अनोखी ग्रामीण शब्दकळा : गावठी गिच्चा

  सचिन पाटील, या युवा लेखकाच्या ‘सांगावा’ कथासंग्रहाला रसिक वाचकांनी नावाजलं. बारा वर्षांत चार आवृत्त्या निघाल्या. समीक्षा ग्रंथही निघाला. त्यानंतर ‘अवकाळी विळखा’ हा कथासंग्रहही गाजला. त्यास अनेक साहित्य संस्थांनी पुरस्कार देऊन सन्मानित केलं. अलीकडे त्यांचा ‘गावठी गिच्चा’ हा कथासंग्रह बहुचर्चित आहे. त्यावरही अनेकांनी समीक्षा केली, अभिप्राय नोंदविले आहेत, कथासंग्रहास काही मानसन्मानही मिळाले आहेत.

  Thank you for reading this post, don't forget to subscribe!

  ‘गावठी गिच्चा’ कथासंग्रहाच्या मनोगतात लेखक म्हणतो, ‘खरंतर आपलं गाव हा सगळ्यांच्याच आपुलकीचा, जिव्हाळ्याचा विषय असतो. मोठी झाल्यावर ती व्यक्ती गावात असो वा नसो, पण त्याच्या मनाच्या चोरकप्प्यात गाव मात्र सदोदित विसावलेला असतो. गावातल्या आठवणी त्याच्या मनात अत्तरासारख्या दरवळत असतात. वेळीअवेळी एकांतात त्या आठवणी जाग्या होतात आणि बोट धरून त्याला गावातून फिरवून आणतात…’ लेखक म्हणतो, ते अगदी खरं आहे. प्रत्येक माणूस गाववेडा असतो, मग त्याला त्या गावात घरदार असो-नसो. शेतभात अथवा इस्टेट नसली, तरी आपली जन्मभूमी म्हणून त्याला गाव प्रिय असते. गावातली माणसं, शेजा-पाजारी, मित्र-मैत्रिणी, शेत-मळे, ओढे-नाले, झाडं-झुडपं, या सगळ्या गोतावळ्यात तो रमत असतो. सचिन पाटील यांच्या कथासंग्रहातील कथा वाचताना वाचक गावाकडच्या आठवणीने भाऊक झाला नाही तर नवल. आपोआपच वाचक स्वतः लेखकाच्या ठिकाणी समजून गावाशी तल्लीन होत जातो.

  गावातली माणसं कशी मायाळू, सरळ, नाकापुढे बघून चालणारी आणि सरळ वागणारी असतात. फटकळ बोलणारी, आडानी, राकट, शेता पोतात रापलेली. त्यामुळे दिसायला उजळ दिसत नसली, तरी मनाने आणि अंतकरणाने निर्मळ, स्वच्छ असतात. प्रेमळ आणि अडीनडीला मदत करणारी असतात. बहीण-भावाचं नातं निभावणारी, घट्ट करणारी असतात. सुख-दुःख वाटून घेणारी असतात. वरून जरी ओबडधोबड आणि कुरूप दिसत असली तरी विशाल अंतःकरणाची असतात, म्हणून गावातली देवभोळी माणसं, माणूसप्रेमी असतात.

  सचिन पाटील, यांच्या ‘उमाळा’ कथेत बहिण-भावाच्या प्रेमाचा ओलावा हळुवार उलगडलेला आहे. एके दिवशी अचानक भर उन्हात पुष्पाआक्का माहेरी येते. भाऊ रामभाऊला आश्चर्य वाटतं, आक्का अशी अचानक कशी काय आली? त्यामुळे, ‘अक्का कसं येणं केलं? मला कळविलं असतं तर…’ रामभाऊ सहज बोलला. पण आक्काच्या स्वभाव भारी फटकळ. ती ताडकन् बोलते, ‘का? माझ्या घरात यायला मला कुणाचं भ्या हाय का? मी कवाबी यीन नि कवाबी जाईन!’ आक्काच्या फटकळ स्वभावाची इथे वाचकाला जाणीव होते.

  पुष्पाआक्का कशी होती? याचे चित्रण लेखक करतो, ‘पुष्पाआका रामभाऊची थोरली सावत्र बहीण. राकट पुरुषी चेहरा. मोठ्ठं फताडं नाक. रूंद कपाळ. कुंकू लावण्याच्या ठिकाणी मोठी गोंदण्याची खूण. भुंड्या कपाळावरच्या त्या हिरव्या खुणेनं आणि गालावर पडलेल्या खडबडीत व्रणामुळं ती फारच विद्रूप दिसायची. डबल हाडाची ही उचनिच बाई बघितली, की बाया-माणसंसुदीक तिला वचकूनच असायची. ती फारशी कुणाशी बोलायची नाही आणि बोलायची ते हे असं. फटकळ. अंगावर आल्यागत. पण आक्का कशीही दिसली, कशीही बोलली, तरी तिच्या मनात काही नसायचं. एखाद्या काळ्या ओबडधोबड खडकाखाली आत खोल कुठेतरी थंडगार गोड्या पाण्याचा झरा असावा, तसं तिचं मन होतं. पण ते आतून, बाहेरून ती अशीच घे चिपाड नि घाल धोपाट!’

  अशी ही पुष्पाआक्का सुनेवर रुसून चार दिवस माहेरी रहायला आलेली. हातात वायरीची पिशवी. त्यात दोन नेसती लुगडी. बिस्किटचा पुडा, केळांची फनी आणली होती. भाऊ दबक्या आवाजात आक्काशी बोलत होता. यावरून आक्काच्या व्यक्तीमत्त्वाचा भावावरील दबदबा दिसतो. नेहमीचं बोलणं, कुणी कुणाचं नसतं… आत्ताच्या सुना कशा वागतात… आम्ही असं वागलाव… इतकं सोसलं… असं जुन्या आठवणी आणि अगतिकता, ती सांगत होती. भाऊ सांगत असतो, एवढे दिवस तिच्याकडे जायला का जमलं नाही ते, शेतात विहीर खोदायला घेतलीय… चाळीस फूट खोल खोदली तरी अजून पाणी लागत नाही! कामाचा पाढा रामभाऊ सांगत होता, तरी आक्का त्याला सरळ, सहज समजून घेत नव्हती. तिचं फाटकं बोलणं चालूच होतं.

  दुपारची जेवणं झाली आणि बहिण-भावाचा बोलत-बोलत डोळा लागला. रामभाऊंना वाटलं, की आक्का नक्की चार दिवस राहील पण कशाचं काय? तिला भिंतीवर लावलेल्या पोस्टरमधल्या गोंडस मुलाला पाहून आपल्या नातवाची आठवण झाली. पोरगं खेळत खेळत रस्त्याला जाईल, रस्त्यावर ही वर्दळ असते. सूनबाई वेंधळी… आक्काचा जीव घाबराघुबरा होतो. पटकन् तिने वायरीची पिशवी सावरली. उठली, ‘जाते बाबा मी माझ्या घराकडं! आपल्या आपल्या गावात, घरात असलेलं बरं!’ म्हणून निघाली सुद्धा. भाऊ चहा पिऊन जा म्हणत होता, तरी न थांबता ती स्टॅन्डकडे निघाली. आक्का अवकाळी पावसासारखी आली काय आणि मन ओलं करून गेली काय? तिच्या वागण्या बोलण्याने रामभाऊंच्या अंतकरणात उमाळे दाटून आले होते. दोन्ही नातवांवरली माया आणि विहिरीला पाणी नक्कीच लागेल, असं म्हणून तिने पाझर फोडला होता. आगळ्या-वेगळ्या बहिणीची ही कथा या कथासंग्रहातील उत्कृष्ट कथा आहे.

  देशाला स्वातंत्र्य मिळाले. लोकशाही रुजू झाली. लोकांच्या हाती देशाचा कारभार आला. तसा काही कारस्थानी उपद्रवी लोकांची पैदासही झाली. त्यांनी देशात जातीपातीत, धर्माधर्मांत, प्रांता-प्रांतात अगदी माणसामाणसांत मतभेदाच्या, वैराच्या ठिणग्या टाकायला सुरुवात केली. दंगेधोपे घडवून आणले. शांतता सुव्यवस्था अस्थिर केली. कायदा आणि प्रशासनाला जणू आव्हान दिले. देशात राज्यात दंगली होऊ लागल्या. त्यात निष्पाप सामान्य माणूस होरपळून जायचा. राजकारण्यांचा आणि अस्मितावाल्यांचा खेळ होतो, पण गरीब जनतेचा मात्र जीव जातो, हे वास्तव लेखकाने ‘दंगल’ या कथेत टिपलेलं आहे.

  आपण एकविसाव्या शतकात वावरत आहोत. विज्ञानाने प्रगती केलेली आहे. शिक्षणाचा प्रसार झालेला आहे, तरीही अज्ञान दारिद्र्य अंधश्रद्धा, गैरसमजुती आणि अस्पृश्यता, भेदाभेद नष्ट करू शकलो नाही. सुशिक्षित माणसंसुद्धा त्याला अपवाद नाहीत. बाह्यरंग बदललं असलं तरी अंतरंग बदललेला नाही. सुशिक्षितांची अशी अवस्था तर अशिक्षितांची गोष्टच निराळी. थोडीशी विनोदाच्या अंगाने जाणारी ‘करणी’ ही ठसकेबाज कथा समाजातील अज्ञान आणि अंधश्रद्धेने घेरलेलं भावविश्व अधोरेखित करते आणि खेडेगावात अंधश्रद्धा कशा निर्माण होतात याचे उदाहरण दाखवून देते.

  ‘डोरलं’ या कथेतील नायिका सवी, आपल्याला खिळवून ठेवते. ती अभागी आहे. नवरा मरण पावला. कारखाना मालकानं दमडा देणार नाही, म्हणून सांगितलं. दारू पिऊन मेला, म्हणून प्रकरण बेदखल केलं. त्यानंतर तिची शोकांतिका सुरू झाली. भिशीचा हप्ता तटला म्हणून चेअरमनने तगादा लावला. हप्ता भरणा करण्यासाठी दुसऱ्या सावकाराचा उंबरठा झिजविला. त्याने तिचा सौदाच केला. अखेर असं तसं दुसऱ्याच्या दावणीला रखेल म्हणून जगण्यापेक्षा नवऱ्याची आठवण म्हणून जपून ठेवलेलं डोरलं विकून ती भिशीचा हप्ता भरते. तेव्हा तिला कितीतरी हलकं वाटतं. अखेर मेलेल्या नवऱ्याचं डोरलंच कामी आलं. समाजात अशा कितीतरी अभागी विधवा स्त्रिया आहेत. त्यांचं जीणं करपून गेलेलं आहे. त्यांचा आक्रोश व्यवस्थेच्या कानावर येतच नाही.

  शाळा, मंदिर, बाजार, चौक, पंचायत, ओढाकाठ, कुरण, एसटी स्टँड ही आपल्या गावची प्रेक्षणीय स्थळं. प्रत्येकाच्या जीवनात त्यांचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. साहित्यात ह्या स्थळांनी आपले स्थान निर्विवाद निर्माण केलं आहे. आपण कितीही मोठे झालो, तरीही गावच्या आठवणी कोणी काढल्या, की मन कसं प्रफुल्लित होतं. एक आठवणीचा धागा उलगडतो. शाळा, मंदिर, गाव, ओढा, बाजार, चौकाचा चित्रपट डोळ्यांपुढे येतो. लेखकाने ‘गावचं स्टँड’ या अल्पाक्षरी कथेमध्ये गावातले एसटी स्टँड असेच साकार केलेले आहे. कुशल चित्रकार आणि मनस्वी लेखक प्रतिसृष्टी निर्माण करू शकतो, याचा अनुभव या ‘गावचं स्टॅन्ड’ या कथेच्या रूपाने येतो.

  ग्रामीण जीवनाला अनेक पदर असतात. शेता-रानात राबराब राबायचं. शेरडा करडामागं रान तुडवायचं. शिवारात हिंडायचं. सरपण फाटा गोळा करायचा. पेरणी, राखण, मळणी मग रास… लगिन सराई, जत्रा-खेत्रा, पै पावना, असं एक की दोन. गावातल्या माणसांपाठीमागे हजार भानगडी असतात. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा येतो जीवन बहरून जाते… जरा विसावा मिळाला, की माणूस देवळात जातो. पोथीपुराण आहे. किर्तनात दंग होतो. नाहीतर मैतर जमवून पारावर गप्पा मारायच्या. त्यातले विषय, गाव आणि शिवार-त्यातली माणसं. जगण्याच्या नाना तर्‍हा. त्यात आणखी एक विषय खास करून असतोच, भुता खेताचा. करणी, धरणी, चकवा फसगत. प्रत्येकाला एकामागून एक आलेला अनुभव अथवा ऐकिव गोष्टी सांगितल्या जातात. स्वतःची प्रचिती सांगितली जाते. दबक्या आवाजात भितीदायक प्रसंग सांगितले जातात. असे एका पिढीमागून पुढच्या पिढीला अनेक कथा अनुभव आभास सांगितले जातात. कथा साहित्याचा उगम अशा सांगीवांगीतूनच झालेला आहे. यावर पूर्वसुरी कथाकारांनी खूप कथा लिहिलेल्या आहेत. आजची पिढी त्याला अपवाद नाही. सचिन पाटलांची ‘चकवा’ ही कथा बजा आणि माधुरीची कथा आहे. अतिशय उत्कंठावर्धक आणि वाचनीय कथा म्हणता येईल.

  आपल्या राज्यात सरकारने लोकहिताच्या अनेक योजना राबविल्या आहेत. त्यापैकी ‘तंटामुक्ती गाव’ ही योजना आहे. गाव तिथं तंटामुक्ती योजना. जे गाव तंटामुक्त होईल, त्या गावाला बक्षीस देण्याचं जाहीर केलं जातं. आता गाव म्हटले, की भांडण तंटा नाही असं कसं होईल. राज्यात असे एकही गाव नाही, त्यामध्ये कोर्टात प्रकरण नाही, पोलीस स्टेशन मध्ये केस नाही! सर्रास गावांमध्ये ‘तंटा स्पिरीट’ निर्माण झालेलं आहे. जमिनीचे प्रकरण बांधा-बांधावरून भांडण, इलेक्शन मधला राग, दलितांवरील अत्याचार, घरगुती भांडण, अशा नाना भानगडीत लोक अडकलेले असतात. अशी प्रकरणे वर्षानुवर्षे कोर्टात पडून आहेत. विकास आणि प्रगतीच्या मार्गावरचे हे अडथळे आहेत. कोर्टाचा वेळ, पैसा, पोलिस खात्याची शक्ती वाया जात आहे. म्हणून गावपातळीवरच पायबंद घालावा, तेथेच प्रकरणे निकाली काढावीत किंवा मिटवावीत असा या योजनेचा हेतू आहे. त्यासाठी तंटामुक्ती समितीची स्थापना ग्रामपातळीवर करण्याचे ग्रामपंचायतीला अधिकार दिलेले आहेत.

  अशीच एक गावसभा हुबालवाडी ग्रामपंचायत सभागृहात आयोजित केलेली असते. त्याचा तपशील म्हणजेच सदरची ‘तंटामुक्ती’ ही कथा. विनोदी अंगाने जाणारी. वास्तविक शंकर पाटील, व्यंकटेश माडगूळकर यांनी ग्रामीण कथांना विनोदाची झालर लावून या दिमाखदार केलेल्या आहेत. ग्रामीण किस्से रंगवून सांगायची त्यांची हातोटी वेगळीच होती. मराठी मनावर त्यांनी अधिराज्य गाजवलं आहे. लेखकांना त्याचं अप्रूप असतं. त्यांच्या काही कथा पूर्वसूरी लेखकाचं अनुकरण करणारी अवतरलेल्या असतात सचिन पाटलांची तंटामुक्ती कथा वाचताना शंकर पाटलांच्या ‘मीटिंग’ कथेची आवर्जून याद येते.

