• Fri. Jun 9th, 2023

ईद मुबारक…

  आपण सारे भारतीय आहोत. भारतात वेगवेगळे प्रांत आहेत. प्रत्येक प्रांतात वेगवेगळ्या धर्माचे लोक राहतात. आणि त्याप्रमाणे वेगवेगळे सण ही साजरे केले जातात. सर्व धर्म समभाव या मतानुसार आज सारे भारतीय एकमेकांच्या सणांचा आनंद घेतात व देतात. खरं म्हणजे आजच्या लहान मुलांकरता हे खूप महत्त्वाचे आहे असे मला वाटते. ‘आम्ही सारे एक’ ही भावना निर्माण होते.

  मुस्लिम धर्माचे दोन महत्त्वपूर्ण सण म्हणजे एक रमजान ईद व बकरी ईद. रमजान ईद हे आनंद साजरा करण्याची ईद मानली जाते.याउलट ईदुज्जुहा म्हणजे कुर्बानी व त्यागाचे पर्व मानले जाते. ईद या शब्दाचा अर्थ आनंद असा आहे. तर फितर म्हणजे दान करणे. ईद च्या अगोदर सर्व मुस्लिम बांधव रोजा ठेवतात. म्हणजेच पूर्ण दिवसभर काही ही खात नसतात. सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत काहीच म्हणजे काहीच खात नाहीत. स्वतःची थुंकी सुद्धा ते गिळत नसतात. अतिशय कौतुकाची गोष्ट म्हणजे लहान मूल सुद्धा असा रोजा पाळतात. माझ्याकडे टुशनला एक इरफान खान म्हणून मुलगा येत होता. माझ्याच शाळेत शिकत होता. पाचवीतला मुलगा. सकाळी सातची शाळा. नंतर माझ्याकडे दोन तास टुशन घेऊन नंतर घरी जायचा. मला त्याच्या रोजाचे कळाले तेव्हा माझा जीव वर खाली झाला. एवढासा पोरगा, दिवसभर उपाशी. तेव्हा मोठ्या मुलांनी सांगितले, “मिस उनका तो रोजा है, सब ऐसा ही करते हैं”. मला कौतुक आणि त्या मुलाचा अभिमान ही वाटला! किती सुंदर हे संस्कार, सर्वांनी एक साथ उपवास ठेवणे!

  मुस्लिम बांधवांची शिस्त मला फार आवडते. दिवसातून पाच वेळा नमाज वाचायचे.किती ही काम असलं तरी सगळे व्यवहार बाजूला ठेवून ते मशिदीची हाक येताच तत्पर असतात. नेपोलियन बोनापार्ट म्हणे युद्ध भुमीवर सुध्दा असे वाचन करत होते. तसेच सारे मुस्लिम बांधव या बाबतीत शिस्तप्रिय असतात. हे लोक महिनाभर रोजा ठेवत असले तरी त्यांचे दिवसाचे व्यवहार सगळे नीट करतात. सुर्यास्तानंतर सगळे एकत्र बसून जेवण घेतात. नमाज वाचून देवाचे नाव घेऊन सुरुवातला खजूर खातात व नंतर सगळे पदार्थ. रोज गोड पदार्थ करण्याचा नियम असतो. एकमेकांना ही ते देतात.

  अजून एक त्यांच्यात अतिशय आवडणारी गोष्ट म्हणजे दानी वृत्ती. ईदच्या शुभ पर्वाला गरीब, अनाथ मुस्लिम बांधव आनंदापासून वंचित राहत असेल तर ती ईद मुस्लिम धर्मासाठी आनंदाची नाही, असे मानले जाते. मुस्लिम धर्मातील तळागाळातील व्यक्तीला ईदच्या पर्वाचा आनंद घेता यावा, यासाठी जकात व फितराची तरतूद मुस्लिम शरियत कायदामध्ये करण्यात आली आहे. जकात हे ईदच्या आधी दिले जाते. कारण त्यांनी ही या वर्षांतून एकदा येणार्‍या महान पर्व- ईदचा आनंद लुटता यावा म्हणून.

  त्याच्या जमातीतला गरीबाच्या तोंडी ही घास जावा म्हणून हे लोक गरिबांना महिनाभर पुरेल असे धान्य व गोड पदार्थ त्यांना देतात. कुणी उपाशी असू नये हीच भावना व तो त्यांच्या देवाचा आदेश म्हणून ते पालन करतात.माझी मैत्रिण मुस्लिम आहे. महिन्यातले एक दोन दिवस ती मला तिच्या रोजा सोडायच्या वेळी बोलावते. त्यावेळी तिथले त्यांचे एकोप्याचे वातावरण बघून माझे मन आनंदाने भरून जाते.

  रमजानच्या अगोदरच्या रात्री चंद्र दर्शन झाले की दुसऱ्या दिवशी नवे कपडे घालून मशिदीत नमाज अदा करायला जातात. अल्लाहच्या प्रती नमाज अदा केल्यानंतर मुस्लिम बांधव एकमेकांचे आलिंगन घेऊन ईदच्या शुभेच्छा देतात. या दिवशी मित्र असो वा शत्रू ते दोघांची गळाभेट घेऊन शुभेच्छा देतात. आपण दिवाळीत घराला रंगरंगोटी करतो तशी मुस्लिम बांधव ही ईदला आपल्या घराला रंगरंगोटी करून आप्तजनांना आपल्याकडे शिरखुर्मा खाण्यासाठी आमंत्रित करतात.लहान मुलांना मोठ्या माणसांनी पैसे देण्याची ही प्रथा आहे.

  हजरत मोहम्मद पैगंबरांनी आपल्या जीवनकाळात संपुर्ण मानवजातीला विश्वबंधुत्वाची शिकवण दिली. सामाजिक न्याय, समता, उदारता, समरसता याचे महत्व विशद केले आणि संपुर्ण मानवजातीच्या कल्याणाकरता आपले आयुष्य वाहुन घेतले. महम्मद पैगंबरांची शिकवण एका विशिष्ट जातीधर्मापुरती मर्यादीत नव्हती तर समस्त विश्वाचे कल्याण व्हावे असे त्यांच्या शिकवणीतुन प्रदर्शित होते.

  सगळया जातीधर्मातील सण उत्सवांनी आपल्याला विश्वबंधुत्वाचीच शिकवण दिली आहे. ती आपण अंगिकारायला हवी आणि आपण एक आहोत आपली संस्कृती आपली मातृभुमी ही एक आहे त्यामुळे एकमेकांच्या कल्याणार्थ जे जे करता येईल ते आपण करायला हवे….हाच तर या सणांचा संदेश आहे. हाच रमजानचा सण!

  -शोभा वागळे
  मुंबई.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *