• Mon. Jun 5th, 2023

आज जागतिक व्यंगचित्रकार दिवस !

    ५ मे हा दिवस जागतिक व्यंगचित्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. व्यंगचित्र म्हणजे केवळ हसवणारे माध्यम असा गैरसमज आढळतो. तथापि, व्यंगचित्र हे अत्यंत प्रभावी माध्यम असल्याचे अनेकदा सिध्द झाले.व्यंगचित्र म्हणजे काय? असा प्रश्न अनेकांना पडतो. काही जण त्याला केवळ मनोरंजनाचं माध्यम समजतात. तथापि गांभिर्यानं विचार केला तर व्यंगचित्र हा स्वतंत्र साहित्य प्रकार आहे, हे लक्षात येतं. व्यंगचित्र ही कलाकृती म्हाणून स्वयंपूर्ण असते. त्या‍त विनोद असतो, विसंगती असते, कल्पकता असते, अतिशयोक्ती असते. चित्रांच्या माध्यपमातून मनोरंजन व मनोरंजनातून प्रबोधन करण्याचा प्रयत्न, व्यंक्तीचित्र करत असते.

    व्यं‍गचित्र ही एक दृश्य भाषा म्हणूनही ओळखली जाते. शब्दहिन व्यंगचित्रे आणि शब्दप्रधान व्यंगचित्रे या दोन प्रमुख भागात व्यंगचित्रांचा समावेश करता येऊ शकतो. भाषा ओलांडण्याची ताकद आणि मार्मिकता या माध्यमात आहे. व्यंगचित्र केवळ विनोद, टीका, थट्टा-मस्करी, टिंगलटवाळी करण्यासाठी वापरणे म्हणजे या माध्यमाचा दुरुपयोग केल्यासारखेच होय.

    व्यंगचित्रांतून काव्यात्मव आशय, सार्वकालिक सत्य, दु:ख, यातना, वेदना समर्थपणे मांडता येऊ शकतात. व्यंगचित्र हे कलेच्या स्वरुपातून संमिश्र तर आवाहनाच्या दृष्टी ने व्यापक माध्यम आहे. चित्रकला आणि व्यंगचित्रकला यासाठी कागद, रंग, ब्रश, पेन या साधनांचा वापर केला जातो, तथापि त्यांतून जे काही साकारले जाते, त्यामध्ये दोन टोकांचे अंतर दिसून येते. एकाच व्यक्तीचे चित्रण करतांना चित्रकार सौंदर्याचा शोध घेईल तर व्यंगचित्रकार त्या‍तील विसंगतीचा.

    पण याचा अर्थ असा नाही की, व्यंगचित्रकार त्या व्यक्तींच्या शारिरीक अपंगत्वाचा वापर करुन व्यंगचित्र रेखाटेल. विसंगती हा व्यंगचित्राचा आत्मा असला तरी व्यक्ती, समाजातील दोष, उणिवा दूर करण्यासाठी व्यंगचित्रकार भर देत असतो. व्यंगचित्रातील व्यंग्यभाव आणि अर्थातील व्यंग यावरुन व्यंगचित्रांचं महत्व ठरत असते.

    वृत्तपत्रे, साप्ताहिके, मासिके आणि दिवाळी अंकांमधून व्यंगचित्रे नियमितपणे प्रकाशित होत असतात. वृत्ततपत्रे आणि साप्तांहिकांमधून प्रकाशित होणाऱ्या व्यंगचित्रांचा विषय राजकीय-सामाजिक असतो. तात्कालिक घटनांवर आधारित असणाऱ्या व्यंगचित्रांना कालमर्यादा असते. दहा-पंधरा वर्षापूर्वी काढलेले व्यंगचित्र समजण्या्साठी ज्या घटनेवर ते व्यंगचित्र रेखाटले आहे ती माहित असणे आवश्यक असते.

    दैनिकांतून नियमित व्यंगचित्रे काढणाऱ्या व्यंगचित्रकारांना सतत वाचन करण्याची आवश्यकता असते. वाचन, मनन, चिंतन यातून वेळेवर सूचलेले व्यंगचित्र हे व्यंगचित्रकाराला आणि वाचकालाही वेगळा आनंद देत असते. याउलट मासिके किंवा दिवाळी अंकांमधून प्रकाशित होणाऱ्या व्यंगचित्रांचा भर दीर्घकालीन टिकणाऱ्या विषयांवर असतो. अशी व्यंगचित्रे कधीही पाहिली, वाचली तरी त्यातून मिळणारा आनंद सार्वकालीक असतो. म्हणूनच हास्य प्रधान दिवाळी अंकांचे स्थान आजही टिकून आहे.

    व्यंगचित्र सूचते कसे, असा अनेकांना प्रश्न पडतो. तथापि कविता जशी कुठेही सूचते, तसेच व्यंग चित्रांच्या बाबतीत म्हणता येईल. फरक फक्त एवढाच आहे की, व्यंगचित्रकार सूचलेली कल्पना त्यातील तपशीलासह लिहून नंतर चित्रित करतो. शब्द्प्रधान व्यंगचित्रांमध्ये कमीत कमी रेषा आणि मोजक्या शब्दांचा वापर केला तरच ते प्रभावी ठरु शकते. व्यंगचित्रांतील व्यक्ती आरेखांचे हावभाव या शब्दांना बळ प्राप्त करुन देत असतात.

    व्यक्ती, क्रिया आणि पध्दती यांचे अतिशयोक्तीने केलेले प्रकटीकरण किंवा आविष्कार म्हणजेच व्यंगचित्र होय. हास्याबरोबरच विचारशक्तीला चालना देणारे व्यंगचित्र हे वाचकाला अंतर्मुख होण्यास भाग पाडते. व्यंगचित्र हे अत्यंत प्रभावी माध्यम असले तरी नवी पिढी याकडे वळतांना दिसत नाही, ही पिढी ऍनिमेशनकडे वळलेली दिसते. वृत्तपत्रांमध्ये ‘कार्टून कल्चर’ निर्माण झालेले नसल्यांने केवळ व्यंगचित्रे काढणाऱ्या व्यंगचित्रकारांची संख्याही घटलेली आपणांस दिसेल.

    संकलन व संकल्पना
    अनिल देशपांडे बार्शी
    ९४२३३३२२३३
    साभार नेट
    (Images Credit : Mumbailive.com)

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *