• Mon. Jun 5th, 2023

तथागत गौतम बुद्धाचा विज्ञानवादी धम्म

    मानवी समाजाला नवे उन्नयपंख देण्याचे काम जगात फक्त आणि फक्त बुद्धाने केले आहे. जगातील सारे धर्म हे दैववादी या विचारसरणीचा भाव ठेवून माणसाला काल्पनिक जीवनाच्या अंधारगुहेत घेऊन जातात. पण तथागत गौतम बुद्ध यांचा धम्म मानवाला जीवनातील सत्याचा शोध घेऊन मानवतावादाचे निखळ नंदनवन निर्माण करण्याचे काम करत आहे.

    तथागत गौतम बुद्ध यांनी अत्यंत कठीण तपश्चर्या केली. विविध गुरूकडून जीवनाचे ध्येय काय,? माणूस दुःख मुक्त होण्याचे काय साधने आहेत ? यावर विचार मंथन केले. अनेक प्रश्न विचारले .पण कोणत्याही गुरुने त्यांच्या विवेकशील व तर्कशुद्ध प्रश्नांची उत्तरे दिली नाही. ही पृथ्वी एक दैवी शक्तीचा सानिध्यात आहे. त्यासाठी माणसाने दैवी शक्तीची उपासना करावी असे अनेक विचार त्या काळात थैमान घालत होते .भारतामध्ये सिंधू सभ्यता नंतर अंधकारमय वातावरण पसरले. आर्य लोकांच्या विकृत व्यवस्थेने येथील जेत्याला जिंकून दास केले. यज्ञयाग व कर्मकांड यांनी देशात अंधारगर्भ तयार केला होता.

    मानव विकासाची कोणतीही संधी दिसत नव्हती .अशा काळात अंधकारमय वातावरणात नव्या ज्ञानाचा प्रकाश घेऊन तथागत गौतम बुद्ध यांनी नव्या मानवाच्या जीवनाला गती दिली . त्यातूनच नवा विज्ञानवाद जगामध्ये निर्माण झाला. तथागत गौतम बुद्धाने निरंजना नदीच्या काठावर जीवनाच्या तत्वज्ञानाचा साक्षात्कार झाला. माणूस का जगतो..? माणसाचे दुःख कोणते..? माणूस ते दुःख घालू शकतो काय..? यावर त्यांनी चिंतन केले. त्या चिंतनातून माणसाच्या दुःखाचे मूळ कारण तृष्णा आहे.हे त्यांना अवगत झाले. जोपर्यंत आपल्यातील तृष्णेला नष्ट करीत नाही तोपर्यंत माणूस निब्बनापर्यंत पोहोचू शकत नाही. माणसाच्या उन्नती करीता पंचशिल, अष्टांगिक मार्ग व दहा पारिमाताचे त्यांनी प्रतिपादन केले. मानवाच्या मातृभाषेतूनच त्यांनी धम्म समजावून दिला.

    धर्माच्या साऱ्या पाखंडी विचाराला झुगारून नव्या प्रतित्यसमुत्पाद विचारांचा वैज्ञानिक सिध्दांत जगताला दिला. त्यातून मानवी मूल्यांची नवी विचारशीलता देशात सुरू झाली. भेदाभेद,विषमता ,गरिबी यावर प्रहार केला. स्त्री उन्नतीला नवा आयाम दिला. यातून अनेक थोर विदुषी बुद्ध धम्मात तयार झाल्या.थेरीगाथा हा ग्रंथ भगवान बुद्धाच्या विदुषीने लिहिलेला अप्रतिम ग्रंथ आहे.

    तथागत गौतम बुद्ध यानी आपल्या धम्मातून माणसांना बुलंद आवाज दिला.मानवाचे हीत हे युद्धात व लढाईत नसून शांततेत आहे. समतामूलक समाज हाच मानवाचा खरा मित्र आहे. आपल्यातील सारे वैर नष्ट करून बंधुभावाची कास धरावी. प्राणिमात्रांवर प्रेम करावं. चोरी करू नये .दारू पिऊ नये .खोटे बोलू नये. मादक पदार्थाचे सेवन करू नये. अशा प्रकारचे पंचशील देऊन मानवाला नवा आशावाद दिला .बनावटीचे सारे क्षेत्र उध्वस्त करून नव्या वैज्ञानिक धम्म जगताला दिला. याच धम्माची गती वाढवण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी १४ऑक्टोबर १९५६ ला नागपुरच्या दीक्षाभूमित लाखो बांधवांना धम्मदीक्षा दिली. हा देशच नाही तर सारे विश्व बुद्धमय व्हावे हीच डॉ बाबासाहेब आंबेडकरांची मनिषा होती.

    भारतात बुद्ध धम्माची गती वाढली तरी भारतातील सनातनीत्व आणि ब्राह्मणवादी ताकते चुकीच्या पद्धतीने धम्मावर घाला घालत आहेत. वर्तमान शासन व्यवस्था एका धर्माच्या उन्नतीसाठी धडपत आहे .इतर धर्मांना गौण ठरवून फक्त माझा धर्म श्रेष्ठ असे संविधान विरोधी कार्य करत आहे. देशातील बंधुभाव व समतावाद नष्ट नष्ट होत आहे. धर्म -धर्म, जाती- जातीत, वादळात माजले आहेत. अशा वेळी देशातील सर्व नागरिकांनी विज्ञानाची कास धरावी. हनुमान चालीसा वाचून किंवा धार्मिक प्रार्थना करून आपण आपली प्रगती करू शकत नाही. भारतीय संविधानातील नीतिमूल्यांचा उपयोग करून सर्वांनी समानतेने वागावे.आपल्यातील सारे भेट काढून टाकावे. बुद्ध तत्वज्ञानाच्या माणुसकीचा वसा घ्यावा. जे सत्य आहे ते स्वीकारावे.जे असत्य आहे ते नाकारावे. जर आपण ते करू शकलो तर भारताला वाचवू शकतो .जगात आलेल्या कोरोना महामारी व मानवनिर्मित युद्ध यांना थोपवण्यासाठी तथागत गौतम बुद्ध यांचा विज्ञानवादी धम्माची आज नितांत गरज आहे.हा धम्म मानवीय उन्नतीचा खरा आधारस्तंभ आहे. बुद्धाच्या शिकवण्याची आज मानवाला नितांत गरज आहे.बुद्ध हा सर्व दुःखावर इलाज आहे.

संदीप गायकवाड
नागपूर
९६३७३५७४००

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *