल्या आंब्यासमोर अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे. पिकत आलेल्या आंब्याला या तापमानामुळे डागाळले जाण्याची भीती आहे. दुसरीकडे नागपूरच्या संत्र्यांनाही त्यामुळे करपण्याची, काळे पडण्याची समस्या भेडसावू लागली आहे. मिरची, टोमॅटो, वांग्यासह पालेभाज्यांची नवी रोपे उन्हामुळे करपत आहेत. त्यामुळे भाजीपाला उत्पादकांनाही या उन्हाचा त्रास होऊ लागला आहे.

  माणसावर तापमानवाढीचा होणारा परिणाम आरोग्याच्या दृष्टीने गंभीर स्वरूपाचा होऊ शकतो. सतत उन्हात हिंडल्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी खालावली जाऊ शकते. सतत थंडपेये पिण्याची इच्छा वाढत राहिल्याने शरीरातील तापमानावर परिणाम होतो, त्याने गंभीर दुखणी उद्भवतात. हवामान खात्याने यंदा पाऊस चांगला पडण्याचे भाकीत केले आहे. त्याने दिलासा मिळाला असला, तरी सध्याच्या तापमानवाढीला सामोरे जाण्याची शक्ती त्या बातमीत नाही.

  पंजाब, हरियाणा, चंडीगड, राजस्थान आणि दिल्ली या प्रदेशांत येत्या आठवडय़ात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. आत्ताच देशातील अनेक राज्यांमध्ये वाढत्या उष्णतेमुळे होणाऱ्या वाढत्या वीजवापराचे संकट उभे ठाकले आहे. वाढत्या मागणीनुसार उच्चांक वापराएवढी वीज सतत निर्माण करीत राहणे, हे जसे आव्हान, तसेच वीजवाहक तारांवर तीव्र उष्णतेमुळे होणारे परिणाम टाळण्याचेही मोठेच संकट. अघोषित वीजकपात करण्याशिवाय अनेक राज्यांना तरणोपाय नाही, अशी आजची परिस्थिती आहे. शीतकटिबंधातील देश आणि बर्फाळ प्रदेशांमध्येही गेल्या काही वर्षांत उष्णतेच्या लाटा येत आहेत. त्यामुळे हिमनग, हिमनद्या वितळण्याच्या प्रमाणात वाढ होत असून परिणामी समुद्राच्या पाण्याची पातळी वाढते आहे.

  भारतातही दोनच आठवडय़ांपूर्वी जम्मू-काश्मीर आणि हिमालयाच्या क्षेत्रात उष्णतेची लाट आली होती. यंदाच्या उन्हाळय़ात पुढील काही दिवसांत पुन्हा या भागात उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता आहे. जगण्याच्या प्रत्येक क्षेत्रावर गंभीर परिणाम करणारे हे हवामान मानवी शरीराच्या सहनशक्तीची परीक्षा घेत आहे. अपुऱ्या विजेचा प्रश्न, पाण्याच्या असमान उपलब्धतेमुळे पिकांवर होणारे विपरीत परिणाम आणि शारीरिक अनारोग्याची चिंता असे हे तिहेरी संकट आहे. करोनाच्या विळख्यातून जरा कुठे बाहेर पडतो न पडतो, तोच वाढत्या तापमानाचे संकट उभे ठाकले आहे. त्याला सामोरे जाण्याचे आव्हान खूप आधीच लक्षात घ्यायला हवे होते. निसर्गावर अतिक्रमण करण्याच्या मानवी प्रवृत्तींमुळे हा धोका सहज टाळता येण्याजोगा निश्चितच नाही.

  -प्रा डॉ सुधीर अग्रवाल
  ९५६१५९४३०६

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *