Header Ads Widget

सागरतळाशी : मानवी संवेदनात्मक मनाचा मूल्यकोश

    जीवन हे अत्यंत खाचखळग्यांनी भरलेले आहे .जीवनात जे धडपडतात ते यशस्वी होऊ शकतात .मानवी जीवन हे विविध नात्यांच्या पदराने विणलेले जाळे असतात. काही जाळे घट्ट असतात तर काही जाळे सुटसुटी असतात. मानवी समाजाला संवेदना ही उत्कर्षाच्या शिखरावर घेऊन जाते. विल्यम शेक्सपियर जीवनाविषयक म्हणतात की," जीवन म्हणजे रंगमंच. त्या रंगमंचावर विविध पात्रे साकार करणारा माणूस हा अत्यंत मौल्यवान नट असतो".तर बुद्ध म्हणतात की,"न अन्तलिक्खो न समुद्दमज्झे न पब्बतिनं विवर पविस्य । न विज्जती सो जगति पदेस्सो सत्कर्मों नप्पसहेम्य मच्चू।।"

    साहित्य हे मानवी जीवनातील अत्यंत सृजनात्मक आविष्कार आहे. साहित्यातील विविध लेखन मानवी मनाला नवी अनुभूती प्रधान करतात. जीवनाच्या वाटेवर मिळणारे व्यक्ती हे आपले कधी होऊन जातात हे समजत नाही. मराठी साहित्यात व्यक्तिरेखांवर विविध ग्रंथ निर्माण झालेले आहेत. मनोरंजनात्मक व कल्पना व्यक्तिरेखांचे लेखन सातत्याने होत आलेले आहे. पण साहित्यात अण्णाभाऊ साठे यांच्या भावस्पर्शी व्यक्तिरेखा ह्या मानवी मनाला अत्यंत विलोभनीय अशा वाटतात .सत्यनिष्ठ वाटतात. परिवर्तनवादी वाटतात. जीवनवादी वाटतात. याच व्यक्तिरेखांच्या दिशेने सुजाताताई लोखंडे यांनी आपल्या सागरतळाशी या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत.सागतळाशी पुस्तकातून विविध व्यक्तीच्या छटा रेखांकित केलेल्या आहेत.

    सागरतळाशी पुस्तकात सुजाताताई लोखंडे यांच्या लेखन शैलीचे विविध कंगोरे प्रस्तुत करणारे आहे. त्याचे "माझं नर्सिग : शोध अस्तित्वाचा " आत्मचरित्र व फुटपाथ ते नोटरी कादंबरी हे दोन पुस्तक यापूर्वी प्रकाशित झालेले आहेत .आणि नव्या दमाच्या या पुस्तकाने जगण्यातील विविध वास्तवगर्भी वैचारिक व्यक्तिरेखा अचूक टिपल्या आहेत. त्यांनी हा ग्रंथ वाचकांना उपलब्ध करून दिला त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो.सागरतळाशी हा ग्रंथ अत्यंत साधा , सरळ , तरल भावस्पर्शी, संवेदनात्मक,वेदनादायक , परिवर्तनशील, नियोजत्व, मुक्तआविष्कार, प्रेमात्व, समाजप्रिय अशा विविध अंगाने मोहरून आलेला आहे.

    जीवनाच्या वाटेत जे दिशादर्शक माणसे दिसली त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध सूक्ष्म निरीक्षणे त्यांनी वेचलेले आहेत. आपल्या मनाला अधिक संवेदनशील ठेवून वर्तमानाच्या विविध समस्येला उजागर केले आहे .मानवी स्वभावाचे विविध विलोभनीय दर्शन त्यांनी या ग्रंथात प्रस्तुत केलेले आहे. अंतर्वेध प्रस्तावनेत सुप्रिया अय्यर लिहितात की ,"किती व्यक्ती आपल्या सहवासात येतात त्याचे मोजमाप नाही ;पण पण त्यातील मोजक्याच आपल्या मनाचा ठाव घेऊन बसतात. त्यांना विसरू म्हटले तरी विसरता येत नाही.अन् मग सुजातासारख्या संवेदनशील मनाला ओढ लागते ती अशा अनुभवांना शब्दबध्द करण्याची."ही भूमिका अत्यंत वास्तविक आहे.

    जर व्यक्तिचित्रणाचा आपण अभ्यास केला तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे सामान्यमाणूस व्यक्तीचित्रणाचा केंद्रबिंदू फार कमी राहिलेला आहे हे लेखिकेचे मत खरे आहे. पण ज्या मराठी साहित्यात समाजमनाचे चित्रण यायला हवे ते का आले नाही.. हे तपासण्याची गरज आहे. मराठी लेखकाने ती करावी. फक्त आपल्या सामाजिक व धार्मिक परंपरा सांभाळण्यात लेखक व कवी हा कधीच क्रांती करू शकत नाही .समाजातील सापडलेल्या शोषितांना जागृत करू शकत नाही. वर्णवादी विचारांनी ग्रासलेले लेखक फक्त पुरोगामित्व दिसतात तर आत मध्ये प्रतिगामी त्याच्यात दलदल भरलेली असते. अशा दलदलीत तो बाहेरच जग विसरतो आणि फक्त आपल्या माणसाच्या जीवनावर साहित्य लिहतो. म्हणून मराठी साहित्यात अजूनही क्रांतिकारी लेखन निर्माण झाला नाही .ते फक्त आंबेडकरवादी विचारदर्शक लेखकांनी व कविने विविध साहित्यकृतीतून रेखाटलेले आहे. हे वास्तव आपण समजून घेतले पाहिजेत.

    सागरतळाशी व्यक्तिचित्रणात तेरा सामान्य व प्रतिभासंपन्न मानवाच्या जीवनाचे कृतिशील चित्रण केले आहे. अत्यंत सत्य दृष्टीने कोणतेही भयकंपपणा न ठेवता नम्रपणे लिहिण्याचा प्रयत्न केला आहे . या व्यक्तीचित्रणातील बहुतेक पात्र आज समाजात जिवंत आहेत. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा विचार केला तर लेखिकेने त्यांच्या पात्रांना न्याय देण्याचा अत्यंत कसोशीने प्रयत्न केलेला आहे. समाजात येणाऱ्या प्रत्येक माणसाला ते सुचत नाही पण सुजताताईने समाजातील परिसरातील व विविध काळामध्ये भेटलेल्या समाजबांधवांना योग्य न्याय दिलेला आहे.

    नमन करते मी तुला ! व निश्चयाचा महामेरू या दोन्ही लेखातून आपल्या आईवडिलांची व्यक्तिचित्रण रेखाटली आहेत. गरिबीचे जगणं व मरणाची सुटका अशी त्यांची गत झाली होती. स्त्रीवर होणार्‍या अन्यायाचा भाग आईच्या वाटेला आलेला होता. पुरुषप्रधान व्यवस्था घरच्या मंडळींनी घेतली होती. त्यामुळे येणाऱ्या ताण तणाव व त्याची परिणीती आईची होणारी घुसमटपणा, तिला मिळालेले जीवन यांचा अन्योन्य संबंध आहे .आई नेहमी म्हणायची, "तुम्ही मुली आहात, मुलांच्या बरोबरीनं शिका आणि स्वकर्तृत्वाने मोठे व्हा..! नाही तर माझ्यासारखं परावलंबित्व जीवन तुमच्या वाट्याला येईल."ही विचारगर्भिता नक्कीच तळमळीची आहे. या तळमळीच्या मागे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची महाऊर्जा होती. त्या महाऊर्जेच्या बळावर त्याने आपल्या मुलांना शिक्षण दिले. माझे बाबा अत्यंत ताटर होते पण त्यांच्यात एक मानवी मन होत. त्यांच्या स्वभावामध्ये व वातावरणाच्या बदललेल्या स्वरूपामुळे वडिलांमध्ये काही बदल दिसत असले तर त्यांच्यातील बाणेदारपणा व करारीपणा हा लेखिकेला फारच भावला आहे. स्पष्टवक्ता व शिस्त हे त्यांचे स्वभाव गुणधर्म होते.

    आई-वडिलांचे चित्रवर्णन दोन्ही लेखातून अत्यंत खुबीने लेखिकेने केलेले आहे .आपल्या अवतीभवती येणाऱ्या विविध मानवी मनाचा वेध घेतला आहे. त्यांच्यावर गुरू चापेकर सर यांच्या कार्याचा मोठा प्रभाव पडला होता. शिक्षकांशी कसे नाते ठेवावे याची प्रचिती साकार करणारी आहे. वाचन क्षमता वाढविण्याची व संस्कार मूल्ये जोपासण्यासाठी चापेकर सरांचा वाटा अत्यंत मोलाचा वाटतो. देवभूमीतील मातीचा गंध या व्यक्तिचित्रणात मॅडम सोसम्मा यांचे भावजीवन अत्यंत भारदस्तपणे रेखाटले आहे .त्याना मिळालेला राष्ट्रीय शौर्य पुरस्कार त्यांना अर्पण केला आहे .त्यांच्या कार्याची प्रच्युती यावरून मिळते. प्रचंड इच्छाशक्तीचा स्तोत्र डॉ. वैशाली पूर्णचंद्र खेडेकर यांच्या प्रशासकीय कार्याचा आढावा तसेच त्यांच्या मानवी मनाच्या तरलपणा मोठ्या खुबीने मांडला आहे.

    मानवी मनातील सौंदर्य भावाची संचित शेती फुलवणारी खेडीकर मॅडम हे आपल्या पेशाची प्रामाणिकपणे राहिलेल्या आहेत. मुरबाड मातीचा दाह या लेखात सिस्टर म्हात्रेच्या वैवाहिक जीवनाचे दुःख, वेदना,आक्रोश, कल्लोळ, बेडरपणा, मातृत्वाची भावना यांच्या मानसिक परिणामाचा यथोचित संदर्भात रेखांकित केले आहे .त्यांच्या वागण्यातील बेडरपणा का आला किंवा कुणी आणला हे आपण समजून घेणे गरजेचे आहे. रुग्णहितकारिणी मेट्रन लता तेले यांचे चित्रण स्वकर्तृत्वाने व प्रचंड मेहनततीचा नजराना पेश करते. भविष्याचे अचूक निदान करण्याची शैली लता तेलेची आहे .हे वाचकाला नव्या मूल्यसापेक्ष जीवनाला नवा आयाम देणारे आहे.

    अनुभव एक चळवळीचं जग त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने समाज मनावर अधिराज्य गाजवले आहे. पण त्याचा वैयक्तिक जीवनात अत्यंत खाचखळग्यांनी भरलेला होता .पुरुषी अहंकार धुडकावून स्वतःचं अस्तित्व त्यांनी निर्माण केलेला आहे .सुजाताताईने त्यांच्यातील विविध भावजीवन, मानवी संवेदना, प्रेमाचा ओलावा अत्यंत साध्या शब्दात रेखाटले आहेत. विस्तारलेले क्षितिज यामधून अरूणा सबाने व्यक्तिचित्रणात रेखाटले आहे. क्षितिजाचे प्रचंड मजबूतीचे घट्ट खांब असे व्यक्तिमत्व वाचकाच्या मनाला ओलावा देऊन जातात. शैलाताई जैमिनी नाट्यकर्मी व समाजजाणिवांचा उर्जास्वल मन, खंबीर व स्वकर्तृत्व यांच्या जीवनाच्या अध्याय आहे. परिवर्तनशील भूमिका घेऊन जगणारी स्त्री पण काळाच्या बदलामधून त्यांच्या एकलेपणाचं मन दुःखान गदगदून जाते. पण जीवनाच्या वाटेत त्या खचलेल्या नाही. त्यांनी समाजाला दिलेले आपले क्रियाशील योगदान अजूनही प्रेरणादायी आहे. येथील अस्वस्थ मानवता हीच शैल ताईच्या जीवनाचे गमक आहे.

    जोगणीचे जीवन जगणाऱ्या संध्याताई यांनी आपल्या ध्येयाकडे अजिबात दुर्लक्ष होऊ दिले नाही. पत्नी व मैत्रिणी या नाजुक बंधनाचे ताण-तणाव असताना त्या कधीच डगमल्या नाही. पण मानवी दुःखाच्या विविध छटांच्या स्पर्श मनाला कायम गंभीर करून गेलेला आहे .ही भाषा वाचकाचे मन आकर्षून घेणाऱ्या आहे. अनुसुया एक मानवारचा विश्वास उडून आपला आयुष्य वेचणारी पटाचारा आहे. जीवनातील आलेल्या अनेक संकट, दुःख, वेदना यांचे कधी त्यानी पाठ फिरवली नाही. आपल्यातील संयम व शांती ढळू दिली नाही.हे व्यक्तिचित्रण वाचकाला वेगळ्याच दुनियेत घेऊन जाणारी आहे.निष्ठाच्या अवस्थेची प्रसूती म्हणजे अव्यक्त वेदनेची मुर्ती.सांजधुक्यातील आठवण या लेखातून दीपाच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध स्पर्शबंद प्रस्तुत केलेले आहे. जन्म आणि मृत्यू याच्यातील प्रवास म्हणजे जीवन. असे रेखाटले आहे तरी जन्म आणि मृत्यू या काळातील बदलते परिमार्जन म्हणजे जीवन असे मला वाटते.