  तंत्रयुगाने क्रांती केली. कॉम्प्युटर आणि मोबाईलज्वर तर अटळ आहेत. देशातील सत्तर टक्के लोकांजवळ मोबाईल आहेत. मोबाईलचे वेड अमर्याद आहे. मोबाईलचा अतिवापर कसा घातक आहे किंवा कशी धमाल उडवतो हे ‘टोमॅटो केचप’ या कथेत हलक्याफुलक्या निर्मितीतून स्पष्ट केलं आहे. सोशलमिडिया, वेगवेगळे एफएम चॅनेल यांचे फायदेतोटे यावर मंथन होते.

  या कथासंग्रहातील शीर्षक कथा म्हणजे ‘गावठी गिच्चा’ होय. शिवा मोहिते आणि सौ लक्ष्मी या नवरा-बायकोची ही कथा आहे. संसार म्हणजे त्यातून भांडण आलंच. हौसमौज करता करता कधीतरी नवरा बायकोचा बोल येतो. रुसणं, फुगणं होतं. त्याला फार मोठे कारण लागत नाही. असंच शिवाच्या बाबतीत झालं खरं. त्यात शिवाचीच चूक होती. तो एकदा लक्ष्मीला न विचारता बाहेरगावी गेलेला. लक्ष्मीचा त्याला राग आला. मला न सांगता परगावी जातात म्हणजे काय म्हणावे, अशा वागण्याला? नवर्‍याला आता माझा हिसका दाखवते, म्हणून लक्ष्मी नवऱ्याची वाट बघते. चार दिवसांनी शिवा घरी येतो. नवरा आला म्हंटल्यावर बायकोनं कसं उल्हासित होऊन गेले पाहिजे. हसून, लाजून त्याचं स्वागत केलं पाहिजे. हात पाय धुवायला तांब्या भरून पाणी दिले पाहिजे, पण तसं काहीच होत नाही. लक्ष्मी घरात रुसुन बसलेली. शिवा परगावाहून आला त्यावेळी चुलीजवळ लसुन सोलत बसलेली. रस्त्यावरच्या चिखलाने राडरिबीट झालेल्या पायांमुळे शिवा लक्ष्मीला पाण्याचा तांब्या मागतो, पण ती देत नाही. एक नाही का दोन नाही. शिवाला उमगतं, बायको रुसली आहे. पण तिला तसं काही न दाखवता, हात पाय धुऊन तो आत येतो. म्हणतो, ‘जेवायला वाड बरंऽ खमंग वास सुटलाय. लई भूक लागलीऽ…’ लक्ष्मीला वाटलं, नवऱ्याने माघार घेतली. आपण होऊन बोलला! ती ताट वाढून नवर्‍याजवळ गप्प बसते. शिवाच्या मनात विचार येतो, आपल्याला गावात एवढा मान पण घरात किंमत नाही. आता बायकोलाही आपला इंगा दाखवला पाहिजे. म्हणून एकदम आठवल्यागत करून तो म्हणतो, ‘अगं चुकलंच बघ, गावाकडे येताना मी पायरी आंब्याची करंडी आणली होती. गवळ्याच्या टेंपोबरोबर ती तशीच त्याच्या घराकडे गेली.’ हा संवाद ऐकून लक्ष्मी हरखून गेली. तिला आंब्याची आणि आमरसाची भारी आवड होती. त्यामुळे ती हरखून म्हणाली, ‘थांबा मी गवळ्याच्या डेरीतनं करंडी आणते! आमरस करू, पोळ्या लाटू, कुरड्या तळू. लई दिस झालं आमरस खाल्लेला नाही!’ असं म्हणून ती बाहेर पडली सुद्धा. पुढे लक्ष्मी घराबाहेर पडते. ती शिवाच्या चांडाळ चौकडीच्या जाळ्यात सापडते. भोवऱ्यात सापडल्यागत तीची गत होते. एका पेक्षा एक बिलंदर आणि इरसाल ही चौकडी असते. एकाकडून दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे… अशी ती गावभर फिरत राहते. अशी सगळी गावरान गंमत. शिवाने लक्ष्मीला दाखवलेला ‘गावठी गिच्चा’ याचं खुमासदार वर्णन मुळातूनच वाचलं पाहिजे. नवरा बायको कसे शेरास सव्वाशेर भेटतात, हे इथे दिसून येते. हे केवळ आणि केवळ गावातच पाहायला मिळते.

  अशीच नवरा-बायकोची जोड ‘उपास’ या कथेत आहे. समज-गैरसमज होतात. नवरा-बायको पुन्हा भेटतात. गुण्यागोविंदाने नांदतात. या संग्रहातील ‘कोयता’ ही एक सशक्त कथा आहे. अनादी काळापासून स्त्रियांवर अनन्वित अत्याचार होत आले आहेत. लोकशाही, स्वतंत्र देशातही त्यामध्ये खंड नाही. दररोज अत्याचाराच्या घटना घडत आहेत. समानतेचा आणि महिला सबलीकरणाचा उद्घोष करीत असतानाही सतत असे घडत आहे. देश सुधारला, महिला पुढे आल्या आहेत, असे आपण म्हणत असलो, तरी त्या घरीदारी, कार्यालयात, प्रवासात सुरक्षित नाहीत, हे वास्तव आहे. त्यावर एकच उपाय म्हणजे महिलांनी स्वसंरक्षणार्थ ‘कोयता’ बाळगला पाहिजे, असे वाटू लागले आहे! काय सांगावे, उद्या महिला स्वरक्षणासाठी बंदुक परवाना सुद्धा मागतील. त्याचे आश्चर्य वाटू नये.

  विनोदी कथेत काही ठिकाणी वास्तव चित्रणही सुखावह वाटते. वास्तव अधिक वेधक करण्यासाठी लेखकानं व्यक्तीरेखांचे प्रत्ययकारी वर्णन केलेलं आहे. तर कुठे ग्रामीण बोलीचा, चित्रमय शैलीचा चपखल अवलंब केला आहे. जसे की, ‘पावसाची चिकचिक सुरू असलेली. रस्त्यावरच्या खड्ड्यात पाण्याची डबकी साठलेली. रस्ते राडरिबीट झालेले. रस्त्यावर सगळी आंबील झालेली. पाय ठेवला की बिर्रर्रऽ दिशी घोटा बुडत होता.’ ‘सवि हरीची वर्गमैत्रिणच. दिसायला सावळी पण नाकी डोळी नीटस. उंच शेलाटी, अटकळ बांध्याची. सोनेरी रंगात बुडवून काढलेल्या नटरंगी मूर्तीगत दिसायची. चांगलीच देखणी होती ती. खळाळणाऱ्या झऱ्यागत अवखळ दिसत होती ती.’ लेखक लिहितो, ‘खांद्यावरचा पदर सावरत वाऱ्याच्या झुळकेनं शेवरीचा डहाळा लाजावा तशी शेवरीगत ती लाजली.’ ‘सावकारानं आपल्या धाकानं विळा वाकवल्यागत गाव वाकवला होता.”कुणा रांडंची नजर लागली, कुणी करणी केली गऽ… कुणाला बघवली न्हाय माझी हत्तीगत म्हस, रगतपिती होऊन मरंल उंडगीरांड. तिची तिर्डी मी बांधलीऽ…’ ‘अंधार अस्वलाच्या पावलांनी आला आणि कारखान्या शेजारच्या फडकऱ्यांच्या खोपटास्नी मिट्टी मारून बसला. सांजवारा सुटला. वाऱ्यानं खोपटांवरचा चघाळा घोंगड्याच्या दशा हलाव्यात तसा हलू लागला.’अशा अनोख्या, ग्रामीण शब्दकळेनं नटलेलं कथालेखन, हे सचिन पाटील यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. एकूणच सचिन पाटलांची कथा बहरते आहे. तिने असेच उत्तम कथासंग्रह द्यावेत ही अपेक्षा!

  – योगीराज वाघमारे,
  सोलापूर.
  संपर्क: 99 21 058868
  * * *
  कथासंग्रह: गावठी गिच्चा
  लेखक: सचिन वसंत पाटील
  प्रकाशन: तेजश्री प्रकाशन
  पृष्ठे: १४४, मूल्य: २०० रुपये
  स्वागतमूल्य: १०० रुपये
  संपर्क: ८२७५३७७०४९