      काही बदल सापेक्ष तर काही बदल असापेक्ष असतात. मनोरुग्ण जीवनाच्या क्लेशदायी संवेदनशील मनाच्या अथांगाची खोली या लेखातून प्रस्फुटीत झालेली आहे. कहाणी शमा व्हिलाची या लेखामध्ये गर्भश्रीमंत जीवनातील एकटेपणाचं जगणं कसं असतं हे शमा आनंद विशाल यांच चित्र नक्कीच भारतीय श्रीमंत माणसाला लागू पडतं. शिकलेली माणसं मनसोक्तपणे वागताना.आपले कर्तृत्व हरवून बसलेली आहेत. विभक्त कुटुंब व्यवस्था निर्माण झाल्याने आई वडिलांचे जीवनातील होणारी होरपळ अत्यंत कळीचा मुद्दा बनलेला आहे. या लेखांमधून त्यांनी विशिष्ट सामाजिक क्षेत्रात काम करणा-या लोकांचे वास्तव जीवनाची नव्या स्वरूपात मांडणी केलेली आहे.

      सागरतळाशी या व्यक्तीचित्रणाचे यश हे साध्या व सोप्या भाषेवर आहे. छोटे वाक्य, मनाला भिडणारा संवाद, वास्तविकतेचा भावार्थ, मनोविश्लेषणात्मक विचारपद्धती, मैत्रीचा ओलावा,परिवर्तनाची पाठशाला, जगण्याची धडपड, प्रशासनातील चांगुलपणा, मानवी मनातील आशावाद, यांनी ओतप्रोत भरलेला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार प्रेरणेतून लेखिकेने लिहलेली हे व्यक्तीचित्रण अत्यंत भावनिक आहे. मनाला चटका लावणारे आहे. समाजातील दुर्लक्षित सामान्य पात्रांना न्याय देणारे आहे. बदलत्या काळातील जीवनशैलीचा मागोवा उत्कट व संयमपणे घेतलेला आहे. सागरतळाच्या अंतरंगात समाजाला प्रेरित करणारे काजवे आजही आपल्याला अवतीभवती पाहायला मिळतात. त्यांच्या जीवनातील संघर्ष हाच पुढच्या पिढीला प्रेरणा देणारा मार्गस्थ असतो. अशा कोमल, मातृत्व,अबोल कार्यतत्पर,कठोरात्मक, वेदनामय, मानवी स्वभावाच्या जीवनाचे वास्तव चिंतन मनाला नक्कीच भावले आहे. पण या व्यक्तिचित्रणात काही उणिवा आहेत. काही शक्तिस्थळे जरूर आहेत. परंतु यामध्ये वापरलेले शब्द हे कुठेतरी मनाला खटकत असतात. जीवनशैलीमधून आपल्या साहित्यातून नव्या शब्दांची निर्मिती करत असताना पारंपरिक शब्दाला आपण मूठमाती दिली पाहिजे. नशिब या शब्दाला आपल्या शब्दकोशातून हद्दपार केला पाहिजे. हा विचाराधीन असला तरी तो वापरताना थोडी काळजी लेखिकेने घ्यायला हवी.

      सागरतळाशी या व्यक्तिरेखातील लेखामध्ये वास्तवगर्भी व भावनाप्रधान असे विचार व्यक्त झालेले आहेत. सुजाताताईने मूल्यभावार्थ मांडलेला आहे .तो नक्कीच प्रेरणादायक आहे.सागरतळाशी यामधील व्यक्तिरेखा मानवी संवेदनात्मक मनाचा मूल्यकोश असून व्यक्तीला नव्या जीवनाची ओळख करून देणार आहे. सुजाताताई यांनी केलेला हा लेखप्रपंच येणाऱ्या समाजाला व वाचकाला नव्या विचारांची महाऊर्जा देऊन जाईल. आपल्यामधील असलेल्या अनेक समस्येला कुठेतरी एक दिशा मिळेल आणि बदलत्या परिघामध्ये वाचक नवी समस्या कशी सोडवू शकेल याविषयी त्यांना सुत्र मिळेल. यासाठी सुजाताताई लोखंडे यांनी जी मेहनत घेतली आहे. ती अत्यंत विचारप्रधान आहे. त्या मेहनतीला आम्ही सलाम करतो. त्यांच्या पुढील साहित्यकृतीकरिता माझ्याकडून लाख लाख मंगलकामना चिंतितो.....!

      -संदीप गायकवाड
      नागपूर
      9637357400

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या